देशासाठी बलिदान द्यायला निघालेल्यांना ठरवले दहशतवादी : साध्वी प्रज्ञासिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2019
Total Views |


साध्वी प्रज्ञासिंह यांचा काँग्रेसवर प्रहार'

 


भोपाळ :देशात केवळ मीच निवडणूक लढवत नसून मीदेखील निवडणूक लढवत आहे,” असे स्पष्ट करत, भाजपमध्ये देशासाठी काम करणारे लोक असल्यानेच मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे साध्वी प्रज्ञासिंह यांनी सांगितले. दिग्विजय सिंह यांचे नाव न घेता साध्वींनी टीका केली की, “त्यांना दहशतवाद्यांचा देश निर्माण करायचा आहे, त्यासाठी ते दहशतवाद्यांच्या नावामागे ‘जी’ लावतात. जे लोक देशासाठी बलिदान द्यायला निघालेत, त्यांना हे लोक दहशतवादी ठरवू पाहतात,“ असा प्रहारही यावेळी साध्वी प्रज्ञासिंह यांनी केला.

 

लांगूलचालनी राजकारणाला बळी पडलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून दिग्विजय सिंह यांच्याविरोधात उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला संबोधित केले. साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्लांपासून ते पीडीच्या मेहबूबा मुफ्ती, काँग्रेससह चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी विरोध केला होता. साध्वी प्रज्ञासिंह यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून या सगळ्यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेत त्यांच्यावर निशाणा साधला. “मी धर्मयुद्धासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून काँग्रेसने देशाला वर्षानुवर्षे भ्रमित केले. आज ते माझ्याविरोधात बोलतात, परंतु, काँग्रेसचे कितीतरी लोक जामिनावर बाहेर आहेत,” अशा शब्दांत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेसने केलेल्या आरोपावर पलटवार केला आहे.

 

साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, “काँग्रेसने इतकी वर्षे देशाला भ्रमित केले. त्या सगळ्यांना मी जनतेसमोर मांडणार आहे. काँग्रेसने ज्या भगव्याला दहशतवादी ठरवले, तोच माझा प्रमुख विषय आहे. मला या लोकांनी त्रास दिला, मारहाण केली, जे माझ्याबरोबर झाले ते इतरांबरोबर होणारच नाही, याची कोणी हमी देऊ शकतो काय?,” असा सवाल करत, “काँग्रेसींनी स्त्रीच्या शरीराला स्त्री समजले नाही, उद्या हे लोक स्त्री दहशतवादी असेही म्हणू शकतात,” असा आरोप साध्वी प्रज्ञासिंह यांनी केला. “मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी मी जामिनावर असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात येते, परंतु, त्यांचे कित्येक नेतेच नव्हे तर राष्ट्रीय नेतृत्वही जामिनावर आहे, त्यामुळे त्यांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही,” असा हल्ला यावेळी प्रज्ञासिंह यांनी केला.

 

मला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अडकविण्याचे कारस्थान काँग्रेसचेच होते. काँग्रेसमुळेच माझ्यावर दहशतवादाचे आरोप लावले गेले,” असे टीकास्त्र सोडत साध्वी प्रज्ञासिंह यांनी, “मला एनआयएने निर्दोष मुक्त केल्याचेही स्पष्ट केले. काँग्रेसला माझ्याविरोधात प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही,” असेही त्या म्हणाल्या.

 

तुरुंगात केले हाल, शारीरिक छळ

दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह यांनी तुरुंगातील भयानक घटना आठवत तिथे नेमके काय होत असे, तेही सांगितले. “माझ्याविरोधात षड्यंंत्र रचण्यात आले, मी खोटे बोलावे म्हणून तुरुंगात माझा छळ केला जात असे. 24 दिवसांपर्यंत मला फक्त पाणीच देण्यात आले, अन्नाचा एक कणही मला दिला नाही अन् आज काही लोकांना मला फाशी दिली जावी, असे वाटते,” असे त्या म्हणाल्या. यावेळी साध्वी प्रज्ञासिंह यांचे डोळे पाणावले.

 

मुस्लीम मतदारही इथलेच पुत्र

गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या टीकेबाबत साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या की, “देशाचे शत्रू-देशविरोधी लोक अशा गोष्टी बोलतच असतात आणि बोलतच राहतील. मी मुस्लीम मतदारांना सांगू इच्छिते की, तेदेखील याच धरतीमातेचे पुत्र आहेत.” दरम्यान, लोकसभा निवडणुकीबाबत त्या म्हणाल्या की, “आमची तयारी पूर्ण झाली असून आम्ही आमचा अजेंडा लवकरच सादर करणार आहोत.” सोबतच आपण दि. २३ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@