ग्रहीय भूशास्त्राची संक्षिप्त माहिती आणि लेखमालेचा समारोप...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2019   
Total Views |



गेल्या ८-९ महिन्यांपासून आपण पृथ्वी आणि पृथ्वीवरील निरनिराळ्या नैसर्गिक गोष्टींची, घटनांची माहिती घेत आलो. पृथ्वीवरील खडक, नद्या, खंड आदी विविधांगांनी आपल्या माहितीत भर घालणाऱ्या या लेखमालेचा आजचा अखेरचा भाग असून इथेच लेखमालेचा समारोप करत आहोत.


मागील लेखात आपण भूजलाचे प्रकरणही बघून संपवले होते. या लेखात आधी आपण आत्तापर्यंत बघितलेल्या माहितीचा सारांश अगदी थोडक्यात बघू. आत्तापर्यंत आपण भूशास्त्राच्या कितीतरी शाखांबद्दल जाणून घेतले आहे. भूकंपशास्त्रात भूकंपांचा अभ्यास, ज्वालामुखीशास्त्रात ज्वालामुखींचा अभ्यास, खनिजशास्त्रात निरनिराळ्या खनिजांचा अभ्यास, खडकशास्त्रात वेगवेगळ्या खडकांचा अभ्यास तसेच त्यांचे प्रकार, तयार होण्याच्या पद्धती यांचाही अभ्यास, नंतर नदीशास्त्रामध्ये नद्या आणि हिमनद्यांचा अभ्यास, समुद्रांचा अभ्यास, पृथ्वीच्या रचनेचा आणि तिच्या विविध प्राकृतिक घटकांचा अभ्यास (जसे वली, स्तर-भ्रंश, इ.), पृथ्वीच्या इतिहासाचा अभ्यास, जगातील विविध खंडांचा अभ्यास आणि शेवटी भूजलाचा अभ्यास अशा गोष्टी आपण बघितल्या. या सगळ्या शाखांशिवाय भूशास्त्राची एक अजून शाखाही आहे. त्या शाखेला ‘ग्रहीय भूशास्त्र’ (Planetary Geology) असे म्हटले जाते. या शाखेला ‘खगोलभूशास्त्र’ (Astrogeology) किंवा ‘बहिर्भूशास्त्र’ (Exogeology) असेही म्हटले जाते. नावाप्रमाणेच आपल्याला समजलेच असेल की, या शाखेमध्ये परग्रहावरील भूशास्त्रीय रचनांचा अभ्यास केला जातो. नुसते ग्रहच नाहीत, तर या शाखेमध्ये उपग्रहांचाही अभ्यास केला जातो. याचबरोबर विविध अशनी, धूमकेतू, इत्यादींचाही भूशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास केला जातो. जेव्हा आपण याची व्याख्या बघतो, तेव्हा आपल्याला समजते की, या शाखेत अजून काय काय अंतर्भूत आहे. मानवाने चंद्रावर अनेक याने, बग्गी (Buggy- मानवनियंत्रित गाडी) अगदी मानवही पाठवले आहेत. आपल्या भारतानेही ‘चांद्रयान-१’ पाठवले. आता ‘चांद्रयान-२’ची तयारी सुरू आहे. याशिवाय मंगळयानाला विसरता तरी येईल का? अमेरिकेचे ‘क्युरिऑसिटी रोव्हर’ तर कधीपासून मंगळावर आहे. या सगळ्या संयंत्रांमधून जी माहिती (Data) परत येते, त्याचा वापर करून या ग्रहांचे नकाशेही तयार करण्यात आले आहेत. पृथ्वीप्रमाणेच अनेक वैशिष्ट्ये या ग्रहांवरसुद्धा सापडली आहेत. काही काही वैशिष्ट्ये तर पृथ्वीवरही अस्तित्वात नाहीत अशी आहेत. या सगळ्या वैशिष्ट्यांचा अभ्यास, तसेच कधीकधी या वैशिष्ट्यांचे पृथ्वीवरील वैशिष्ट्यांशी जोडलेले नाते या गोष्टीही ग्रहीय भूशास्त्रात येतात. यांपैकी चंद्र आणि मंगळ यांच्या काही अगदी महत्त्वाच्या वैशिष्ट्यांवर नजर टाकू.

 

आपला उपग्रह चंद्र हा बराचसा पृथ्वीसारखाच आहे. त्यामुळे त्याला ‘पृथ्वीचा लहान भाऊ’ म्हणतात ते खोटं नाही बरं! चंद्राचे अंतरंग साधारण पृथ्वीप्रमाणेच आहे तसेच, त्याच्या पृष्ठभागावर जे काळे डाग आहेत, जे आपल्याला उघड्या डोळ्यांनीही दिसतात, ते बेसॉल्ट खडकांचे बनलेले आहेत. ते डाग म्हणजे खरे तर प्राचीन लाव्हाचे प्रवाह आहेत, जे आता स्थायुरूप झाले आहेत. चंद्रावर पाण्याचेही अस्तित्व सापडले आहे. चंद्रावर अनेक विवरे आहेत. त्यातली काही विवरे ही आता मृत झालेल्या ज्वालामुखींची आहेत, पण बरीचशी ही अशनींची टक्कर झाल्यामुळे आहेत. काही विवरे ही फार मोठ्या आकाराची आहेत. यावरून चंद्रावर आदळणारा अशनी किती मोठा असेल याची कल्पना येते. जर चंद्र नसता, तर पृथ्वीचा बचाव करायला अवकाशात कोणीही नसते आणि या अशनी सरळ पृथ्वीवर येऊन आदळल्या असत्या. काय हाहाकार माजला असता याची कल्पना न केलेलीच बरी! त्यामुळे चंद्र आपले या धोकादायक अशनींपासून रक्षण करतो. याबद्दल त्याला धन्यवादच दिले पाहिजेत. मंगळाकडेही जराशी नजर टाकल्यास आपल्याला असे समजेल की मंगळावर लोहाचे (Iron) प्रमाण जास्त असल्यामुळेच मंगळाला लाल रंग आला. मंगळावरही बर्फ रूपामध्ये पाण्याचे अस्तित्व सापडले आहे. मंगळावरील ऑलिम्पस मॉन्स (Olympus Mons) हा ज्वालामुखी आपल्या अख्ख्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी आहे. याखेरीज हा जवळजवळ २२ किलोमीटर उंच आहे. आपल्या सागरमाथा (Mt. Everest) च्या जवळजवळ अडीच पट! यामुळेच हा आपल्या सूर्यमालेतील कोणत्याही ग्रहावरील सर्वात उंच पर्वत आहे, तर सूर्यमालेत दुसऱ्या क्रमांकाचा पर्वत आहे. पहिला क्रमांक वेस्टा (Vesta) या अशनीवरील ऱ्हियासिल्विया (Rheasilvia) या पर्वाताने पटकावला आहे.

 

 
 

तर, आपण अगदी थोडक्यात ग्रहीय भूशास्त्र या शाखेची तसेच चंद्र आणि मंगळ यांच्या भूशास्त्रीय वैशिष्ट्यांची माहिती घेतली. या लेखमालेत एकूण ३२ भाग, तर भारत-पाकिस्तानमधील पाणीकपातीचा एक असे एकूण ३३ भाग आत्तापर्यंत प्रकाशित झाले आहेत. भूशास्त्रामधील एकूण १५ विविध गोष्टींची माहिती आपण घेतली. आता मात्र निरोपाची वेळ येऊन ठेपलेली आहे. ज्या काही गोष्टी आपण बघितल्या, त्यांमध्ये फार खोलात, म्हणजे अगदी ‘अ-ब’पर्यंत आपण शिरलो नाही. बऱ्याच गोष्टी आपण वरवरच बघितल्या. याचे कारण म्हणजे एखाद्या तांत्रिक गोष्टीत फार आत आत शिरलो, तर वाचकांना कंटाळा येण्याची शक्यता असते. माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगतो. ही लेखमाला सुरू करण्याआधी मी या लेखमालेसाठी उपयुक्त असे संदर्भग्रंथ शोधत होतो. एका नावाजलेल्या पुस्तकांच्या दुकानात मी विचारले, “अहो, जिओलॉजीचे पुस्तक आहे का?” दुकानदाराचे उत्तर ऐकून मी हैराण झालो. तो मला विचारतो, “जिओलॉजी म्हणजे काय?” मला वाईट वाटले. असे अनुभव आधीही आले आहेत. एवढा सुंदर विषय हा पण, बऱ्याच लोकांना माहीतच नाही. याविषयी जनजागृती करण्याचे फार उपक्रम वगैरे होत असलेले माझ्या तर ऐकिवात नाही. म्हटला तर कठीण, पण जरा अभ्यास केला आणि एकदा आवडायला लागला, तर अजून अभ्यास करावा वाटेल, असा हा विषय. अशा भूशास्त्र या विषयाचे ज्ञान माझ्या आवाक्याप्रमाणे मला वाचकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली, याबद्दल मी दै. ‘मुंबई तरुण भारत’चा आभारी आहे. या लेखांमधली माहिती सर्व वाचकांना समजलीच असेल, असा दावा मी करणार नाही. किंबहुना, मला या विषयातील सर्व काही समजते असाही दावा मी करणार नाही. तरीही, अनेक लोकांनी मी भारतात असताना फोन करून आणि आता व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करून त्या त्या वेळी ‘तुमचा लेख आवडला’ हे आवर्जून सांगितले. मुंबईचे अरविंद जोशी, पालघरचे दांडेकर, मनमाडवरून प्रकाश पेटकर यांनी फोन करून मला प्रतिक्रिया दिल्या. नवी मुंबईचे बिस्किटवाला काका, नाशिकचे लाखलगावकर आणि पुण्याचे श्रावण पिल्लाई यांनी तर अनेक वेळा संपर्क केला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या लेखांना अशोक आंबेकर, सदाशिव पाटोळे, पद्मजा नाफडे-कुलकर्णी, शंकरजी गायकर यांनी प्रतिक्रिया दिल्या किंवा त्यांवर प्रश्न विचारले आणि माझेही ज्ञान वाढवले. अजूनही अनेक जण आहेत, पण सर्वांची नावे लिहून ठेवण्यात थोडी गल्लत झाली आणि ती नावे गेली. पण या सर्वांचे मनापासून आभार. उपरोल्लिखितही कोणाच्या नावात अथवा स्थानात गल्लत झाली असल्यास दिलगिरी. हे सोडून सोशल मीडियावर शेअर केलेल्या लेखांनाही प्रतिक्रिया आल्या. त्या सर्वांचेही आभार.

 

भूशास्त्र या विषयावर मराठीमध्ये काही फार लिखाण असल्याचे मला माहीत नाही. त्यामुळे काही संज्ञा मला स्वतःच इंग्रजीमधून मराठीमध्ये भाषांतरित कराव्या लागल्या. बऱ्याचशा संज्ञांचे भाषांतर 'Fundamentals of Geology- Volume २ - Prof. S. M. Borges, Dr. L. G. Gwalani, Dr. G. Vina Rao - Himalaya Publishing House’ या पुस्तकात मिळाले. हे पुस्तक मला ज्या शिक्षिकेने दिले, त्या माझ्या भूशास्त्राच्या अय्यर मॅडमचेही मनापासून आभार. माझी लिखाणाची उमेद सतत जागृत ठेवण्याचे काम माझ्या आईने केले. पण तिचे आभार न मानता तिच्या ऋणांतच राहायाला मला आवडेल. ’ The Textbook of Engineering and General Geology - Parbin Singh, Katson Publishing House’ या पुस्तकाचीही मदत झाली. या पुस्तकाचा संदर्भ वेळोवेळी मी दिलेलाच आहे. इतर अन्य पुस्तकांचीही मदत झाली.उपरोल्लिखित सर्वांच्या आशीर्वादानेच ही लेखमाला संपन्न करणे मला शक्य झाले. या लेखमालेला ठराविक नाव असे दिलेले नसले तरी, इंटरनेटवर शेअर करताना मी ‘पृथ्वीची माहिती (Information about the Earth)’ या नावाने शेअर करतो. मात्र, हिला ‘भूशास्त्र : विज्ञानाच्या दृष्टिकोनातून’ (Geology - From science perspective)’ हे नाव जास्त संयुक्तिक ठरेल असे मला आता वाटते. विज्ञानाचा दृष्टिकोन सोडला, तर भूशास्त्राचा खाणीत, बांधकामात, धरणे, महामार्ग, रिमोट सेन्सिंग याचबरोबर आण्विक कचऱ्याचे व्यवस्थापन (Nuclear Waste Management) अशा अनेक अभियांत्रिकी क्षेत्रात कसा उपयोग होतो यावरही एक लेखमाला लिहिता येईल. या लेखमालेला ‘भूशास्त्र : अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून’ (Geology - From Engineering Perspective)’ असे नाव देता येईल. पण याबद्दल पुन्हा केव्हातरी! (लेखक हे नागरी अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असून अमेरिकेतील एका नामांकित विद्यापीठातून भूभौतिकीय अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षणही घेत आहेत. तसेच अमेरिकेतील त्यांच्या सहकाऱ्यांबरोबरच तेथेच त्यांचे शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत.)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@