प्रतीक्षा सूचीतील पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2019   
Total Views |




राजघराण्यात जन्म झाल्यामुळे, पक्षाची मान्यता असल्यामुळे, अध्यक्षपद मिळाल्यामुळे राहुल गांधी यांना असे वाटते की, मीच देशाचा पंतप्रधान आहे. त्यांची भाषणे, त्यांची देहबोली, त्यांची नाटकबाजी, सर्व काही हेच दाखविते की, ते ‘प्राइम मिनिस्टर इन वेटिंग’ (प्रतीक्षा सूचीतील पंतप्रधान) आहेत. म्हणून त्यांनी आपली प्रतिमा मोदींविरुद्ध लढणारा, अखिल भारतीय स्तरावरील एकमेव नेता, अशी बनवत आणलेली आहे.

अ‍ॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटामध्ये एक प्रसंग आहे. प्रसंगाची पार्श्वभूमी अशी आहे की, मनमोहन सिंग मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे एकापाठोपाठ एक चव्हाट्यावर येत चालली आहेत. युपीएचा दुसरा कालखंड सुरू झालेला आहे. सोनिया गांधी, राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी आतुर झालेल्या आहेत आणि इकडे मंत्रिमंडळ बदनाम होत चालले आहे. तेव्हा त्या मनमोहन सिंग यांना म्हणतात,“अशा कालखंडात राहुल गांधी पंतप्रधान कसा बनेल?”

 

यानंतर २०१४ साली निवडणुका झाल्या. बदनाम मनमोहन सरकार आणि नव्या दमाचे नरेंद्र मोदी यांच्यात हा सामना झाला. मनमोहन सिंग यांचे सरकार गेले, मोदी यांचे सरकार आले. राहुलला पंतप्रधान बनविण्याचे सोनियांचे स्वप्न हवेत विरून गेले. पण, त्यांनी धीर सोडलेला नाही. राहुल गांधी यांनीदेखील आशा सोडलेली नाही. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना माहीत आहे की, गांधी परिवाराशिवाय काँग्रेसला गती नाही, आणि स्थितीदेखील नाही. देशभर मान्य होईल असा गांधी परिवार सोडून एकही चेहरा काँग्रेसकडे नाही. तसा चेहरा उभा राहणार नाही, याची भरपूर काळजी गांधी परिवाराने घेतलेली आहे. आज काँग्रेसचा चेहरा म्हणजे राहुल गांधी आणि राहुल गांधी म्हणजे काँग्रेस, असेच समीकरण आहे. राहुल गांधी यांना बळ देण्यासाठी प्रियांका गांधी यांना आणण्यात आलेले आहे. आई, मुलगा आणि मुलगी म्हणजे काँग्रेस पक्ष झालेला आहे आणि त्यांना सत्ता हवी आहे.

 

काँग्रेस पक्ष देशातील वयोवृद्ध पक्ष आहे. या पक्षाला स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, लाला लजपतराय, सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे वंदनीय महापुरुष या पक्षाने देशाला दिले किंवा असेही म्हणता येईल की, या वंदनीय महापुरुषांनी ‘काँग्रेस’ नावाचा पक्ष उभा केला. पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद इत्यादी थोर पुरुषांचा देखील काँग्रेसला मोठा करण्यात फार मोठा वाटा आहे. अशा काँग्रेसचे राहुल गांधी अध्यक्ष आहेत, यामुळे प्रसिद्धीमाध्यमे त्यांना टाळू शकत नाहीत. प्रियांका गांधींनादेखील टाळू शकत नाहीत. काँग्रेसच्या ज्या पदांवर ते आहेत, ती पदे फार महत्त्वाची आहेत आणि या पदांमागे महापुरुषांच्या मोठेपणाचे वलय आहे.

 

अन्यथा कोण राहुल गांधी, कोण प्रियांका गांधी, असा प्रश्न निर्माण झाला असता. वरुण गांधी हे गांधी घराण्यातीलच आहेत आणि मनेका गांधीदेखील गांधी घराण्यातीलच आहेत. परंतु, हे दोघेही जण काँग्रेसमध्ये नाहीत, काँग्रेसच्या कोणत्याही पदावर नाहीत, काँग्रेसचे वलय त्यांच्यामागे नाही. त्यामुळे कर्तृत्त्व असूनही त्यांना अखिल भारतीय मान्यता नाही. राहुल गांधी यांना आपोआप ती प्राप्त झालेली आहे, यात त्यांचे कर्तृत्त्व काही नाही. इंग्लंडच्या राजघराण्यात राजाला किंवा राणीला जो पहिला मुलगा किंवा मुलगी होते, ती राजघराण्याची वारस होते. हा वारसा मिळविण्यासाठी त्याचे किंवा तिचे कर्तृत्त्व शून्य असते, ते जन्माने प्राप्त झालेले असते. स्थान मिळविण्यासाठी या लोकांना जीवनात कसलाही संघर्ष करावा लागत नाही. एकेकाचे नशीब असे आपण म्हणू शकतो.

 

राजघराण्यात जन्म झाल्यामुळे, पक्षाची मान्यता असल्यामुळे, अध्यक्षपद मिळाल्यामुळे राहुल गांधी यांना असे वाटते की, मीच देशाचा पंतप्रधान आहे. त्यांची भाषणे, त्यांची देहबोली, त्यांची नाटकबाजी, सर्व काही हेच दाखविते की, ते ‘प्राइम मिनिस्टर इन वेटिंग’ (प्रतीक्षा सूचीतील पंतप्रधान) आहेत. म्हणून त्यांनी आपली प्रतिमा मोदींविरुद्ध लढणारा, अखिल भारतीय स्तरावरील एकमेव नेता, अशी बनवत आणलेली आहे. त्यांचे भाषण जम्मूत असो की, तिरुअनंतपुरममध्ये असो, कोलकात्यात असो की अहमदाबादमध्ये असो, भाषणाचा मुख्य विषय मोदी हाच असतो.

 

एकाच विषयावर भाषण करून कंटाळा येत नाही का, असा प्रश्न आपल्यापैकी काही जणांना पडेल. राजकारणी माणसांना असा प्रश्न पडत नाही. ‘मोदी पंतप्रधान आहेत, तर मी प्रतीक्षेतील पंतप्रधान आहे. मग मला मोदींविरुद्ध बोललेच पाहिजे, तेच ते आरोप सतत केले पाहिजे, ऐकणारे कंटाळले तरी आरोप केले पाहिजे, नवीन सांगण्यासारखे माझ्याकडे काही नसले तरी केले पाहिजे. स्वतःच्या पक्षाच्या जाहीरनाम्यावर बोलण्याऐवजी भाजपच्या जाहीरनाम्यातील उणिवा दाखवित राहिले पाहिजे. मोदींची छाती ५६ इंचांची आहे, तिच्यावर कधी बोलले पाहिजे. दोन सर्जिकल स्ट्राईक झाले, त्यावर संशय घेणारी वक्तव्ये देत राहिले पाहिजे. मोदी जे काही करतील ते कसे खोटे आहे, हे सातत्याने मांडत राहिले पाहिजे, असे केल्याशिवाय मी मोदींची जागा कशी घेणार?’ असा प्रश्न राहुल गांधी यांच्यापुढे असेल.

 

म्हणून राहुल गांधी अधूनमधून नरेंद्र मोदी यांना आव्हान देत असतात, “माझ्याशी वादविवाद करायला समोरासमोर या.” या प्रकारचे आव्हान त्यांनी आतापर्यंत २० ते २५ वेळा तरी दिले असेल. निदान एवढा वेळ तरी मी वाचल्याचे मला स्मरते. ते म्हणतात, “तुम्ही दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे सांगितले. काय झाले? राफेल विमानात गैरव्यवहार झाला आहे, ते स्पष्ट करा? नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी या सर्व चोरांची नावे मोदीच का?” असे अनेक प्रश्न राहुल गांधी उपस्थित करतात. काही प्रश्न उपस्थित करण्याचे राहिले असे मला वाटते. “संघाचा प्रचारक सत्तास्थानी जात नाही, मग तुम्ही कसे गेलात? अडवाणी आणि जोशी यांना तिकीट दिले नाही, हे तुम्ही त्यांच्या घरी जाऊन का नाही सांगितले? संघाची विचारसरणी देशाला घातक आहे, तिचा अवलंब तुम्ही का करता? काश्मीरचे ३७० कलम काश्मीरला भारताशी जोडून ठेवते, त्याच्या विरोधात तुम्ही का आहात?” असले प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले पाहिजेत. निवडणुकांचा हंगाम काही अजून संपलेला नाही, म्हणून पुढच्या काळात त्यांनी हे प्रश्न मोदींना जरूर विचारले पाहिजेत.

 

हा झाला गमतीचा भाग, पण थोडा गंभीरपणे विचार केला तर राजकीय वाद, चर्चा जरूर झाल्या पाहिजेत आणि या वाद, चर्चा सैद्धांतिक विषयावर व्हाव्या लागतात. आरोप करायला कुणाच्या बापाचे काय जाते? काहीही आरोप करता येऊ शकतात, कायद्याच्या कचाट्यात न सापडणारे आरोप कसे ठोकायचे याचा सल्ला देण्यासाठी कपिल सिब्बल, मनू सिंघवीसारखे सर्वोच्च न्यायालयाचे वकील सहज उपलब्ध आहेत, अशा फालतू आरोपांवर कधी वाद, चर्चा होत नसते. राहुल गांधींना वादविवादच करायचा असेल तर त्यांनी १८५८ साली लिंकन-डग्लास यांच्यात जो वाद झाला, त्याचा अभ्यास करावा. आठ ठिकाणी या दोन राजकीय नेत्यांत १८५८ साली वाद झाला. त्याचा मुख्य विषय होता, ‘अमेरिकेतील गुलामांची प्रथा, अमेरिकेचे ऐक्य आणि संविधान.’ या चर्चेचा स्तर इतका उंच आहे की, राजकीय विषय समजून घेण्यासाठी त्याचा अभ्यास करावा लागतो. फालतू आरोपांना उत्तर देण्यासाठी हा वाद-विवाद नव्हता. प्रतीक्षेत असलेल्या पंतप्रधानाने थोडे गंभीर झाले पाहिजे आणि गंभीर विषय उपस्थित केले पाहिजेत.

 

पाकिस्तानशी आपली विदेश नीती कोणत्या मूलभूत विषयांवर असली पाहिजे? चीनसंबंधी आपले दीर्घकालीन धोरण काय असले पाहिजे? काश्मीरचे भारतीय जनतेशी भावनिक आणि राष्ट्रीय ऐक्य आपल्याला कसे निर्माण करता येईल? आपले अंतर्गत सुरक्षा धोरण अधिक चांगले करण्यासाठी काय केले पाहिजे? अफाट गतीने वाढत जाणार्‍या लोकसंख्येला रोजगार देण्यासाठी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आपल्याला स्वीकारावी लागेल? हे सर्व प्रश्न राष्ट्राचा विचार करता गंभीर विषय आहेत, वाद-चर्चा या प्रश्नांवर झाली पाहिजे. ‘तू मोठा की मी मोठा, मी राजघराण्यातील, तू चहा विकणारा,’ ही अत्यंत हीन दर्जाची चर्चा आहे आणि पुन्हा ज्यांच्याशी चर्चा करायची आहे, त्याच्या सामर्थ्याची जाणीव ठेवली पाहिजे. इसाप एक गोष्ट सांगतो. एक लांडग्याचा कळप असतो. त्यातील एक लांडगा इतरांपेक्षा खूप शक्तिमान असतो. इतर लांडगे त्याला लांडग्याच्या कळपातील सिंह म्हणत. त्यामुळे त्यालाही वाटू लागले की, मीदेखील सिंहासारखा शक्तिमान आहे.

 

एकदा तो आपल्या कळपातील साथीदारांना म्हणाला,“मी जातो आणि सिंहाशी लढाई करून येतो. त्याला हरवतो आणि जंगलाचा राजा होतो.” कळपातील काही वयोवृद्ध लांडगे म्हणतात,“मुला, तू लांडग्याच्या कळपातील सिंह आहेस, परंतु सिंहाच्या कळपातील लांडगा आहेस, हे विसरू नकोस. लढायला जाशील, तुझं एक हाडूकदेखील शिल्लक राहणार नाही.” इसापची अशी गम्मत आहे की, तो अशी काही मार्मिक कथा सांगतो की, जी आजच्या प्रसंगालाही तंतोतंत लागू होते. कथेचा अर्थ वाचकांनी शोधावा.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@