होमियोपॅथीक तपासणी - केस टेकिंग भाग - १५

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2019
Total Views |


 


होमियोपॅथी तज्ज्ञाचा मुख्य उद्देश हा रुग्णाच्या आजाराचा मुख्य व केंद्रीय अडथळा म्हणजेच आजाराचे मूळ शोधणे हा असतो. रुग्ण सांगत असलेल्या अनेक तक्रारींमधून व भरपूर लक्षणांमधून केंद्रीय अडथळा शोधून काढणे ही खरोखरच एक कला आहे.

 

तीव्र व नुकत्याच सुरू झालेल्या आजारामध्ये हा केंद्रीय अडथळा किंवा आजाराचे मुख्य कारण शोधणे सोपे जाते. कारण, लक्षणे आणि त्यांची तीव्रता ही सुस्पष्ट असते. परंतु, जुनाट आजारांमध्ये व अनेक वर्षांच्या रोगांमध्ये आजाराचे मूळ झाकले जाऊ शकते. याचे कारण या अनेक वर्षांत रुग्णाला नानाविध लक्षणे दिसत असतात व अनेक घटनासुद्धा त्याच्या आयुष्यात घडत असतात. त्यामुळे माणसाच्या चैतन्यशक्तीला खालावण्याचे निश्चित कारण शोधणे थोडे कसोशीचे काम असते. माणसाची मानसिक स्थिती ही माणूस कुठल्या परिस्थितीत आहे, यावरूनही ठरत असते.

 

उदाहरणार्थ, जेव्हा एखादा माणूस सांगतो की, तो वेळेचा अगदी पक्का आहे व कुठल्याही परिस्थितीत वेळ पाळतो, तेव्हा त्याचे हे विधान हे अनुभवानेच प्रमाण होते. ‘वेळेचा पक्का’ माणूस हा दिलेल्या वेळेच्या नेहमी पाच मिनिटे किंवा त्यावेळेस हजर असतो. ही झाली वेळेची किंमत. परंतु, काही रुग्ण जेव्हा सेकंद व मिनिटांचा हिशोब ठेवतात, तेव्हा मात्र ते लक्षण अतिशय खास व महत्त्वाचे असते. ते आजाराचे लक्षण नसते, तर ते त्या रुग्णाचे स्वत:चे खास लक्षण असते. माझा एक रुग्ण मला फोन करून सांगायचा की, “डॉक्टर, मी बरोबर ५ वाजून ३७ मिनिटांनी तुमच्याकडे येईन” आणि बरोबर ५.३७ ला तो हजर होत असे. एका मिनिटाचाही विलंब त्याला सहन होत नसे. हे त्याचे खास लक्षण होते. अशा प्रकारची खास लक्षणे ही केस टेकिंगमध्ये अत्यंत महत्त्वाची असतात.

 

माझा एक रुग्ण मला म्हणाला की, ऑफीसमध्ये अत्यंत तणावाचे वातावरण असेल किंवा त्याला खूप ताण येत असेल, तर तो आतील खोलीत जातो किंवा बाथरूममध्ये जातो व ५ ते १० मिनिटे छान संगीत ऐकतो व गाणे म्हणतो. अशामुळे त्याचा ताण लगेच निवळून जातो. म्हणजेच संगीत ऐकून बरे वाटणे हे त्याचे स्वत:चे असे खास लक्षण आहे. त्याचा त्याच्या आजाराशी काही संबंध नाही. त्यामुळे हे लक्षण फार महत्त्वाचे ठरते. कारण, ते त्यांच्या चैतन्यशक्तीकडून आलेले असते. दिसणारे लक्षण हे केंद्रीय अडथळ्याचे आहे हे कसे कळते?

 

तर हे लक्षण जर आजार होण्याच्या आधीपासूनचे असेल, तर ते आजाराचे नाही, तर त्या माणसाचे लक्षण असते आणि म्हणूनच होमियोपॅथीक तपासणीमध्ये रुग्णाची माहिती विचारताना त्याला त्याच्या आयुष्यातील घटनांबद्दल विचारले जाते. मनावर होणारा परिणाम व त्याबद्दलची त्याची प्रतिक्रिया हीसुद्धा पाहिली जाते. रुग्णाच्या बालवयापासून ते आतापर्यंत सर्व घटना ज्या रुग्णाला मानसिकरीत्या शारीरिकरीत्या त्रासदायक असतात, त्यांचा अभ्यास केला जातो. म्हणूनच ‘होमियोपॅथीक केस टेकिंग’ ही नुसती माहिती घेणे नसून, ती एक कला आहे. पुढील भागात आपण केंद्रीय अडथळा जाणून घेण्यासाठी काय उपाय योजिले जातात, त्याबद्दल विस्ताराने माहिती घेणार आहोत.

 

(क्रमश:) 
डॉ. मंदार पाटकर 

(लेखक एम.डी. होमियोपॅथी आहेत.)

९८६९०६२२७६

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@