नवी मुंबईतून जखमी कोल्ह्याला जीवदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2019
Total Views |

मुंबईतील कांदळवनांमध्ये कोल्ह्यांचे अस्तिव  

मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून वन्यजीव बचाव कार्यकर्त्यांनी मंगळवारी मध्यरात्री 'गाॅल्डन जॅकल' प्रजातीमधील एका कोल्ह्याला जीवदान दिले. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे हा कोल्हा येथील एका इमारतीच्या आडोशाला थकलेल्या अवस्थेत लपून बसला होता. रहिवाशांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वन्यप्राणी बचाव संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या स्वयंसेवकांनी या कोल्ह्याला ताब्यात घेऊन वन विभागाकडे सुपुर्द केले.
 

 
 

मुंबई शहराला चारही बाजूंनी वेढलेल्या कांदळवनांमध्ये कित्येक वर्षांपासून कोल्ह्यांचे अस्तिव आहे. विक्रोळी, चारकोप, नवी मुंबई येथे खाडीलगत राहणाऱ्या नागरिकांना वरचेवर या जीवांचे दर्शन होत असते. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे थकलेले किंवा कुत्र्यांच्या हल्यात जखमी झालेले कोल्हे कांदळवनांबाहेर पडतात. अशा वेळी त्यांना जीवदान देण्याचे काम मुंबईतील प्राणिप्रेमी संस्थांकडून केले जाते. 'राॅ' या संस्थेने २०१७ पासून आजतागयत सहा जखमी कोल्ह्यांना वाचवले आहे. तर पूर्व द्रुतगती महामार्गावर रस्ते अपघातात सातपेक्षा अधिक कोल्ह्यांनी जीव गमावल्याची नोंद त्यांच्याकडे आहे.

 

या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मध्यरात्री कोपरखैरणे सेक्टर १९ येथील एका इमारतीमधून जखमी अवस्थेतील कोल्ह्याला ताब्यात घेतले. इमारतीमधील एका आडोशाला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या कोल्ह्यांचे वास्तव्य असल्याची माहिती रहिवासी श्रीकांत रासकर यांनी दिली. हा जीव कुत्रा असल्याचे भासत असल्याने रहिवासी त्याकडे दुलुर्क्ष करत होते. मात्र मंगळवारी मध्यरात्री हा प्राणी कोल्हा असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही 'राॅ'शी संपर्क साधल्याचे रासकर यांनी सांगितले. इमारतीपासून १०० ते २०० मीटर अंतरावर कांदळवन असल्याने तेथून हा कोल्हा इमारतीमध्ये आल्याची शक्यता 'राॅ'चे प्रमुख आणि ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी वर्तवली. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे थकलेल्या या मादी कोल्ह्याला ताब्यात घेतल्यानंतर वन विभागाच्या मदतीने तिच्यावर ठाण्याच्या पशुवैद्यकीय दवाखाण्यात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान कांदळवनांमध्ये राहणाऱ्या कोल्ह्यांचा अधिवास जपण्याकडे अधिक लक्ष देणे महत्वाचे असल्याचे शर्मा यांनी अधोरेखित केले आहे.

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat
@@AUTHORINFO_V1@@