नुसत्या माफीने भागेल?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2019
Total Views |



वस्तुत: कुठलाही सेमेटिक धर्म ही एकप्रकारची राजकीय विचारसरणीच असते. मूल्यांची पखरण त्यात केलेली असली तरी, तिचा मूळ उद्देश हा शुद्ध राजकीय आणि जनसमुदायातले सर्वच प्रकारचे घटक सोबत ठेवण्यासाठीच केला जातो. चर्चही तसेच वागत आहे.

गोव्यातले फादर कॉनसेसियो डिसिल्व्हा यांनी जनतेची माफी मागितली आहे. ख्रिस्ती धर्मातल्या प्रसिद्ध कन्फेशन खोक्यात जाऊन ही माफी मागितलेली नसून लोकांसमोर जाहीर माफी मागितली आहे. ही माफी आकाशीच्या देवाच्या प्रेरणेने मागितलेली नसून निवडणूक आयोगाच्या दणक्यामुळे मागितली आहे. अमर, अकबर, अ‍ॅन्थोनी ते आयडियाच्या भोजनमंत्राच्या जाहिरातीपर्यंत माध्यमेही फादरच्या पांढर्‍या झग्यांना कसे भुलतात, हे आपल्याला ठाऊकच आहे. फादर म्हणजे करुणेचा पुतळा, फादर म्हणजे वात्सल्याची मूर्ती, डोके ठेवून रडण्याचा हक्काचा खांदा आणि केलेल्या पापाची माफी परमेश्वराकडून मिळविण्याचा महामार्ग. किमान माध्यमे आणि सर्वसामान्य समाजात तरी फादरची अशीच प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. मोठ्या बेमालूमपणे ही प्रतिमा चालविली जाते आणि खिस्ती धर्माचा अनुनय करणारेच नव्हे, तर अन्य धर्मातले रंजले-गांजलेले लोक या फादरच्या झग्याचे टोक धरायला आसुसलेले असतात.

फादर डिसिल्व्हाचे भाषण समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे. खुद्द ख्रिस्ताच्या पुतळ्याकडे पाठ करून चर्चमध्येच हे महाशय समोरच्या लोकांना राजकीय विखार पढवताना दिसतात. पर्रिकरांना झालेला कर्करोग हा सार्‍या देशाच्या हळहळीचे कारण बनला होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे एक स्वच्छ, कर्तृत्ववान आणि साधा राजकारणी आपण गमावणार याची जाणीव लोकांना होता होती. एरव्ही फादरकडून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाणे अपेक्षित होते किंवा ते गेल्यावर खुद्द ख्रिस्तीधर्मही विश्वास ठेवत असलेल्या स्वर्गात त्यांनी शांततेत राहावे, अशी प्रार्थना करावी अशी अपेक्षा होती. मात्र, घडत तर काही भलतेच आहे. धर्मपीठांचा वापर करून राजकीय पोळ्या भाजण्याचे उद्योग जोरात चालू आहेत. इतकी असंवेदनशील टीका केल्यानंतरही हे महाशय या देशातील तथाकथित बुद्धिवंतांच्या टीकेचे लक्ष्य झाले नाहीत हे नवलच म्हणावे लागेल. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना तिकीट दिल्यानंतर जावेद अख्तरपासून ते निरनिराळ्या स्तंभलेखकांनी आपले पुरोगामित्व व निधर्मीपणा सिद्ध करण्याची खाज पुरेपूर भागवून घेतली. यांच्या ट्विटरवरील टिवटिवाटामुळे खरे पक्षीसुद्धा उडून गेले असावेत. मात्र, या मंडळींनी या सगळ्याच विषयावर मौन पाळले आहे. गोव्याच्या फादरने मागितलेली माफी हा हा केवळ दिखावा असून भाजप व संघद्वेषाचे त्यांचे कंड या निवडणुकीमध्ये उफाळून येत आहेत.

केवळ गोव्याच्याच नव्हे, तर दिल्लीच्या फादरनीही अशीच भूमिका घेतली आहे. स्वातंत्र्यावर घाला येत आहे, ख्रिश्चनांवर हल्ले होत आहेत, असा कांगावा दिल्लीच्या आर्चबिशपनी चालविला आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात मतदान करावे अशी ही त्यांची सरळ मागणी आहे. लोकशाहीत अशी मागणी असायला हरकत नाही. आपल्याला न पटलेल्या राजकीय विचारांच्या विरोधात मतदान करायला व आपल्या लाडक्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला लोकशाहीत कोणीही कोणालाही रोखू शकत नाही. या सगळ्यांचा पाठिंबा राहुल गांधींना आहे हे जाहीर आहे, तो असूही शकतो. मात्र, चर्चची ही सगळी यंत्रणा एका विशिष्ट केंद्राच्या अधिपत्याखाली चालते. ‘व्हॅटिकन’ नावाचे हे केंद्र देशबाह्य आहे. त्याचा प्रमुखही देशबाह्य आहे. धर्माला राष्ट्रांच्या सीमा नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीला देशाच्या मात्र सीमा आहेत. अल्पसंख्याक समुदाय म्हणून ज्या प्रकारे अल्पसंख्याक नागरिकांच्या हक्कांचे रक्षण भारतात केले जाते, तसे ते अन्य कुठल्याही देशात होत नाही. त्याबाबत कृतकृत्य असण्यापेक्षा या असल्या राजकीय उचापती ही मंडळी करीत राहतात. लोकशाहीची आधुनिक मूल्ये बहुसंख्याकांना अल्पसंख्याकांची काळजी वाहण्याचे आवाहन करतात. त्यांचे शिक्षण, रोजगार व ऐहिक याची जबाबदारी घेण्याची मागणीही करतात. त्यात चुकीचेही काही नाही. मात्र, अल्पसंख्याक आपल्या अल्पसंख्याक असण्याचा फायदा घेऊन हे असले उद्योग करीत असतील, तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? कोणा माथेफिरूने जर काही वावगे केले, तर त्याला कोण रोखणार? चर्चने उघडपणे राजकारणात भाग घेण्याची ही काही पहिली वेळ नाही. भाजप सत्तेवर येऊ नये म्हणून जमेल त्या मार्गाने चर्च प्रयत्न करीत असते.

2014 पासून ही तडफड सुरू आहे. मुंबईतल्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीही अत्यंत सूचकपणे भाजपला मतदान करू नये, अशा आशयाचे पत्रच विद्यार्थ्यांना पाठविले होते. निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. गुजरातच्या चर्चनेही गुजरातच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी असेच फतवा वजा पत्र काढले होते. गोव्यातील एका चर्चमधून प्रसिद्ध होणार्‍या एका नियतकालिकातून भाजपला मतदान करून नये म्हणून लेख लिहिण्यात आला होता. छत्तीसगढ, आसाम अशा अनेक ठिकाणी अशा प्रकारचे राजकीय उद्योग या तथाकथित बिगरराजकीय चर्चने केले आहेत. हिंदू धर्माचा अनुनय करणार्‍या एखाद्या साधूकडून लहानसा प्रमाद घडला, तर त्याच्या हात धुवून मागे लागणारी माध्यमे या विषयावर चिडिचूप असतात. वस्तुत: कुठलाही सेमेटिक धर्म ही एकप्रकारची राजकीय विचारसरणीच असते. मूल्यांची पखरण त्यात केलेली असली तरी, तिचा मूळ उद्देश हा शुद्ध राजकीय आणि जनसमुदायातले सर्वच प्रकारचे घटक सोबत ठेवण्यासाठीच केला जातो. धर्माची शपथ घेऊन पशुसमान वागल्याचे कितीतरी पुरावे आता एकामागोमाग एक पुढे येतच आहेत. केरळमध्ये ज्याप्रकारचे आरोप धर्मगुरूंवर होत आहेत, ते पाहिले की काही वर्षांनी व्हॅटिकन त्याचीसुद्धा माफी मागत असल्याचे चित्र दिसू शकते. हा सगळाच प्रकार मोठा दांभिक असल्याचे लक्षात येईल. युरोपात चर्च व ख्रिस्तीधर्माच्या बेड्या झुगारून ज्या समाजसुधारकांनी त्या त्या देशाचा राष्ट्रवाद प्रखरपणे मांडला, त्यांना चर्च व धर्मगुरूंशी कराव्या लागलेल्या संघर्षाचे अनेक दाखले आपल्याला आजही वाचता येतात. भारतात चर्चला असे काही करणे तितके सोपे नाही. त्याचे कारण ते बहुसंख्य नाहीत. पण, मूल्यांची खोटे झगे घालून शुभ्रतेचा जो काही आव ही मंडळी आणतात, त्याचा बुरखा फाडणारे हे उद्योग आहेत. करुणेच्या आणि सेवेच्या नावाखालचा हा राजकीय विस्तारवाद रोखण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@