उर्मिलेची उत्तरी ‘दौड’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2019   
Total Views |



 

 
निवडणुकीचे राजकारण म्हणजे एक दौड.आधी नेत्यांच्या मागे तिकीट मिळावे म्हणून पळा, तिकीट प्राप्तीनंतर कार्यकर्त्यांच्या जुळवाजुळवीमागे लागा आणि मग गल्लोगल्ली जाऊन मतदारांसमोर हात जोडा. उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या राजकीय दौडमध्ये एकाएकी सामील झाल्या. आधी काँग्रेस प्रवेश आणि नंतर लगेच तिकीटही. पण, शेवटी अभिनेत्री असल्यामुळे आणि उत्तर मुंबईत उमेदवारच न सापडलेल्या काँग्रेसने मातोंडकरबाईंना रिंगणात उतरविले. त्यामुळे किमान तिकिटासाठी तरी उर्मिलाची भागदौड झाली नाही, एवढेच. पण, आता मात्र मतांचा जोगवा मागत उर्मिला अख्खा मतदारसंघ पिंजून काढतेय. कधीही उघड्या डोळ्यांनी न बघितलेल्या अशा सामान्यांच्या मुंबईचे साक्षात दर्शन ती घेतेय. कोळीवाड्यांच्या, चाळींच्या, झोपडपट्ट्यांच्या, इमारतीच्या दाटीवाटीने गजबजलेल्या उत्तर मुंबईत उर्मिलाने चौकसभांचा धडाकाच लावला आहे. आम. अस्लम शेखच्या सोबतीने धार्मिक पर्यटनही जोरात आहेच. परंतु, प्रश्न हाच उपस्थित होतो की, अंधेरी-लोखंडवाला सारख्या झगमगाटात राहणारी ही अभिनेत्री निवडून आलीच, तर पुन्हा त्याच कोळीवाड्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये मतदारांचे साधे आभार मानायला तरी येईल का?  जी व्यक्ती या मतदारसंघातील मुळात रहिवासीच नाही, जिला इथल्या समस्यांची किंचितही जाण नाही, जी पहिल्यांदाच प्रचारा दरम्यान हा सगळा परिसर पायाखाली घालतेय, त्या व्यक्तीला केवळ ती उत्तम नटी आहे, म्हणून निवडून देण्यात काय हासिल? पण, दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्षांमधील सेलिब्रिटी ट्रेंडमुळे उर्मिलासारखे ग्लॅमरसउमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले जातात, ते केवळ त्यांच्या फेस व्हॅल्यूमुळे. त्यांना बघायला, त्यांच्यासोबत फोटो काढायला धडपडणार्‍या लोकांमुळे. मग ती उमेदवार नंतर, पण कलाकारच आधी असते. मग हेमामालिनी असोत वा शत्रुघ्न सिन्हा, त्यांना वेगळ्या चश्म्यातून पाहता येणार नाही. खरं तर सिनेतारकांकरिता आता चित्रपटसृष्टीतील निवृत्तीनंतर तितक्याच मानाचे, फायद्याचे असे क्षेत्र म्हणून राजकारणाची निवड होताना दिसते, ज्यासाठी कुठे ना कुठे भारतीयांचा सिनेमावेडेपणाच आड येतो. त्यामुळे मतदारांनी मतदान करताना केवळ आणि केवळ त्या उमेदवाराची सामाजिक-राजकीय पार्श्वभूमी, मतदारसंघाशी त्याचे असलेले नाते आणि काम करण्याची तयारी या निकषांनाच प्राथमिकता देऊन विवेकबुद्धीने मतदान करावे, हीच अपेक्षा.

 
गोविंदा गेला, उर्मिला आली...
 

श्रीपाद अमृत डांगे, मृणाल गोरेंपासून ते राम नाईकांपर्यंत दिग्गज नेत्यांनी गाजवलेला मतदारसंघ म्हणजे उत्तर मुंबई.’ २००८ पूर्वी पालघरपासून ते गोरेगावपर्यंत प्रचंड विस्तार असलेला हा मतदारसंघ सध्या दहिसर ते मालाडपर्यंत मर्यादित आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी याच मतदारसंघाचे एका दशकाहून अधिक काळ समर्थ नेतृत्व केल्यानंतर २००४ साली त्यांना हार पत्करावी लागली तीही अभिनेता गोविंदा अहुजामुळे. तब्बल ४८ हजार मतांच्या फरकाने रामभाऊ पराभूत झाले. खरं तर फक्त रामभाऊच नाही तर बर्‍याच मतदारांसाठी, कार्यकर्त्यांसाठी तो एक फार मोठा धक्काच होता. कारण, उत्तर मुंबईच्या मतदारांनी आपला कौल गोविंदाच्या पारड्यात टाकला होता. विरारला आपली कर्मभूमी मानणार्‍या गोविंदाला वसई-विरारकरांनी उचलून धरले. पण, काही एक्सप्रेस गाड्यांना विरार स्थानकात थांबा देण्यापलीकडे गोविंदाला या क्षेत्रासाठी काहीही करता आले नाही. २००४ ते २००९ या काळात ३०३ दिवसांपैकी केवळ ३७ दिवस गोविंदाने संसदेत हजेरी लावली. संसदेतही तोच पाच वर्षांत फक्त दोन वेळा तेही प्रत्येकी दोन मिनिटेच बोलला. दिल्लीत सोडा, उत्तर मुंबईच्या गल्लीतही गोविंदाचे दर्शन नंतर मतदारांना झाले नाही. गोविंदा त्याच्या अभिनयातच गुंतून राहिला आणि परिणामी मतदारसंघाचा विकास या पाच वर्षांत खुंटला. नंतर गोविंदाने राजकारणातून संन्यास घेतला तो कायमचाच! मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ साली दुर्दैवाने पुन्हा एकदा रामभाऊंना अवघ्या पाच हजार मतांनी संजय निरुपम यांच्याकडून पराभव पत्करला लागला. पण, २०१४ साली या मतदारसंघाशी नाळ जोडलेली असलेल्या गोपाळ शेट्टींनी तब्बल साडे चार लाख मतांनी रामभाऊंच्या पराजयाचा वचपा काढला. मतदारसंघाचा पूर्वेतिहास स्मरणात आणण्याचे कारण हेच की, आज गोविंदाच्या जागी उर्मिला आहे आणि रामभाऊंच्या जागी कार्यसम्राट खा. गोपाळ शेट्टी. परिस्थिती, उमेदवार, मतदारांमध्ये २००४ पेक्षा निश्चितच फार फरक असला तरी, पुन्हा एकदा लढाई ही कलाकार विरुद्ध कार्यकर्ताअशीच आहे. त्यात उर्मिला मातोंडकरांच्या हिंदूविरोधी, मोदीविरोधी वक्तव्यांनी आगीत तेल ओतण्याचेच काम केले आहे. तेव्हा, उत्तर मुंबईच्या मतदारांनी काँग्रेसच्या या देखाव्याला न भुलता गोपाळ शेट्टींनी मतदारसंघात केलेल्या कामांचा दाखला समोर ठेवावा आणि मगच निर्णय घ्यावा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@