शरदराव पक्षाचे नाव राष्ट्रवादी का ठेवले? मोदींचा सवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2019
Total Views |



अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अहमदनगर येथे सभा पार पडली. अहमदनगरचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे व शिर्डीचे सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मोदी नगरमध्ये आले होते. यावेळी झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी मोदींनी आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात करून उपस्थितीतांचे मने जिंकली.

 

शरदराव, तुम्ही तर देशासाठी काँग्रेस सोडली होती. तुम्ही देश तोडणाऱ्यांसोबत का गेलात? तुम्ही काश्मीरचे तुकडे होऊ द्याल का? जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच तुम्ही तुमच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले आहे का? असा जळजळीत सवाल उपस्थित करत मोदींनी शरद पवारांना लक्ष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशात पुन्हा भाजप सरकार आणण्यासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन यावेळी मोदींनी केले. ते म्हणाले, "मागील सरकारच्या काळात सतत बॉम्‍बस्‍फोट होत होते. आता ते बॉम्बहल्ले का होत नाहीत. या चौकीदाराने दहशतवाद्यांच्या मनात भीती निर्माण केली आहे. मागील साठ वर्ष देशातील जनतेने गरिबी पहिली पण मागील पाच वर्षांपासून जग आपल्याकडे महासत्ता म्हणून पाहत आहे. विकासाची हीच गती कायम ठेवायची असेल तर, पुन्हा एकदा या चौकीदाराला निवडून द्या." यावेळी त्यांनी उपस्थितांना श्रीराम नवमीच्‍या शुभेच्‍छा दिल्या.

 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांधी यांचे तिकीट कापल्याने त्यांनी नाराज होऊ नका, राष्ट्रवादी काँग्रेसला मात देण्यासाठी काहीवेळा सर्जिकल स्ट्राईक करणे गरजेचे असते आणि आम्ही तेच केले, नाराज होऊ नका पक्ष तुम्हाला ताकद देईल., असे म्हणत त्यांनी गांधींची समजूत काढली.

 

राधाकृष्ण विखेंचा प्रवेश नाहीच

 

पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात प्रवेश करणार होते, अशी शकयता वर्तवण्यात येत होती. मात्र, राधाकृष्ण विखे हे पक्ष सोडणार नसल्याचे सुजय विखे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सभेत राधाकृष्ण विखे उपस्थितही नव्हते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@