द दा विंची कोड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2019
Total Views |

डॅन ब्राऊन लिखित ‘द दा विंची कोड’ नावाची कादंबरी नुकतीच वाचण्यात आली. एखाद्या बेस्ट सेलर पुस्तकाला आवश्यक असणारे सर्व गुण या कादंबरीत परिपूर्ण आहेत. वेगवान कथानक, विषयवस्तूचे सखोल व चकित करणारे सूक्ष्म अध्ययन, नाट्यपूर्ण घडामोडी, अनपेक्षित वळण इत्यादी बाबी या कादंबरीत आहेतच, परंतु एवढ्याने या पुस्तकाचे माहात्म्य संपत नाही. या पुस्तकात डॅन ब्राऊन यांनी एका महत्त्वाच्या विषयाला छेडले आहे व तो म्हणजे चर्चपूर्व प्राचीन पंथांमध्ये असलेली स्त्रीत्वाची संकल्पना.
 
 
 
कॅथॉलिक चर्चचा काळा भूतकाळ बेमालूमपणे या पुस्तकातून वाचकांच्या समोर येतो. या पुस्तकामुळे ख्रिश्चन समाजात खळबळ माजणे स्वाभाविक होते. परंतु, भारतात मात्र या पुस्तकातील प्रतिपाद्य विषयाला उपेक्षेच्या गर्तेतच टाकण्यात आल्याचे दिसून येते. जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो ला विंची यांच्या ‘द लास्ट सपर’ (अंतिम रात्रभोज) या गाजलेल्या चित्रात, त्यांनी काही सांकेतिक खुणा बेमालूम टाकल्या आहेत. त्यातून लिओनार्दो यांना कुठल्या तरी रहस्याकडे संकेत करायचा आहे. हे कुठले रहस्य आहे आणि त्याचा कसा उलगडा होतो, याची रसभरीत कहाणी म्हणजे ‘द दा विंची कोड’ पुस्तक.
 
 
येशू ख्रिस्त मूळ ज्यू होता. मेरी मॅगडालीन ही त्याची पत्नी. त्यांना मूलबाळही होते. येशूने चर्चच्या स्थापनेची जबाबदारी मेरी मॅगडालीनवर टाकली होती. थोडक्यात, येशू हा पवित्र स्त्रीवादी (सॅक्रेड फेमिनिस्ट) होता. देवतांचे पूजन, स्त्रीत्वाचा गौरव आणि समाजाच्या धारणेत स्त्रीचे आत्यंतिक महत्त्व या तत्त्वांचा पुरस्कार करणार्यांपैकी तो होता. व्हॅटिकनने हे गुपित दडपून ठेवण्याचा चौथ्या शतकापासून आटोकाट प्रयत्न केला होता. धर्मयुद्धे घडली याचे एक कारण हेही आहे. येशू हा परमेश्वराचा प्रेषित आहे आणि कुमारी मेरीपासून तो जन्माला आला, ही जी कहाणी व्हॅटिकनने प्रसारित केली होती त्याला छेद देणारे, येशू हाही एक मर्त्य मानव होता आणि कुटुंबवत्सल होता, हे सत्य व त्याचे पुरावे जिवाच्या आकांताने जतन करणारी प्रायरी ऑफ सायन ही गुप्त संघटना असते. आयझॅक न्यूटनपासून लिओनार्दो वगैर जगप्रसिद्ध व्यक्ती या संघटनेत असतात. हे सत्य व्हॅटिकनच्या राक्षसी ताकदीपासून वाचावे व पिढी-दर-पिढी जतन व्हावे म्हणून प्रायरी ऑफ सायनचे सदस्य अत्यंत गुप्तता पाळत आणि सांकेतिक चिन्हांचा व भाषेचा वापर करीत. हे सत्य एका विशिष्ट काळी जगासमोर आणायचे, हेही ठरले होते. व्हॅटिकनने बहुतेक सर्व पुरावे नष्ट केले होते आणि आता हाही शेवटचा पुरावा नष्ट करण्याच्या मागे व्हॅटिकन पूर्ण शक्तिनिशी लागले होते. ख्रिस्ताच्या वंशजांबद्दल कुणाला काही कळले असते, तर चर्चचे अस्तित्वच धोक्यात आले असते. ख्रिस्ताला मूलबाळ होते, असे म्हटल्यामुळे ख्रिस्ताच्या दैवी अस्तित्वाला बाधा येत होती. सर्व मनुष्यमात्राला स्वर्गाचे दार उघडून देणारी आणि दिव्यत्वाकडे नेणारी एकमेव संस्था म्हणजे चर्च, असं स्वत:चं महत्त्व घोषित करणार्या चर्चलाही त्यामुळे धक्का बसला असता. आणि म्हणून मेरी मॅगडालीनच्या संभाव्य शक्तीचा धोका लक्षात घेऊन चर्चने तिची एक वेश्या म्हणून सतत संभावना केली आणि ख्रिस्ताशी लग्न झाल्याचा सर्व पुरावा दडवून ठेवला. अशाप्रकारे, ख्रिस्त हा मानवी प्रेषित होता आणि त्याला पुढे वाढलेली संतती होती, या ‘सत्या’वर चर्चने पडदा टाकला. हे सत्य प्रकट होते का, याची संघर्षमय कहाणी म्हणजे हे पुस्तक आहे.
 
 
 
 
हे पुस्तक वाचताना, व्हॅटिकन किती स्त्रीद्वेष्टा आहे आणि ते स्त्रीला एक मानव म्हणूनही मानण्यास तयार नाही, याचे धक्कादायक अनावरण होते. ईव्हने सफरचंदाचा चावा घेतल्यामुळे देवाचा रोष ओढवून घेतला. स्त्री ही पापाचे मूळ आहे. मानवी अध:पतनाचे प्रतीक आहे, हा विचार कॅथॉलिक चर्चने जगभर पसरविला.
व्हॅटिकन चर्चच्या राक्षसी वरवंट्याखाली जगातील अनेक पंथ चिरडले गेले. या पंथांना पॅगन म्हणतात. हे पॅगन पंथ निसर्गपूजक, स्त्रीवादी, देवतेची पूजा करणारे होते. या प्राचीन पंथांमध्ये गुलाबाचं फूल म्हणजे स्त्रीच्या शरीरसौंदर्याचं प्राथमिक चिन्ह समजलं गेलं आहे. देवतापूजन करणार्या या प्राचीन पंथांमध्ये, गुलाबाच्या पाच पाकळ्या म्हणजे स्त्रीच्या जीवनातील पाच स्थिती समजल्या जात- जन्म, ऋतुप्राप्ती, मातृत्व, ऋतुसमाप्ती आणि मृत्यू. आपल्याकडेही स्त्रीत्वाच्या संकल्पना फार उच्च आणि स्त्रीला निरतिशय सन्मान देणार्या होत्या. स्त्रीला शक्तिरूपा मानले गेले. सार्या चराचर सृष्टीला धारण करणारी पृथ्वी ही स्त्री आहे. आपण आपल्या देशालाही माता म्हटले आहे. आपले स्वातंत्र्ययुद्धदेखील भारतमातेच्या मुक्ततेचे म्हणजे स्त्रीवादी होते. आपल्या धर्मशास्त्रात स्त्रीला जगाच्या एकूणच व्यवहारात अत्यंत मानाचे आणि समभागीदारीचे स्थान देणारी अनेक रूपके व कथा आहेत. जगाच्या इतर भागातील पॅगन पंथांचा अभ्यास केला तर असे लक्षात येईल की, भारतीयांचे स्त्रीविषयक चिंतन आणि या पंथांतील स्त्रीसंबंधी चिंतन यात आश्चर्यकारक साम्य आहे. स्त्रीची ही इतकी भलावण अरबस्तानातील जिहादी टोळ्यांना तसेच व्हॅटिकनला मान्य नसावी. त्यांना तर स्त्री ही देवाने पुरुषांच्या भोगासाठी निर्मित एक वस्तूच वाटत असावी. व्हॅटिकनने बळजबरीने लोकांच्या गळी उतरविलेल्या या संकल्पनेमुळेच, युरोपात स्त्रियांना आपल्या हक्कांसाठी, एक मानव म्हणून मान्यता मिळण्यासाठी जबरदस्त संघर्ष करावा लागला आहे.
 
 
 
इस्लाममध्येही आता-आता हा लढा सुरू झालेला आपण बघत आहोत. परंतु, आपल्या भारतात मात्र स्थिती वेगळी होती. हजार वर्षांच्या इस्लाम व चर्चच्या गुलामगिरीमुळे, भारतातील स्त्रियांची स्थितीदेखील एक भोग्यवस्तू म्हणून करून टाकण्यात आली. इस्लाम आणि चर्च हे जेते असल्यामुळे त्यांनी आपली स्त्रीविषयक संकल्पना इथे भारतातही रुजविण्याचा भरकस प्रयत्न केला आणि त्याचेच फळ म्हणून गेल्या शतकापर्यंत आपल्याकडे दृग्गोचर होत असलेली स्त्रियांची दयनीय स्थिती होय. गंमत म्हणजे, भारतातील स्त्रियांना या दयनीय स्थितीतून बाहेर काढण्यासाठी ज्या चळवळी सुरू झाल्या, त्या युरोपातील स्त्रीवादाच्या विचारांनीच प्रेरित होत्या. युरोपातील स्त्रीविचार हा मुक्त, प्रगतिशील असल्याचा दावा आजही केला जातो. परंतु, मुळात तो किती मागासलेला आणि अमानुष होता, याचे मात्र आम्हाला सोयिस्करपणे विस्मरण करून दिले जाते. संभोगसुख हे क्षणभंगुर असले तरी ते समाधिसुखाच्या समतुल्य आहे, असा क्रांतिकारी विचार मांडणार्या भारतीयांच्या मनात, इस्लाम व ख्रिश्चन पंथाने, शरीरसंबंधाला हीन राक्षसी वृत्ती म्हणून बिंबवले. ते एक पाप, घृणास्पद कृत्य आहे, अशी लोकांची कल्पना करून दिली.
 
द दा विंची कोड पुस्तकातील नायक रॉबर्ट लँग्डन म्हणतो- शरीराशास्त्राप्रमाणे, कामक्रीडेच्या अत्युच्च क्षणी मनात अगदी क्षणभरच कुठलाही विचार नसतो. संपूर्ण मानसिक पोकळी असते. दिव्यदृष्टीचा असा एक क्षण जेव्हा परमेश्वराचे दर्शन होऊ शकते. ध्यानधारणा करणार्या अनेक गुरूंना शरीरसंबंधाशिवायच असे विचारमुक्त क्षण मिळविण्याची स्थिती प्राप्त होत असे आणि त्यांनीच कधीच न संपणारा आध्यात्मिक उच्चिंबदू म्हणजे निर्वाण अशी व्याख्या केली होती. शरीरसंबंधाविषयी प्राचीन लोकांचा जो दृष्टिकोन होता तो आजच्यापेक्षा अगदी वेगळा होता. शरीरसंबंधातून नवीन जीवन निर्माण होते. नवीन जीव, पराकोटीचा चमत्कार आणि शेवटी परमेश्वरच चमत्कार निर्माण करू शकतो. गर्भाशयातून नवीन जिवाची निर्मिती करण्याची शक्ती असल्यामुळे स्त्रीला पवित्र मानले गेले होते. एक देवी. मानवी अस्तित्वाचे दोन भाग- स्त्री आणि पुरुष- यातील दैवी युती म्हणजे संभोगक्रिया. या प्रक्रियेतूनच पुरुषाला आध्यात्मिक पूर्णता मिळते आणि परमेश्वराचा साक्षात्कार होतो.
कथानायक रॉबर्ट लँग्डनने सांगितलेले हे पॅगन पंथाचे स्त्रीसंबंधी विचार निश्चितच विचारणीय आहेत. आपल्याकडील उपनिषदांमध्ये, भागवतामध्ये अशाच संकल्पना प्रतिपादिल्या आहेत. परंतु, चर्च व इस्लामने मात्र स्त्री आणि पुरुषात संघर्ष निर्माण करून, समाजात एक विचित्र घर्षण निर्माण करून ठेवले. त्याच्या ठिणग्या आजही समाजात चित्रविचित्र स्वरूपात उडताना दिसतात. दुर्दैव म्हणजे, त्याचे खापर मात्र भारतीयांच्या जीवनदर्शनावर फोडले जाते. आजकाल जगभरातील प्राचीन पंथांचा अभ्यास वेगाने सुरू आहे. त्यातून, या सर्व पंथांच्या विचारप्रक्रियेत स्त्रीला असलेले अत्यंत महत्त्वाचे स्थान लक्षात येते. ही एक आश्चर्यकारक समानता आहे. ‘द दा विंची कोड’ या पुस्तकाच्या निमित्ताने युरोपमधीलही प्राचीन पंथांमधील स्त्रीत्वाची ही दिव्य संकल्पना लक्षात आली. हे या पुस्तक वाचण्याचे फलितच म्हणावे लागेल.
 
 
9881717838
@@AUTHORINFO_V1@@