देवेगौडा आणि कुटुंबकबिला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2019
Total Views |



सगळीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असताना विविध पक्षांचे काही वरिष्ठ नेते आपल्या कुटुंबकबिल्यामुळे व विशेषतः पुत्रप्रेमामुळे आपल्याच मतदारसंघात अडकून पडले आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या पक्षाच्या इतर उमेदवारांवर होऊ लागला आहे. माजी पंतप्रधान व कर्नाटकातील नेते एच. डी. देवेगौडा यांचे नाव यात शीर्षस्थानी आहे. देवेगौडा हे त्यांचा पक्ष ‘धर्मनिरपेक्ष जनता दला’चे अध्यक्षही आहेत. वय जास्त असूनही ते यावेळी तुमकुरू मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. त्याशिवाय निखिल कुमारस्वामी व प्रज्वल रेवण्णा हे त्यांचे दोन्ही नातू निवडणूक लढवत आहेत. निखिल हे कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे चिरंजीव असून ते मंड्या मतदारसंघातून तर देवेगौडांचे दुसरे चिरंजीव एच. डी. रेवण्णा यांचे पुत्र प्रज्वल रेवण्णा हे हासन या देवेगौडांच्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. देशभरात जवळजवळ सर्वच पक्षांमधून कुटुंबकबिल्याचे राजकारण केले जात असले, तरी देवेगौडांनी याबाबतीत जवळजवळ विक्रमच केला आहे. त्यांच्या पक्षाचा जीव एकतर तुलनात्मक छोटा. २२४ आमदार असलेल्या कर्नाटक विधानसभेत त्यांच्या पक्षाचे अवघे ३७ आमदार आहेत. पण, तरीही त्यांचे दोन्ही पुत्र कर्नाटक शासनाचे वरिष्ठ मंत्री असून त्यात कुमारस्वामी तर मुख्यमंत्री आहेत. आता देवेगौडांच्या या दोन्ही पुत्रांचे पुत्र लोकसभेच्या रिंगणात असल्याने देवेगौडांनी आपले सगळे लक्ष आपल्या व या दोन्ही नातवांच्या मतदारसंघावर केंद्रित केले आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघाचे इतर उमेदवार वार्‍यावर पडले आहेत. स्वतः देवेगौडा, त्यांचे दोन मंत्री पुत्र पक्षाची सर्व यंत्रणा तुमकुरू, हासन व मंड्या या मतदारसंघांसाठीच वापरत आहेत. आपल्या पक्षाचे अध्यक्ष माजी पंतप्रधान असतानाही प्रचारासाठी ते वेळ देत नसल्याने इतर उमेदवारांचे अक्षरशः वांदे झाले आहेत. एकतर कर्नाटकात सर्वाधिक आमदारांची संख्या भाजपची असूनही काँग्रेस व जनता दलाने अनैसर्गिक युती करून कानडी जनतेचा कौल धुडकावला आहे. त्यामुळे मुळातच देवेगौडा यांच्या पक्षाबाबत नाराजी असताना आता त्यांनी कुटुंबकबिल्याचे राजकारण सुरू केल्याने त्यांच्या पक्षामधूनच कुरबुर सुरू झाली आहे. त्यात पक्षाची कोणतीच रसद मिळत नसल्याने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेगौडांच्या पक्षात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.

 

नेते अडकले पुत्रप्रेमात...

 

कर्नाटकी देवेगौडांएवढे महाराष्ट्रातील कुटुंबकबिल्याचे राजकारण बटबटीत नसले तरी येथेही त्या राजकारणाचा प्रादुर्भाव झाला आहेच. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा पवारांच्या पार्थची आहे. एरवी पक्षाचे आक्रमक नेते अशी ओळख असलेल्या अजित पवारांची अवस्था पुत्रप्रेमामुळे पार बदलण्याच्या मार्गावर आहे. मावळमधील राजकारणामुळे अजित पवार अगदीच मवाळ झाल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर पवार मावळातून बाहेरच पडत नसल्याने राज्यभरातील राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या दादांच्या प्रचारसभेकडे डोळे लावून बसले आहेत. एकतर यावेळी जाहीर करण्यात आलेल्या पक्षाच्या उमेदवारांच्या यादीवर पूर्णपणे धाकल्या पवारांचे वर्चस्व आहे. असे असताना धाकले दादा पवार प्रचाराला यायचे नावच घेत नसल्याने उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मावळमध्ये शिवसेना-भाजपचे बर्‍यापैकी वर्चस्व असल्याने अजितदादा पार्थबाबत कोणतीही जोखीम घ्यायच्या तयारीत नाहीत. प्रत्येक निवडणुकीत राज्य पिंजून काढणारे अजित पवार आता मात्र पिंपरीपासून पेण-पनवेलपर्यंत गल्ल्या गल्ल्या प्रचारासाठी फिरत आहेत. तळकोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नारायण राणेंचीही अजित पवारांसारखीच अवस्था झाली आहे. त्यांचे ज्येष्ठ पुत्र माजी खासदार निलेश राणे सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधून ‘मस्वाप’च्या तिकिटावर रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात भाजप-शिवसेनेच्या महायुतीने राणेंचे कट्टर विरोधक विद्यमान खा. विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे. त्यात काँग्रेसने नेहमीप्रमाणे जातीय समीकरण जुळवत नवीनचंद्र बांदिवडेकर या भंडारी समाजातील उद्योजकाला उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. एकेकाळी शिवसेनेत व नंतर काँग्रेसमध्ये असताना राज्यभरात पक्षाचा प्रचार करणार्‍या नारायण राणे यांना आता सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांच्या बाहेर पडणे जिकिरीचे झाले आहे. त्यांना यावेळी काहीही करून निलेश यांना संसदेत पाठवायचे आहे. त्यामुळे इतर ज्या ठिकाणी ‘मस्वाप’ने उमेदवार दिले आहेत, त्या ठिकाणी प्रचारासाठी पोहोचणे नारायण राणेंना कठीण झाले आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीची मुलुखमैदान तोफ समजली जाते. परंतु, यावेळी त्यांनीही त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांची लढाई प्रतिष्ठेची केल्याने ते नाशिकच्या बाहेर पडण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळेच त्यांना प्रचारासाठी राज ठाकरेंसारख्या परपक्षातील नेत्याची मदत घ्यावी लागत आहे.

 
- शाम देऊलकर  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@