क्षयरोगाचे समाजशास्त्र भाग १

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2019
Total Views |


 


क्षयरोग अतिप्राचीन आजार असून मानवाला इ. स. ५००० वर्षांपूर्वीच्या वैदिक युगातही त्याचे अस्तित्व ज्ञात होते. ‘क्षय’ म्हणजे ‘झीज’ होणे. क्षयरोगात शरीराची हळूहळू झीज होऊन अखेर शरीर अस्थिपंजर बनते. परिणामी, रुग्ण दगावतो. ‘मायक्रो बॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसजीवाणूंच्या संसर्गामुळे उद्भवणारा हा आजार सुरुवातीला फुप्फुसांना होतो. यालाच ‘फुप्फुसाचा क्षयरोग’ म्हणतात.

 

श्वासावाटे शरीरात प्रवेश झालेले क्षयजंतू फुप्फुसांच्या वायुकोशामध्ये जाऊन स्थिरावतात. तिथल्या वायुकोश महाभक्षीकोशिका पेशी क्षयजंतूंचे भक्षण करतात. या पेशींमध्ये जंतूसंख्येने वाढतात. महाभक्षीकोशिका पेशींमध्ये बदल घडून त्या ‘इपिथेलॉईड’ पेशी बनतात. या पेशी रक्तावाटे शरीराच्या मेंदू, मस्तिष्कावरण, हाडे, प्लूहा, मूत्रपिंड, सांधे, मणके, डोळे, त्वचा, आतडी, लसिकाग्रंथी, पेरिकार्डयम, प्रजनन संस्थेचे अवयव इत्यादी भागांत पसरतात आणि तेथे संसर्ग निर्माण होतो. यालाच ‘फुप्फुसांव्यतिरिक्त शरीरातील इतर अवयवांचा क्षयरोग’ म्हटले जाते. एकूण क्षयरुग्णांपैकी जवळपास ८० टक्के क्षयरुग्ण फुप्फुसाच्या क्षयरोगाचे असतात. जगातील एकूण क्षयरुग्णांपैकी एक तृतीयांश क्षयरुग्ण भारतात आढळतात. क्षयरोग भारतातील गंभीर आरोग्य समस्या असून दररोज जवळपास हजार लोकंचा त्या आजाराने मृत्यू होतो. प्रत्येक सांसर्गिक क्षयरुग्णामुळे दरवर्षी १० ते १५ व्यक्तींना संसर्ग होतो. त्यामुळे क्षयरुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

 

क्षयरोगावर अफाट संशोधन झाले आहे आणि होत आहे. त्या संसर्गाविरोधी तसेच आजारामुळे उद्भवणार्या गुंतागुंतीचा सामना करण्यासाठी प्रभावी प्रतिजैविके उपलब्ध झालेली आहेत आणि होत आहेत. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग विरोधी औषधे रुग्णांना मोफत पुरवण्यात येतात. योग्य, नियमित आणि पूर्ण औषधोपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होतो. परंतु, अनियमित आणि अपूर्ण उपचार तसेच स्थलांतरामुळे ही आरोग्य समस्या उग्ररूप धारण करू लागली आहे. एचआयव्ही संसर्गाच्या अस्तित्वामुळे तसेच ‘एमडीआर’ आणि ‘एक्सडीआरटीबी’च्या वाढत्या प्रभावामुळे अडचणींत भर पडून आजारामुळे होणार्या मृत्यूंच्या प्रमाणात वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. फुप्फुसाचा क्षयरोग अत्यंत संसर्गजन्य आजार असून लहान मुले, अशक्त माणसे, क्षयरुग्णाच्या सहवासात राहणार्‍या व्यक्ती, एचआयव्हीबाधित तसेच इतर कोणीही त्याला सहज बळी पडू शकतात.

 

धोकादायक व्यवसाय वा नोकरी तसेच, व्यसनाधिनतेचे प्रमाण अधिक असल्याने पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असते. वय जसजसे वाढत जाते, तसतसा क्षयजंतूंच्या संसर्गाचा धोका वाढत जातो. कारण, वय वाढत जाते, तशी रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते. शहरी आणि ग्रामीण भागात हा आजार आढळत असला तरी, शहरात त्याचे प्रमाण अधिक आहे. जगातील जवळपास एक चतुर्थांश लोकांच्या शरीरात क्षयजंतू असल्याचे आढळते. संसर्ग झाल्यानंतर क्षयरोग होईल किंवा नाही हे शारीरिक स्थिती आणि पोषणावर अवलंबून असते. रोगप्रतिकारशक्ती चांगली असली, तर क्षयजंतू संसर्गानंतरदेखील आजार उद्भवत नाही. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास संसर्ग डोके वर काढतो. महिलांना १८ ते ४५ वर्षे त्या प्रजनन कालावधीमध्ये गरोदरपण, बाळंतपण, स्तनपानामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने क्षयरोगाचा धोका अधिक असतो.

 

क्षयरोग गरिबी, निरक्षरता, अज्ञान, जीवनमान, लोकसंख्या, कुपोषण, शहरीकरण, औद्योगिकीकरण इ. सामाजिक घटकांशी निगडित असलेला आजार आहे. म्हणून या आजाराला रोखण्यासाठी सदर सामाजिक घटकांमध्ये सुधारणा व्हायला हवी. रोगप्रसाराची साखळी खंडित करणे, योग्य व पूर्ण औषधोपचार आणि आजाराचा धोका असणार्यांना ठराविक व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध झाल्यास हा आजार सहज नियंत्रित ठेवता येतो. क्षयरोग फक्त झोपडपट्ट्या, चाळी, फूटपाथवर राहणार्‍या लोकांना होतो, हा निव्वळ गैरसमज असून हा आजार गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, लहान-मोठा असा भेदभाव करीत नाही. विकसनशील देशांतील अर्थार्जन करणारे १८ ते ५८ वर्षे वयोगटातील लोक व्यवसायाच्या अनुषंगाने क्षयरोगाला बळी पडल्याने कुटुंबाचे उत्पन्न घटत असून गरिबी आणखी गडद होत आहे. पर्यायाने ही समस्या आणखी गंभीर रूप धारण करीत आहे.

 

भारतातील ८० टक्के रुग्ण या वयोगटात मोडत असल्याने देशाची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या दरवर्षी अंदाजे बारा हजार कोटी रुपयांची हानी होते. या आजारामुळे १३ अब्जांपेक्षा अधिक उत्पादनक्षम कामाचे दिवस वाया जातात. दरवर्षी देशात तीन लाख मुलांना क्षयरोगामुळे शाळा सोडावी लागते. कारण, त्यांना किंवा त्यांच्या घरातील इतरांना क्षयरोग असतो. दरवर्षी जवळपास एक लाखांपेक्षा अधिक महिलांना क्षयरोग झाल्यामुळे कुटुंबातून नाकारले जाते. हा आजार राष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीमधील प्रमुख अडथळा आहे. वंध्यत्व असलेल्या ७० टक्के महिलांमध्ये क्षयरोग हे वंध्यत्वाचे कारण असते. धुम्रपान, अतिमद्यसेवन, तंबाखू आणि मादक पदार्थांचे सेवन इ. व्यसनांनी शरीराची हानी झाल्याने शरीरात क्षयजंतूंचा फैलाव होण्यास संधी मिळते. इम्युनोसत्रेसिव्ह औषधे घेत असलेल्या रुग्णांना हा आजार होण्याचा मोठा धोका असतो. मधुमेह, श्वेतपेशी, कर्करोग, जंत, हिवताप, गोवर, डांग्या खोकला इ. आजारांमध्ये क्षयरोग डोकावू शकतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@