‘अ टायनी क्वीन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2019
Total Views |



 


निसर्गाच्या सुंदर दृश्यांना आपल्या जादूई हाताने लहान लहान आकारात त्यांच्या चित्रकृती साकारणार्‍याटायनी क्वीन’ महालक्ष्मी यांच्या अनोख्या कलेचा प्रवास पाहूया...

 

काही व्यक्तींना निसर्गत:च कोणती ना कोणती अनोखी देणगी मिळालेली असते. मग ती चित्रकला असेल, नृत्य किंवा संगीत... अशाच एक अवलिया कलाकार म्हणजे कांदिवलीच्या महालक्ष्मी वानखेडकर. कागदांपासून अत्यंत लहान वस्तू तयार करण्याची आणि त्यांची सुंदर निसर्गचित्रे बनविण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसाद केले असून त्यांच्या या प्रत्येक वस्तूकडे बघताना अवाक् व्हायला होतं.

 

महालक्ष्मी अगदी लहानपणापासूनच निसर्गप्रेमी... झाडे, फुले-पाने, पक्षी यांच्याशी त्यांची खूपच आत्मियता असल्याने त्यांनी निसर्गाला आपल्या चित्रातून अधिकच खुलवले. त्यांची निसर्गचित्रे इतकी हुबेहूब असतात की, क्षणभर ती खरी आणि अक्षरश: जीवंत वाटतात. महालक्ष्मी यांनी लग्नानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ‘चित्रकला शिक्षका’चा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर बोरिवलीच्या एका शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून त्या रुजू झाल्या. त्यांनी शाळेतच एलिमेंटरी परीक्षेची तयारी मुलांकडून करून घेण्यास सुरुवात केली. विविध स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेऊन अनेक बक्षिसे जिंकली. परंतु, एका अपघातामुळे नोकरी सोडावी लागल्याने त्यांनी मग घरातच चित्रकलेचे शिकवणी वर्ग सुरू केले.

 

‘मध्यरात्र’ हा त्यांचा चित्र काढण्याचा आवडता काळ. कागदापासून लहान प्रतिकृती बनविण्यात म्हणजेच ’टायनी कटिंग पेपर आर्ट’मधील सुंदर कलाकृतींमुळे ‘लिंक रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये त्यांची नोंद झाली असून या कलेत वर्चस्व असणार्‍या त्या एकमेव महिला कलाकार आहेत. सध्या त्या आठ फूट एवढी मोठी नवीन कलाकृती साकारत असून त्या कलाकृतीत तब्बल १०० पक्षी आपल्याला दिसतील. यासाठी जवळजवळ दोन ते तीन वर्ष इतका कालावधी लागेल. त्यांच्या पक्ष्यांच्या कलाकृतींमध्ये पंखांना खूप महत्त्व असून अत्यंत बारीक कटिंग करून त्या कागदाला आकार देतात. त्यांनी बनविलेला ‘सुगरणीचा खोपा’ इतका सुरेख आहे की, जणू तो खराखुरा खोपा वाटतो. पाने, फुले, रंग, आकार यांची उत्तम समज असल्यामुळे त्यांची कोणतीही कलाकृती इतकी हुबेहूब वाटते की, बरेचजणांची फसगतही झाली आहे. अशीच एक आठवण सांगताना महालक्ष्मी म्हणाल्या की, “मी एक पक्षी तयार करून टेबलावर ठेवला असता, तो चक्क कुत्र्याने खरा समजून खाल्ला,” असा गंमतीदार किस्सा त्यांनी सांगितला.

 

त्यांच्याकडे अशा अनेक कलाकृती आहेत, ज्या तयार करणे हे त्यांच्या स्वत:साठीच एक आव्हान असतं. यासाठी मनाची एकाग्रता आणि स्थिरता खूप महत्त्वाची असल्याचे त्या सांगतात. महालक्ष्मी म्हणतात की,“मी माझ्या कलेला कधीच एक साच्यात बसविण्याचा प्रयत्न करीत नाही. प्रत्येक गोष्टीत मला नवीन काही तरी मिळत जाते. अगदी प्रत्येक माणसाकडून सुद्धा खूप वेगवेगळ्या गोष्टी मला शिकायला मिळतात. आजूबाजूच्या अगदी छोट्या-छोट्या वस्तू खूप प्रेरणा देणार्‍या आहेत.'' त्यांच्या अनेक अप्रतिम कलाकृती एअर इंडिया आणि इतर अनेक नावाजलेल्या कंपन्यांनी विकत घेतल्या असून त्यांच्या चित्रांचे चीनच्या संग्रहालयात प्रदर्शनही भरविण्यात आले होते. त्यांना आजतायागत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून अनेक देशी-विदेशी कंपन्या त्यांच्या ग्राहक आहे.

 

त्यांनी आयुर्वेदातसुद्धा संशोधन केले असून अनेक विज्ञान परिषदांमध्ये त्यांना बक्षिसे मिळाली आहेत. त्यांच्या नावावर सध्या ५० पेटंट नोंदणीकृत असून आयुर्वेदिकगोष्टींमध्ये त्यांनी अनेक प्रसाधने तयार केली आहेत. यामध्ये त्यांना अजून नवीन शोध करायचे असून त्यात त्यांना त्यांचा मुलगा मदत करीत आहे. आपली कला वाढावी, ती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी त्या विविध कार्यशाळा घेतात. गरीब मुलांसाठी मोफत कार्यशाळा घेऊन त्यांना या कलेचे धडे देतात. महालक्ष्मी यांनी आपल्या चित्रकार वडिलांना प्रेरणास्थानी ठेवले आहे. त्यांच्याकडूनच त्यांना या कलेचे बाळकडू मिळाले आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवूनच स्वतःची ओळख बनविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सामान्य मराठी कुटुंबातून आलेल्या महालक्ष्मी यांना एक महिला म्हणून यात करिअर करण्यास कोणीच रोखले नाही, उलट त्यांना त्यांच्या घरातून पूर्ण पाठिंबा असल्यानेच त्या कलेला न्याय देऊ शकल्या. काहींनी त्यांच्या या कलेची टिंगलही उडविली. मात्र, त्यांच्या आजच्या यशाने त्यांना योग्य उत्तर मिळाले. या पेपर आर्टमध्ये महिला कलाकार नसल्याची त्यांना खंत आहे. यासाठी महालक्ष्मी अनेक वेळा महिलांसाठी मोफत वर्ग घेतात. खरे पाहता, काही वेगळं करण्याची ऊर्मी असल्याशिवाय या कलेत प्राण ओतणे शक्य नाही.या कलेचे वेगळेपण त्यांनी जपले आहे. त्यांच्या या कलाकृतींचा प्रवास असाच सुरू राहावा, जेणेकरून ही अनोखी कला जगभरात पोहोचेल, यासाठी त्यांना खूप शुभेच्छा...!

 

- कविता भोसले
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@