खोटा कलंक पुसला जाणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2019
Total Views |


देशासमोर आता दोन प्रकारची उदाहरणे असतील. एक असेल हिंदूंना दहशतवादी ठरविण्याच्या प्रयत्नांचे आणि दुसरे असेल तो खोटा कलंक पुसून काढण्याचे

 

हिंदुस्थानच्या राजकारणाची पुढची दिशा कशी निर्धास्त आणि गरज पडल्यास बेदरकारही असू शकेल, याचा प्रत्यय देणारी घटना काल घडली. नरेंद्र मोदी आपल्या झंझावाती दौर्‍यात काय बोलतात याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागलेले असताना भोपाळमध्ये लोकसभेच्या जागेसाठी एक तिकीट जाहीर झाले. हिंदुत्वाचा आवाज राजकारणात बुलंद करण्याचे प्रयोग अनेक झाले आहेत. हिंदूंना ‘हिंदू’ म्हणून मतदान करायला लावण्यासाठी अनेक प्रयोगही झाले. अन्य धर्मीय जसे एकगठ्ठा मतदान करून महत्त्वाच्या निवडणुका फिरवितात, तसे हिंदूंच्या बाबतीत घडत नाही, ही एका अर्थाने हिंदू समाजाची नव्हे, तर या देशाची शोकांतिका होऊन बसली आहे. ‘सेक्युलॅरिजम’च्या नावाखाली चाललेली ही दांभिक परंपरा तुटण्याचे संकेत भोपाळहून येत आहेत. भारतीय जनता पक्षाचा भक्कम जनाधार असलेल्या भोपाळ या लोकसभा मतदार संघातून भाजपने साध्वी प्रज्ञासिंग यांना उमेदवार म्हणून जाहीर केले आणि देशभरात एकच रोमांच उमटला. नियतीचा काव्यगत न्याय की विचारपूर्वक टाकलेले राजकीय पाऊल असा प्रश्न पडावा, असा उमेदवारही प्रतिस्पर्धी साध्वी प्रज्ञासिंगांना लाभला आहे. हिंदू दहशतवादाचा फलक गळ्यात बांधून मुस्लीम मतांची बेगमी करीत फिरणार्‍या वाचाळवीर दिग्विजय सिंग यांच्यासमोर साध्वी लढतील. देशभरात भाजप ५४३ तिकिटे देईल, मात्र या एका तिकिटामुळे हिंदू मन ज्याप्रकारच्या दिग्विजयाचा अनुभव घेत आहे, तो केवळ अवर्णनीय आणि अभिमानाचाच मानावा लागेल.

 

कोण आहेत साध्वी प्रज्ञासिंग, असा सवाल जर का काल कुणी विचारला असता तर ‘हिंदू दहशतवादाच्या कुभांडाची दुर्दैवी बळी’ असा केविलवाणा परिचय द्यावा लागला असता. आता मात्र देशाच्या सर्वोच्च सदनात ही वाघीण डरकाळ्या फोडताना दिसेल. साध्वीच्या केवळ सदनात पोहोचण्यानेच अनेकांच्या कानाखाली आपोआपच जाळ निघाल्याचा भास होईल. ‘हिंदू दहशतवादा’चे कुभांड रचणारे चतुर म्हातारे आधीच लोकसभेच्या निवडणुकीतून काढता पाय घेऊन पसार झाले आहेत. पण, त्यांचा वारसा सांगणारे जे कोणी तिथे काँग्रेसच्या तिकिटावर पोहोचतील, ते साध्वीच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचे धाडस करतात का, हे पाहाणे ३०व्या लोकसभेत मोठ्या कुतूहलाचे असेल. लौकीक जीवनाचा त्याग करून संन्यास स्वीकारलेल्या एका महिलेला ‘गुन्हेगार’ ठरविण्याचा जो काही डाव काँग्रेसने खेळला, तो खूप मोठ्या षड्यंत्राचा भाग होता. ही मानसिकता १९९३ चीच होती. मुंबईतील बॉम्बस्फोटांनंतर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मुस्लीम परिसरातही एक बॉम्बस्फोट झाल्याची अफवा बेमालूमपणे पसरविली होती. बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍यांचा धर्म पवारांना कळला होता, पण तो जाहीरपणे सांगण्याचे धाडस त्यांच्यापाशी नव्हते. फरटोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडणार्‍यांकडून तशी अपेक्षा ठेवणेही चुकीचेच म्हणा!

 

देश कशाप्रकारच्या लोकांच्या हातात होता, याचे ते द्योतक आहे. हे बॉम्बस्फोट पाकपुरस्कृत होते, हे नंतर सिद्ध झालेच. पण, आज पुलवामा हल्ल्याला जसे सडेतोड उत्तर देऊन पाकला नामोहरम केले गेले, तसे करण्याचे धाडस तत्कालीन पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्षात मुळीच नव्हते. त्यामुळे १३व्या बॉम्बस्फोटाची अफवा पसरविणार्‍या पवारांच्या पराभूत मानसिकतेला धोरणीपणाचे लेबल चिकटविले गेले. अर्थात, हे करण्यात त्यांचे पोसलेले पत्रकार वगैरेच पुढे होते. जेव्हा गुन्हेगार मुस्लीम असतो, तेव्हा अशा कंड्या पिकवल्या जायच्या. मात्र, हिंदूंची वेळ येते तेव्हा न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी देशाचा तत्कालीन गृहमंत्री, कृषिमंत्री काँग्रेसचे सर्वच मोठे नेते आणि त्यांच्या तुकड्यांवर जगणारे लोक कामाला लागतात. न्यायालयाचा निर्णय यायचा असतो. मात्र, मीडिया ट्रायल अशा काही जोरजोरात चालविल्या जातात की, साध्वी प्रज्ञासिंग दहशतवादीच वाटायला लागते. अगदी तिच्या पाठीराख्यांचा बुद्धीभेदही अत्यंत जाणीवपूर्वक आणि पद्धतशीरपणे केला जातो. खरे तर इस्लामी दहशतवाद ही जागतिक समस्या. भारतात त्याचा विरोध होण्यापेक्षा आपले मतदार दुरावू नयेत म्हणून तोच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने उगाळला जातो. राजकारण्यांपासून ते कलाकारांपर्यंत सगळेच मग दहशतवादाला कसा धर्म नसतो, हे सांगण्यात हिरीरीने सहभागी होतात.

 

हीच मंडळी मग हिंदू दहशतवादाचा विषय येतो, तेव्हा चेवाने साध्वीने बॉम्ब कसा लावला, याच्या रम्य कथा सांगायला पुढे येतात. चॅनलवाले त्याची अर्कचित्रे तयार करतात. न्यायालयातल्या खटल्यांवरही मग अर्कचित्रांची मालिका केली जाते आणि खोट्याचे खरे करण्याचे उद्योग बेमालूमपणे केले जातात. ‘ठकासी असावे ठक’ या न्यायाने भाजपने साध्वींना तिकीट दिले आहे. होमहवन करून तिकिटाचा अर्ज भरायला जाणार्‍या सोनिया गांधी आणि बापजाद्यांच्या वारशाने मिळलेल्या पक्ष कार्यालयात गणेशाची मूर्ती ठेवून कामाला सुरुवात करणार्‍या प्रियांका गांधी लोकांनी पाहिल्या आहेत. मंदिर दर्शनाचे खोटे नाटक राहुल गांधी यापूर्वीपासूनच करीत आहेत. ते कसे जानवेधारी आहेत, हेसुद्धा देशाने पाहिले आहेत. ज्या कुणी माध्यममंडुकाने याला ‘सॉफ्ट हिंदुत्वा’ची उपमा दिली, ते आता साध्वींच्या निवडून येण्यावर काय भाष्य करतात, हे पाहणे रोचक असेल. साध्वींची प्रतिमा यापुढे एक दुर्दैवी महिला अशी नसेलच.

 

भाजपने साध्वींना कसे वार्‍यावर सोडले, याच्या कथा शिवसेनेच्या मुखपत्रानेही रंगवून सांगितल्या होत्या. सध्या भाजप, मोदी व फडणवीसांच्या कौतुकाचे पूल बांधणार्‍या शिवसेनेसाठीही हा थेट संदेश आहे. हे वापरण्याचे हिंदुत्व नसून त्या साध्वीने जे भोगले त्याची ही अत्यंत सन्मानजनक परतफेड आहे. साध्वी निवडणुकीत उतरल्याने देशभरातील हिंदुत्व मानणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये जे काही चैतन्य निर्माण होईल, त्याचा फायदा भाजपला मिळणार यात काही शंकाच नाही. टीव्ही चॅनलच्या पॅनलवर पोपटपंची करायला आलेले महाभाग याचे वर्णन राजकीय खेळी म्हणूनही करतील. त्याच्या विश्लेषणावर निवडणुका जिंकल्या किंवा हरल्या जात नसल्याने फारसा फरक पडणार नाही. मात्र, या देशाच्या राजकीय विचारप्रवाहाची दिशा नेमकी कोणती असेल ते अत्यंत खणखणीतपणे समारे येत आहेत. मुस्लीम लांगूलचालनाच्या परंपरेला छेद देत अमित शाहंनी जेव्हा उत्तर प्रदेशाची निवडणूक जिंकली होती, तेव्हाच खरे तर हे निश्चित झाले होते. आता हिंदू दहशतवादाचा खोटा कलंक पुसला जाताना या देशाला पाहायला मिळेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@