समाजाचं करू उत्थान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2019
Total Views |



एखादी संस्था उभी राहते ती केवळ लोकांच्या सहकार्यानेच. लोक, समाज हा त्याच्या मूलस्थानी असतो. समाज आपल्याला घडवतो, तेव्हा आपण त्या समाजाचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे देणं लागतो. समाजाचे ऋण कोणत्याही प्रकारे फेडण्याचा प्रयत्न करणं आणि ते फेडणं महत्त्वाचं असतं. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणार्‍या आंबोली या लहान गावात एका तरुणाने वयाच्या २५ व्या वर्षी स्वत: व्यवसाय निर्माण केला व त्यातून संपूर्ण सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मागास, खेड्यातील लोकांना रोजगार मिळवून दिला. ‘आंबोली टुरिझमया संस्थेतर्फे लोकोत्थान साधणारा हा तरूण आहे निर्णय राऊत.

कोकणाकडे पर्यटनाच्या दृष्टीने पहिले जाते. मालवण, तारकर्ली अशी मोजकी ठिकाणे जी सर्वांना माहीत असतात, केवळ तिथे पर्यटनाचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे लोकांचे लक्ष जात नाही, ती ठिकाणे ‘गुगल मॅप’वर पण दिसत नाही. पर्यायाने तेथील वस्त्यांचा, लोकांचा, कलेचा विकास होत नाही. कारण, त्या ठिकाणांना समाजासमोर आणलेच जात नाही. ही गोष्ट निर्णय राऊत यांनी हेरली. त्यांनी लहान-लहान खेड्यातील लोकांचा विकास व्हावा, तेथील कला, परंपरा समाजासमोर याव्यात यासाठी ‘आंबोली टुरिझम’ ही संस्था २०१६ साली स्थापन केली. ही संस्था जरी पर्यटन संस्था दिसत असली तरी, अन्य व्यावसायिक संस्थांप्रमाणे ही ’धंदा’ करीत नाही. या संस्थेचा उद्देश कोकणातील वंचित, मागास समाज पुढे यावा, काही दुर्लक्षित पर्यटन स्थळे आहेत, तेथील इतिहास, तेथील संस्कृती यांचे जतन व्हावे हा आहे. आंबोलीसह परिसरातील इतरही गावांमधून रोजगार उपलब्ध व्हावा तसेच निसर्गाचे संवर्धन करत पर्यटन वाढावे यासाठी ‘आंबोली टुरिझम’ची सुरुवात झाली आहे.

 

निर्णय हे पुण्यातून पदवीचे शिक्षण पूर्ण करून घरी आले, तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, शिक्षणासाठी बाहेर पडण्याआधी म्हणजे सहा वर्षांपूर्वी जी गावाची किंवा जवळपासच्या खेड्यांची परिस्थिती होती, ती अजूनही तशीच आहे. लोकांमध्ये, आर्थिक स्थितीमध्ये काहीच फरक पडलेला नाही. याचे उत्तर शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, येथील रोजगाराची साधने मर्यादित आहेत आणि ती केवळ पावसाळ्यापुरती मर्यादित आहेत. कारण, आंबोली हे थंड हवेसाठी प्रसिद्ध असल्याने केवळ पावसाळ्यात इथे रोजगार मिळतो. पण, नंतर दहा महिने बेरोजगारी. भात शेती जेमतेम होते. यावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी कोकणचा अभ्यास केला व त्यातून उभी राहिली ‘आंबोली टुरिझम’ संस्था.

 

यासाठी या संस्थेसाठी निवडलेले सहकारी हे कोणी एमबीए, व्यवस्थापकीय अभ्यास केलेले लोक नाहीत, तर निर्णय राऊत यांनी खेड्यातील सामान्य लोक, मग त्यात अगदी पायवाटा शोधणारे, आदिवासी, निसर्गाची जगाच्या शाळेत माहिती असणारे, आपली कला व्यावसायिक न करता ती परंपरागत जपणारे स्थानिक असे सहकारी निवडले आहेत. येथील जनता कधी इंटरनेट, सोशल मीडिया यांच्या संपर्कात आलेली नव्हती. वीज, पक्के रस्ते या मूलभूत गरजांपासूनही ती दूर होती. आपल्या माहिती व तंत्रज्ञानाच्या ज्ञानाचा उपयोग निर्णय यांनी येथील जनतेसाठी करायचा ठरवला. त्यासाठी त्यांनी ’आंबोली टुरिझम’चे संकेतस्थळ सुरू केले. त्यावर या स्थळांची, परंपरा, कला यांची माहिती दिली. अर्थात, ही संस्था चालू करताना मनात होते ते केवळ येथील जनता पुढे यावी हेच. काही आर्थिक गुंतवणूक नसताना ते समाजासाठी कार्य करू लागले.

 

या संस्थेमध्ये मुख्यत्वे दुर्लक्षित घटकांना पुढे आणणे, स्थानिकांना रोजगार मिळवून देणे, ग्रामीण जनतेचे उपलब्ध निसर्गसंपत्तीच्या माध्यमातून उत्थान करणे हे कार्य केले जाते. येणार्‍या पर्यटकांचा आणि स्थानिक लोकांचा संपर्क करून दिला जातो. अनेक ठिकाणी असे दिसते की, पर्यटन स्थळ असल्यामुळे अव्वाच्या सव्वा किंमत सांगितली जाते. पर्यटकांना लुबाडले जाते. पण, या संस्थेत स्थानिकांच्या प्रगतीसोबत पर्यटकांचाही विचार केला जातो. त्यांना आर्थिक लुबाडले जात नाही. कारण, केवळ स्थानिकांचा फायदा होईल, त्यांना रोजीरोटी मिळेल एवढेच पैसे पर्यटकांकडून आकारले जाते. निर्णय यांना हा केवळ व्यवसाय म्हणून करायचा नव्हता, तर आपल्या समाजाला पुढे आणण्यासाठी, रोजगार निर्माण करण्यासाठी माध्यम हवे होते.

 

जंगल सफर, रिव्हर ट्रेकिंग, टेंट कम्पिंग, नाईट जंगल सफर, बटरफ्लाय, अ‍ॅनिमल वॉचिंग, ग्रामीण पर्यटन, कल्चरल सहल, कृषी पर्यटन अशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. हे करताना स्थानिकांना थोडेफार याचे प्रशिक्षण देणे, माहिती देणे हे काम निर्णय यांनी केले. जवळ जवळ दोन वर्ष पूर्वतयारी केल्यानंतर त्यांनी या संस्थेला सुरुवात केली.

या कार्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला. निर्णय हे स्वत: पत्रकार आहेत. त्यांनी त्यांची ही संकल्पना अनेक लोकांपर्यंत पोहोचवली. त्या लोकांच्या सहकार्यातून उभ्या राहिलेल्या या संस्थेतून जवळ जवळ ५०० ते ६०० लोकांना रोजगार मिळाला. अनेक स्थानिकांना काम मिळाले. मग वाटाड्यापासून, ड्रायव्हरपासून, कोकणी पद्धतीचे चुलीवरचे जेवण करून देणे, जंगलातील अनेक रहस्य दाखवणे अशी विविध छोटी मोठी कामे कधी मागास राहिलेली ही जनता करू लागली. अगदी मधाचे पोळे काढणार्‍यांनासुद्धा यामध्ये समाविष्ट केलेले आहे. यामध्ये ‘चूल आणि मूल’पर्यंत मर्यादित असणार्‍या स्त्रियाही सहभागी झाल्या. आपल्या उत्तम जेवण करता येण्याचा अनुभव त्यांना इथे उपयोगी पडला. स्थानिकांच्या ज्ञानाच्या आधारे ‘गुगल मॅप’ पण ज्या जागा दाखवू शकत नाहीत, त्या जागा दिसू लागल्या. पर्यटन, व्यवसाय, स्थानिकांचे हित आणि उत्थान यांचे एकत्रिकीकरण निर्णय यांनी साधले. परदेशी नागरिकसुद्धा उत्साहाने या संस्थेद्वारे कोकणाचा आनंद घेतात. कोकण हा असा प्रांत आहे, जिथे कधीही या काहीतरी नवीन असते, प्रत्येक ऋतूचे वैशिष्ट्य असतेच. निर्णय राऊत त्यानुसार आपल्या योजना त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित करत असतात.

 

आंबोली हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. येथील जैवविविधतेने भरलेला निसर्ग व सर्व प्रकारचे पर्यटनासाठी अनुकूल असलेले स्थळ. मात्र, या ठिकाणी बारा महिने रोजगार उपलब्ध नाही. नोकरीसाठी पुणे, मुंबई शहरात तरुणांना जावे लागते. इतर कोणताही येथे व्यवसाय नाही, ज्याने रोजगार सर्वांना उपलब्ध होईल. येथे पावसाळ्यातील फक्त दोन ते अडीच महिने पर्यटन होते. तोच काही तो रोजगार. हे ठिकाण बारमाही पर्यटनासाठी अनुकूल असल्याचे लक्षात घेता येथे रोजगार उपलब्ध व्हावा, येथील निसर्गाचे संवर्धन करत पर्यटन व उपलब्ध आहे त्यातून समाजाला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, लोकांचा विकास व्हावा यासाठी ‘आंबोली टुरिझम’ची सुरुवात केली. सुरुवातीला अनेक अडचणी समोर होत्या. माझे कोणतेही व्यवसायिक शिक्षण झालेले नाही तरी, येणार्‍या अडथळ्यांवर मात करत बाराही महिने निसर्गाच्या माध्यमातून आणि तंत्रज्ञानाशी सांगड घालत मी व्यवसाय निर्माण केला. सांगायला आनंद होतो की, आज याद्वारे ५००-६०० लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे,” असे या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष निर्णय राऊत म्हणतात. या संस्थेला जो काही फायदा होतो, त्यातून गरीब, होतकरू, सैनिकांच्या मुलांना, मागास शाळांना आर्थिक साहाय्य केले जाते. या संस्थेशी संलग्न असणारी लोकं एकत्र येऊन ज्यांना काही पाठबळ नाही, अशांसाठी खास सहल आयोजित करतात.

 

- दर्शन राऊत 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@