प. बंगालसह पूर्वोत्तरात मतदानाची सर्वाधिक लाट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2019
Total Views |



राज्यातील १० मतदारसंघांतील उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये

 


नवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या १७ व्या लोकसभा निवडणुकीतील दुसर्‍या टप्प्यात देशभरातील ९५, तर राज्यातील १० जागांसाठीचे मतदान आज पार पडले. देशभरातील आसाम, बिहार, छत्तीसगढ, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, मणिपूर, ओडिशा, पुद्दुचेरी, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मतदानाची सरासरी ६६ इतकी राहिली तर सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये ७६.४२ टक्के इतके झाले.

 

सकाळपासूनच मतदारांनी ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर गर्दी करत उत्साहाने आपला मतदानाचा अधिकार बजावला. छत्तीसगढ, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील हिंसाचार, हल्ल्याच्या तुरळक घटना वगळता सर्वत्रच मतदान शांततेत झाले. दुसर्‍या टप्प्यात जवळपास १५ कोटी, ७९ लाख मतदारांनी केलेल्या मतदानातून देशातील हेमा मालिनी, एच. डी. देवेगौडा, सदानंद गौडा, जितेंद्र सिंग, कनिमोळी, सुशीलकुमार शिंदे, राज बब्बर, फारुख अब्दुल्ला, अशोक चव्हाण, प्रकाश आंबेडकर, प्रीतम मुंडे यांच्यासह सुमार १ हजार, ६२९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.

 

तामिळनाडूतील लोकसभेच्या ३९ पैकी ३८ मतदारसंघांसह विधानसभेच्या १८ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक आयोगाने बुधवारीच रद्द केल्याने तसेच त्रिपुरातील एका जागेवरील निवडणूक लांबणीवर टाकल्याने तिथे आज मतदान झाले नाही. आधी या दोन्ही जागांवर आजच मतदान होणार होते. कर्नाटकातील १०, उत्तर प्रदेशातील ८, आसाम, बिहार आणि ओडिशामधील प्रत्येकी पाच, छत्तीसगढ, पश्चिम बंगालमधील प्रत्येकी तीन, जम्मू-काश्मीरमधील दोन, मणिपूर आणि पुद्दुचेरीमधील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान झाले. ओडिशा विधानसभेच्या ३५ जागांसाठीही आज मतदान झाले.

 

दरम्यान, पश्चिम बंगाल राज्यातील चोपडा या ठिकाणी तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली, ज्यामुळे एका मतदान केंद्रावरील इव्हीएम मशीनची मोडतोड झाली, तर ओडिशाच्या गंजाम इथे मतदानासाठी रांगेत उभ्या राहिलेल्या एका ९५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.

 

भाजप कार्यकर्त्याची हत्या

पश्चिम बंगालच्या पुरुलिया भागात एका भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळल्याने परिसरातील मतदान केंद्रांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी भाजप कार्यकर्त्याची हत्या केल्याचा आरोप करण्यात आहे. दरम्यान, शिशुपाल साहिस असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक भाजप नेत्यांनी शिशुपाल साहिस हे भाजप युवा मोर्चाचे काम करत असल्याचेही सांगितले. घटनेची माहिती मिळताच पुरुलियामध्ये मोठ्या संख्येने पोलीसबळ पाठविण्यात आले. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल-डाव्यांत हाणामारी

पश्चिम बंगालमध्ये इस्लामपूर लोकसभा मतदारकेंद्रात तृणमूल काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. दुसर्‍या टप्प्याच्या मतदानादरम्यान माकपचे उमेदवार आणि खा. मोहम्मद सलीम यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर तृणमूलच्या काही गुंडांनी हल्ला केल्याचा आणि मतदान केंद्रावर मतदारांना धमकविण्यात येत होते, असा आरोपही सलीम यांनी केला आहे. दरम्यान, तृणमूल आणि डाव्यांच्या संघर्षात इव्हीएम मशीनसुद्धा फोडण्यात आले.

 

छत्तीसगढमध्ये मतदानावेळी स्फोट, पोलीस जखमी

लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्याचे मतदान होत असतानाच छत्तीसगढमधील राजनंदगाव जिल्ह्यात नक्षल्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. यात आयटीबीपी दलातील कॉन्स्टेबल मन सिंह जखमी झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीला आता धोका नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प. बंगालसह पूर्वोत्तरात मतदानाची सर्वाधिक लाट आयईडी स्फोटाची घटना मनपूर-मोहला विधानसभा मतदारसंघातील मेधा आणि दब्बा गावाजवळ सकाळी १०.३० वाजता घडली. ज्या ठिकाणी हा स्फोट घडवून आणण्यात आला. तेथून जवळच्या अंतरावर सुरक्षारक्षक तैनात होते. मात्र, यामुळे एक जवान किरकोळ जखमी झाला आहेत.

 

नक्षलवाद्यांनी केली महिला अधिकार्‍याची हत्या

नक्षलवाद्यांनी ओडिशात मतदान सुरू असतानाच एका महिला अधिकार्‍याची हत्या केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यासाठी मतदान होत असताना हा प्रकार घडला आहे. तसेच मतदान केंद्राकडे जाणार्‍या अधिकार्‍याच्या गाडीला आग लावण्यात आली. नक्षल प्रभावित कंधमाल जिल्ह्यात या दोन्ही घटना घडल्या असल्याचे सांगितले गेले आहे. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची धमकीही नक्षलींनी दिली आहे.

 

मतदान करताना केले फेसबुक लाईव्ह

लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक प्रकार घडतात. आज अकोल्यात एका मतदाराने मतदानयंत्रच फोडले आहे तर दुसरीकडे मतदान करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने चक्क फेसबुक लाइव्ह केल्याचा खळबळजनक प्रकार उस्मानाबादमध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार तरुणांविरोधात सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.

 

बंगालमध्ये हिंदू मतदारांशी भेदभाव

दुसर्‍या टप्प्यातील मतदानावेळी पश्चिम बंगालमधील एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे. एका वृत्तवाहिनीने बंगालच्या रायगंज जिल्ह्यातील एका गावातील हिंदू मतदारांना मतदानापासून रोखल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे काही मतदारांनी असेही सांगितले की, त्यांच्या नावावर कोणीतरी दुसर्‍याच व्यक्तीने मतदान केले. “आम्ही ज्यावेळी सकाळी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलो, तेव्हा आमच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे आम्हाला समजले.” दरम्यान, वृत्तवाहिनीने प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, काही मुस्लीम लोकांनी हिंदू मतदारांना मतदान करण्यापासून रोखले. इतकेच नव्हे तर हिंदू मतदारांचे मतदान ओळखपत्रही चोरून नेले. दरम्यान, आम्ही भाजपचे समर्थक असल्यानेच आम्हाला मतदानापासून रोखल्याचा आरोप या मतदारांनी केला आहे. मुस्लीमबहुल गावातील हे सर्व मतदार असून, तिथे केवळ ६०० हिंदू राहतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@