बोस्टन मॅरेथॉन-हेरांची शर्यत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |





एकप्रकारे या ब्रिटिश हेरांच्या धावपळीची टिंगल करायला किंवा टिंगलयुक्त स्मरण करायलाबोस्टन अ‍ॅथलेटिक असोसिएशन’ या संस्थेने १८९७ साली ‘बोस्टन मॅरेथॉन’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. आता मुळात मॅरेथॉन शर्यत ही काय भानगड आहे, हेही सांगायला हवं.

 

जगभरात सहा ठिकाणच्या मॅरेथॉन शर्यती या फार प्रसिद्ध आहेत. फार लोकप्रिय आहेत. जगभरचे महत्त्वाकांक्षी धावपटू या सहांपैकी एका तरी शर्यतीत आपल्याला धावायला मिळावं, यासाठी फार उत्सुक असतात. या सहांपैकी सगळ्यात जुनी आहे, बोस्टन मॅरेथॉन शर्यत. मुळात सहापैकी तीन मॅरेथॉन शर्यती अमेरिका या एकाच देशात होतात- बोस्टन न्यूयॉर्क आणि शिकागो. लंडन आणि बर्लिन मॅरेथॉन या अनुक्रमे ब्रिटन आणि जर्मनी या देशांमध्ये म्हणजे युरोप खंडात होतात, तर टोकियो मॅरेथॉन ही एकमेव शर्यत जपानमध्ये म्हणजे आशिया खंडात होते. आता या सहा शर्यतींपासून स्फूर्ती घेऊन जगभरात अनेक शहरांमध्ये मॅरेथॉन शर्यती सुरू झाल्या आहेत. अगदी मुंबईतसुद्धा गेली काही वर्षें मॅरेथॉन शर्यत सुरू झाली आहे. पण, या सगळ्यांचं स्वरूप बरंचसं उत्सवी असतं. या सहा प्रख्यात मॅरेथॉन शर्यतींचा रुबाब, प्रतिष्ठा आणि दबदबा अजून दुसरं कुणीही प्राप्त करू शकलेलं नाही. अगदी अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को सारखी शहरंसुद्धा.

नुकतीच म्हणजे परवा १५ एप्रिलला बोस्टन मॅरेथॉन पार पडली. बोस्टन शहराचं एक उपनगर हॉपकिंटन येथून सुरू झालेली ही शर्यत २६ मैल ३८५ यार्ड किंवा ४२ किमी. १९५ मीटर्स एवढा पल्ला मारून बोस्टन शहराच्या कोपाली स्क्वेअर या चौकात संपते. यंदा केनियाचा लॉरेन्स शेरोनो याने हे अंतर २ तास, ७ सेकंद, ५७ मिलिसेकंद एवढ्या वेळात कापून शर्यत जिंकली. या शर्यतीच्या मुळाशी अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धातल्या काही घटना आहेत. मात्र, मुद्दाम फारसा कुणी त्यांचा उल्लेख करीत नाहीत. कॅप्टन जॉन ब्राऊन आणि लेफ्टवंट हेन्री डी बर्निए या ब्रिटिश सैन्यातल्या दोघा अधिकार्यांनी त्यांचा हरकाम्या नोकर जॉन याच्यासह बोस्टन शहराच्या आसमंतात म्हणजेच तत्कालीन मॅसॅच्युसेट्स या वसाहतीत एक मोठा दौरा केला होता किंवा पदभ्रमण केलं होतं म्हणूया.

या पदभ्रमण मोहिमेत त्यांची भलतीच धावपळ झाली होती. वादळ, वारा आणि बर्फाचा मारा यांनी ते हैराण झाले होते. सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे ते हेरगिरी करतायत, हे स्थानिक लोकांनी ओळखलं होतं. एखाद्या हेराला त्याचं बिंग फुटणं यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नसते. लाजिरवाणी आणि धोक्याचीही. त्यामुळेच तर कित्येक मैल धावत, चालत कसेबसे ते एकदा आपल्या बोस्टनच्या छावणीत पोहोचले होते आणि त्यांनी जमा करून आणलेल्या माहितीच्या आधारावरच ब्रिटिश सेनाप्रमुख जनरल टॉमस गेज याने १९ एप्रिल, १७७५ या दिवशी अमेरिकन देशभक्त सैन्यावर लेक्झिंटन या ठिकाणी पहिला हल्ला चढवला. त्यापाठोपाठ काँकर्डची लढाई झाली. लेक्झिंटन आणि काँकर्डच्या लढाया या अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धातल्या पहिल्यावाहिल्या आणि चिरस्मरणीय लढाया. एकप्रकारे या ब्रिटिश हेरांच्या धावपळीची टिंगल करायला किंवा टिंगलयुक्त स्मरण करायला ‘बोस्टन अ‍ॅथलेटिक असोसिएशन’ या संस्थेने १८९७ साली ‘बोस्टन मॅरेथॉन’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. आता मुळात मॅरेथॉन शर्यत ही काय भानगड आहे, हेही सांगायला हवं.

इसवी सन पूर्व चौथ्या शतकातली कथा. ग्रीक साम्राज्य आणि पर्शियन साम्राज्य यांची घमासन युद्धं सुरू होती. त्यात मॅरेथॉन या ठिकाणचं युद्ध फारच विशाल आणि भीषण झालं. ते ग्रीकांनी जिंकलं. ही विजयाची वार्ता ग्रीसची तत्कालीन राजधानी अथेन्स शहरात तातडीने पोहोचविण्यासाठी ग्रीक सेनापतीने फिल्लिपिडस नावाच्या एका तरण्याबांड नौजवानाला बोलावलं आणि सांगितलं, “कुठंही थांबू नको. शक्य तितक्या वेगाने धावत जा आणि राजधानीत निरोप दे की, आपण जिंकलो.” तारुण्याने सळसळणारा आणि विजयानंदाने फुरफुरणारा फिल्लिपिडस तसाच निघाला नि बेहोषपणे धावत सुटला. कित्येक रानं, पठारं, डोंगर, दर्‍या, बर्फवृष्टी यांना तोंड देत तो अथेन्सला पोहोचला आणि ग्रीक सम्राटासमोर ‘नेनिक्कामेन, नेनिक्कामेन’ म्हणजे ‘आपण जिंकलो, आपण जिंकलो’, असं ओरडला. तो सुमारे १५० मैल किंवा २४० कि.मी. जराही न थांबता धावला होता. त्या अतिश्रमाने आणि आता एकदम थांबल्यामुळे तो एकदा कोसळला आणि मरण पावला.

आता या दंतकथेतल्या तपशीलाबाबत खुद्द ग्रीक इतिहासकारांमध्येच एकमत नाही. हिरोडोटस, प्लूटार्क इत्यादी प्राचीन ग्रीक इतिहासकार हीच गोष्ट वेगवेगळ्या तपशीलाने देतात. त्या तरुणाचं नावसुद्धा वेगवेगळं सांगतात. पण तरीही एकंदरीत युरोपच्या दंतकथा-लोककथांमध्ये ‘मॅरेथॉन’ या ठिकाणची लढाई आणि फिल्लिपिडसचा हा निरोप वगैरे गोष्टी फार लोकप्रिय आहेत. रॉबर्ट ब्राउनिंग हा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातला फार प्रख्यात असा ब्रिटिश कवी आणि नाटककार. त्याने १८७९ साली वरील दंतकथेवर ‘फिल्लिपिडस’ याच नावाची एक कविता रचली. ती कविता कमालीची लोकप्रिय झाली नि तेव्हापासून मूळ इतिहासातली मतमतांतरं बाजूला पडून ब्राउनिंगने कवितेत रंगवलेली घटना, हाच खरा इतिहास, असं जनतेने ठरवून टाकलं.

यानंतर १७ वर्षांनी म्हणजे १८९६ साली प्राचीन ऑलिम्पिक खेळ स्पर्धाचं आधुनिक स्वरूपात पुनरुज्जीवन झालं. जगभरचे सर्व देश आपापले संघ या स्पर्धांमध्ये उतरवू लागले, ते आजतागायत. हे सर्व आपल्याला माहीतच आहे. १८९६ सालच्या या पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मॅरेथॉन ते अथेन्स हे आधुनिक काळातलं २५ मैल किंवा सुमारे ४० कि.मी. अंतर धावण्याची एक स्पर्धा घ्यावी आणि तिला ‘मॅरेथॉन शर्यत’ असंच म्हटलं जावं, ही कल्पना मायकेल ब्रेल या फ्रेंच भाषाशास्त्रज्ञाची. ‘बॅरन पिअरे डि क्युबर्टिन’ हा ऑलिम्पिक स्पर्धांचा जनक. त्यालाही ती कल्पना आवडली. त्यानुसार घेण्यात आलेली पहिली मॅरेथॉन शर्यत ग्रीक धावपटू चारिलाओस व्हासिलाकोस याने ३ तास, १८ मिनिटे एवढ्या वेळात जिंकली.

आता हे सगळं झेंगट अमेरिकेत बोस्टनला कुठे पोहोचलं? असं पाहा की, साधारण १६२०-२५ सालापासून ब्रिटनमधले अनेक जण अनेक कारणांनी अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागले. तिथल्या विशाल मोकळ्या भूमीवर त्यांनी आपल्या वसाहती उभारल्या. पुढे स्थानिक रेड इंडियन टोळ्यांशी लढून, त्यांची कत्तल करूनदेखील अशा वसाहती उभ्या राहिल्या. बोस्टन, र्‍होड आयलंड, न्यूयॉर्क, न्यू हँपशायर, व्हर्जिनिया असा अमेरिकेचा पूर्व किनारा व्यापणारी ही गावं किंवा वसाहती या अमेरिकेतल्या ब्रिटिशांच्या आद्य वसाहती.

शंभर वर्षे उलटली आणि या अशा तेरा वसाहतींच्या, तिथल्या मूळ ब्रिटिश वंशाच्या, पण आता पूर्ण अमेरिकन बनलेल्या नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याची अस्मिता निर्माण झाली. त्यांचा ब्रिटिशांशी झगडा सुरू झाला. उत्तरोत्तर हे भांडण इतकं विकोपाला गेलं की, युद्ध केल्याशिवाय वसाहती आपल्या ताब्यात राहणार नाहीत, हे ब्रिटिश राजकारणी आणि सेनापती यांना समजलं. तसंच, युद्धाशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, हे अमेरिकन वसाहतींना कळून चुकलं. जनरल टॉमस गेेज आणि जनरल जॉर्ज वॉशिंग्टन हे खरं म्हणजे जिवाभावाचे सहकारी. दोघे ब्रिटिश सेनापती म्हणून फ्रेंचांविरुद्ध लढले होते. आता ते एकमेकांविरुद्ध उभे राहिले. जनरल गेज ब्रिटिश सेनेचं अधिपत्य करीत होता, तर जनरल वॉशिंग्टन अमेरिकन स्वातंत्र्यसेनेचा प्रमुख होता.

बोस्टन शहरात छावणी करून असलेल्या जनरल मेजला खबर लागली की, जवळच्याच लेक्झिंटन आणि काँकर्ड ठाण्यांमध्ये स्वातंत्र्यसेनेचा फार मोठा अन्नधान्य नि शस्त्रसाठा आहे. त्याचीच बित्तंबातमी काढण्यासाठी त्याने कॅप्टन ब्राऊन आणि लेफ्टनंट बर्निए या आपल्या हुशार हेरांना पायीपायी बोस्टन परिसरात पाठवलं. ही गोष्ट १७७५ सालची आहे. मोटारचा शोध लागलेलाच नव्हता. घोडा वापरला तर संशय येईल. म्हणून हे हेर बोस्टन ते काँकर्ड या परिसरात खूप फिरले. खाणावळी, दारुचे गुत्ते, जुगारी अड्डे या बातम्या मिळण्याच्या हमखास जागा. ते पालथे घालून त्यांनी खूप माहिती जमा केली. पण एके ठिकाणी मात्र त्यांचं बिंग फुटलं. तेव्हाच नेमकं बाहेर वादळ सुरू होतं. पण वादळ, वारा, हिमवर्षाव कसलीही पर्वा न करता ते धावत बोस्टनला गेले.

जनरल गेजने तातडी केली आणि स्वातंत्र्यसेनेची रसद भरण्यासाठी १९ एप्रिल, १७७५ या दिवशी लेक्झिंटनवर हल्ला केला. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धातली ही पहिली लढाई. पण, गेजच्या तातडीचा उपयोग झाला नाही. स्वातंत्र्यसैनिकांनी त्याच्याहीपेक्षा त्वरेने रसदसाठा अन्यत्र हलवला होता. पुढे रीतसर युद्धं झाली नि अखेर ब्रिटनचं वर्चस्व झुगारून अमेरिका हा स्वतंत्र नि सार्वभौम देश बनला. हा सगळा घटनाप्रवाह नि १८९६ सालची अथेन्स ऑलिम्पिकमधली मॅरेथॉन शर्यत यापासून प्रेरणा घेत ‘बोस्टन अ‍ॅथलेटिक असोसिएशन’ने १८९७ सालच्या १९ एप्रिलला पहिली ‘बोस्टन मॅरेथॉन’ आयोजित केली. १९ एप्रिल हा दिवस अमेरिकेत ‘पेट्रियटस् डे’-‘देशभक्तांचा दिवस’ म्हणून साजरा होतो. पुढे मात्र १९ एप्रिलऐवजी, एप्रिल महिन्याचा तिसरा सोमवार, असा दिवस नक्की करण्यात आला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, १८९७ ते १९८६ पर्यंत या शर्यतीतल्या विजेत्याला कोणतंही रोख बक्षीस मिळत नसे. ऑलिव्ह वृक्षाच्या पानांचा एक सुंदर मुकुट हेच बक्षीस. १९८६ पासून मात्र दृश्य बदललं. मुकुट ऑलिव्ह पानांचाच असतो, फक्त ती पानं सोन्याची असतात.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@