सेल्फीचा नाद खुळा...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2019   
Total Views |

21 वे शतक हे विज्ञान, तंत्रज्ञानाचे युग आहे. मानवाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जी अफाट प्रगती केली आहे त्याचे मनुष्याच्या दैनंदिन जीवनावर अनेक चांगले-वाईट परिणाम झाले आहेत. चांगलं ते घ्यायचं आणि वाईट ते सोडून द्यायचं, या तत्त्वज्ञानाने मार्गक्रमण केल्यास सर्वच गोष्टींचा सदुपयोग करता येऊ शकतो. परंतु, खरोखरंच तसं केलं तर त्याला मनुष्य कसं म्हणता येईल? तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून आपला फायदा करून घेणार्यांची संख्याही काही कमी नाही. त्यामुळेच तर गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच सायबर गुन्ह्यांच्याही संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
 
 
जगातील प्रगत देशांमध्ये तंत्रज्ञान बरेच आधी आले असले, तरी भारताच्या दृष्टीने विचार केल्यास दोन दशकांपूर्वी साधा मोबाईल म्हणजेही एक प्रतिष्ठेचे लक्षण समजले जायचे. आधी मोबाईलवर आऊटगोईंग 18 रुपये प्रतिमिनिट असा दर होता. एवढेच नव्हे, तर इनकिंमगसाठी 16 रुपये दर लागायचा. कालांतराने मोबाईलच्या क्षेत्रात क्रांती झाली. हळूहळू स्मार्ट फोन्स आले. संगणक, घड्याळ, कॅल्क्युलेटर, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी आणि एक ना अनेक सोयी एवढ्याशा स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध झाल्या. यामुळे एक स्मार्टफोन खिशात असला की संपूर्ण जग तुमच्या कवेत, अशी आजची स्थिती आहे. अशातच स्मार्ट फोन्समध्ये स्वत:चे छायाचित्र काढण्याची सोय उपलब्ध झाली. स्वत:च स्वत:चे छायाचित्र काढण्याची ही वाढती क्रेझ म्हणजेच सेल्फीचा नाद खुळा! सेल्फीचे हे लोण जगभरात इतके वेगाने पसरले की, सेल्फी नेमकी कुठे आणि कशाची काढायची, याचे भानसुद्धा आजकाल राहिलेले नाही. बरं, सेल्फीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे, एवढी साधी गोष्टही, याचे वेड लागलेल्यांना कळत नाही. एक सेल्फी काढायची, ती सोशल मीडियावर टाकायची आणि वाहवा मिळवायची, यासाठी हा सर्व खटाटोप असतो. सेल्फी घेताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटना दररोज कुठे ना कुठे घडत असतात. परंतु, आजच्या तरुणाईवर किंबहुना स्मार्टफोन्सचा वापर करणार्यांवर याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. ऐतिहासिक वास्तू, विमान, रेल्वे, बस, पर्यटनस्थळं, मंदिरं या व दैनंदिन जीवनातील इतर अनेक ठिकाणी सेल्फी काढण्याचा आनंद हे लोक लुटत असतात.
 
 
 
 
 
परंतु, सर्व प्रकारच्या सेल्फी काढण्याच्या या वाढत्या क्रेझमुळे संपूर्ण जगभरात सध्या हाहाकार उडाला आहे, नव्हे, काही घटनांमध्ये तर याला फक्त आणि फक्त मॅडपणा असेच म्हणावे लागेल. जेवण किंवा पर्यटनासाठी बाहेर असताना आपली मुलं तर सेल्फीच्या नादी लागली नाहीत ना, या चिंततेत जर तुम्ही असाल तर काहीतरी अघटित घडू शकते, यासाठी तुमचे मन नक्कीच घट्ट करा. बरं, मोबाईलमधून सेल्फी नीट काढता येत नसल्याने त्यासाठी सेल्फी स्टिकचा आविष्कार करण्यात आला. आधी सेल्फी फोन्स आणि आता सेल्फी स्टिक्स. या आता केवळ सोयीचा भाग राहिल्या नसून, ते स्वयंशोषणाचे एक नवे चिन्ह तयार झाले आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. सेल्फी फिव्हरमुळे सध्याची आणि येणारी पिढी आणखी एकाकी राहील, असंही अनेक तज्ज्ञांना वाटत आहे. सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले.
 
सेल्फी कशासोबत काढावी, याला आता काहीच मर्यादा राहिली नाही. यासाठी काही नियम, कायदे नसल्याने कुणाचे कुणावरच नियंत्रण नाही. त्यामुळे कुणी स्वत: तिरडीवर झोपून स्वत:ची सेल्फी काढतो, तर कुणी आपल्या मैत्रिणीला नग्न होऊन सेल्फी काढण्याचा आग्रह करतो आणि नकार दिल्यास तिची हत्या करतो. एवढी मजल या सेल्फीच्या क्रेझने मारली आहे. मध्यंतरी, सहस्रकातील महानायक अमिताभ बच्चन सेल्फीसंबंधी नुकत्याच आलेल्या एका अनुभवामुळे खूपच व्यथित झाले होते. कायम महानायकाच्या भोवती असलेल्या, परंतु तेवढ्याच असंवेदनशील युवा चाहत्यांच्या या कृत्याबद्दल बच्चन यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. या मुद्यावर सोशल मीडियावर खूप चर्वितचर्वणही झाले होते. झाले असे होते की, अमिताभ बच्चन आपल्या एका मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी गेले असता तिथेही चाहत्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा सपाटा लावला. यामुळे बच्चन खूपच दु:खी झाले. ‘‘खूपच वेदनादायक, ना मृत व्यक्तीबाबत आदर, ना काळवेळेचे भान,’’ या शब्दांत अमिताभ यांनी ट्विटरवर आपला संताप व्यक्त केला होता.
 
असल्या प्रकारामुळे अमिताभ बच्चन संतापले असतील किंवा दु:खी झाले असतील तर ते एकटे नाहीत. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली. यामध्ये एका अल्पवयीन मुलाने व्हेंटिलेटरवर असलेल्या आपल्या मित्राच्या आईसोबत सेल्फी घेतली आणि फेसबुकवर पोस्ट केली. मुलांचा हा खूपच पाषाणहृदयी दृष्टिकोन आहे, असे मत मुंबईच्या नानावटी सुपर रुग्णालयातील नामवंत मानसोपचारतज्ज्ञाने यावर व्यक्त केले होते. सेल्फीच्या वाढत्या क्रेझमुळे भारतातील लहान मुलांमधील संवेदनशीलताच संपुष्टात येत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. दु:खद आणि गंभीर प्रसंगी सेल्फी घेणे हे निश्चितच सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही आणि यावर शक्य तेवढ्या लवकर आळा घालण्याची गरज असल्याचे मत आणखी एका तज्ज्ञाने व्यक्त केले. सेल्फी काढण्याचा नाद म्हणजे एक व्यसन आहे, असे मी अजूनही मानायला तयार नाही. यावेळी तल्लफ, इतर गोष्टींमध्ये रस नसणे, संबंध आणि इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होते. अशाप्रकारच्या वर्तनाने विशिष्ट सीमा ओलांडली तरच समुपदेशनाची गरज आहे, असे नवी दिल्लीच्या बीएलके सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कन्सल्टिंग मनोविकारतज्ज्ञ डॉ. (ब्रिगेडियर) एस. सुदर्शनन यांनी म्हटल्याचे आपल्या स्मरणात असेलच.
स्वभावविषयक तज्ज्ञांनी सेल्फीचे प्रामुख्याने तीन गटात वर्गीकरण केले आहे. मित्रांसोबत घेतलेल्या सेल्फी, एखाद्या कार्यक्रमात घेतलेल्या सेल्फी आणि शारीरिक उपस्थिती, असे ते तीन प्रकार आहेत. जे लोक खूप मोठ्या प्रमाणात सेल्फी पोस्ट करतात त्यांच्यात स्वस्तुती करण्यासारख्या स्वभाववैशिष्ट्याचा स्तर जास्त असतो, असे नुकत्याच करण्यात आलेल्या आणि सायकॉलॉजी ऑफ पॉप्युलर मीडिया कल्चर या जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. नियमित अंतराने सेल्फी पोस्ट करण्याचा नाद लागल्यास अल्पवयीन मुलांच्या मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी ते घातक ठरू शकते, असे मत फोर्टिस हॉस्पिटलमधील मानसिक आरोग्य व स्वभाव विज्ञान विभागाचे संचालक डॉ. समीर पारिख यांनी म्हटले होते. अशाप्रकारच्या स्थिर विचारांमुळे बालकांवर विपरीत प्रभाव पडतो, असेही त्यांनी म्हटले होते.
 
सेल्फीच्या वाढत्या संस्कृतीमुळे समाजातून मिळणार्या प्रोत्साहनापासून वंचित युवक राहतात, ही मुलं मीडियातील आभासी आणि तांत्रिक जगात अधिकाधिक गुरफटत जातात. अशाप्रकारे अतिएकाग्रतेमुळे हवा तेवढा सामाजिक सहवास मिळत नाही आणि एकप्रकारचा दुरावा निर्माण होतो, असा इशाराही डॉ. पारिख यांनी दिला होता.
मुंबईस्थित नानावटी हॉस्पिटलच्या एका मनोविकारतज्ज्ञाने सेल्फीच्या अति नादी लागण्याचे प्रामुख्याने तीन नकारात्मक प्रभाव सांगितले आहेत. सेल्फीच्या अति नादामुळे जी मुलं दिसायला फार सुंदर नसतात त्यांच्यात एकप्रकारचा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. दुसरे म्हणजे यामुळे युवापिढीमध्ये असंवेदनशीला वाढत आहे आणि सतत सेल्फीच्या विश्वात रममाण असल्याने त्याचा मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो, असे त्यांनी नमूद केले आहे.
मेक्सिकोत घडलेल्या एक घटनेत, डॉक्टरी वेशभूषेत आणि गळ्यात स्टेथोस्कोप अडकवलेल्या वैद्यकशास्त्राच्या युवा विद्यार्थिनीने रुग्णालयातील बेडवर गंभीर अवस्थेत असलेल्या एका वृद्ध महिलेसोबत हसतमुखाने सेल्फी घेतली. ‘‘मी कर्तव्यावर होती, तिथे एका महिलेचा मृत्यू होताना बघितला आणि मी सेल्फी घेतली,’’ असे तिने आपल्या व्हॉटस्अॅप पोस्टमध्ये म्हटले होते. तिची पोस्ट वार्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि मृत्युशय्येवर असलेल्या एका रुग्णाबाबत तिने दाखविलेल्या असंवेदनशीलतेवर प्रचंड टीका झाली. काय म्हणायचे या प्रकाराला?
 
 
 
बबन वाळके
@@AUTHORINFO_V1@@