सुरेश भट यांच्या आठवणींना उजाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2019
Total Views |

 

 

 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी हे मराठी भाषेवरचं प्रेम आपल्याला ज्या व्यक्तीमुळे अनुभवता आलं असे भारतातील एक प्रसिद्ध गझल सम्राट म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा सुरेश भट यांची आज जयंती. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची आणि संगीताची प्रचंड आवड असल्यामुळे लहानपणीपासूनच सुरेश भट यांना कवितांचं बाळकडू मिळालं असं म्हणायला हरकत नाही. सुरेश भट अडीच वर्षांचे असताना त्यांना पोलियोची बाधा झाली आणि त्यांचा उजवा पायाला अपंगत्व आलं. मात्र त्यांनी हार मानली नाही आणि शरीरसाधनेने आणि व्यायामाने त्यांनी आपलं बाकीचं शरीर मजबूत बनवलं ज्याचा उपयोग त्यांना आपल्या सांगीतिक कारकिर्दीत देखील झाला.
 
 
 
 

सुरेश भट यांच्या संगीत प्रेमाची सुरुवात त्यांच्या शाळेतील बँडपथकापासून झाली. त्या पथकात ते बासरी वाजवत असत. प्रकृती ठीक नसताना ते अंथरुणात बसून तासन तास बासरी वाजवत, हे बघून त्यांचे वडील श्रीधरपंत यांना त्यांची संगीताची गोडी लक्षात आली आणि त्यांनी त्यांना संगीताचे शिक्षण द्यायचा निर्णय घेतला. ठरवल्याप्रमाणे प्रल्हादबुवांकडे त्यांचं संगीताचं शिक्षण सुरु झालं. हळूहळू ते ढोलकीमध्ये देखील पारंगत झाले. त्यांची कला त्यामुळे अधिकच बहरत गेली.

 
 
 

सुरेश भटांचं सर्व शिक्षण अमरावतीमध्ये झालं. बी.ए. च्या अंतिम वर्षात दोन वेळा नापास झाल्यावर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. याच काळात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. एकदा त्यांनी लिहिलेल्या कवितांचा एक कागद ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडला. आणि मग सुरेश भटांच्या त्या कवितांना हृदयनाथ मंगेशकरांनी चाली लावल्या. त्या कविता नंतर अजरामर झाल्या. एल्गार, झंझावात, रंग माझा वेगळा, रसवंतीचा मुजरा, सप्तरंग असे अनेक कविता संग्रह सुरेश भट यांनी लिहिले जे आजही आपल्या स्मरणात आहेत.

 

अशा या महान कवीची १४ मार्च २००३ रोजी प्राणज्योत मालवली मात्र त्यांच्या कविता आपल्या जीवनाला कायमच उजाळा देतील आणि आपला मराठीबाणा जागृत ठेवण्यास मोलाचा हातभार लावतील यात शंका नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@