उच्च न्यायालयाकडून कोस्टल रोडला 'ब्रेक'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2019
Total Views |



मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम वेगात सुरु होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने कोस्टल रोडचे काम थांबवण्याचे आदेश देत कामाला 'ब्रेक' लावला आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर पुढील सुनावणी २३ एप्रिलला होणार आहे, तोपर्यंत पालिकेला हे काम थांबवावे लागणार आहे. पश्चिम उपनगरातील रहदारीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी 'शामलदास गांधी उड्डाणपूल' ते 'राजीव गांधी सागरी सेतू' (वांद्रे वरळी सी लिंक) वरळी आणि कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड उभारला जात आहे.

 

कोस्टल रोड प्रकल्पासाठी समुद्रात टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे सागरी किनाऱ्याचे आणि सागरी जैवविविधतेचे जेवढे नुकसान व्हायचे तेवढे झाले आहे. परंतु यापुढे वरळी सागरी किनाऱ्याजवळील ज्या परिसरात भराव टाकण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही ते तूर्त करू नये, असे सुनावत कोस्टल रोडकरिता भराव टाकण्याच्या कामाला उच्च न्यायालयाने गुरुवारी पुढील आदेशांपर्यंत स्थगिती दिली आहे.

 

कोस्टल रोडसाठी ब्रीच कॅण्डी येथे रस्ता बनवण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी टाटा गार्डनमधील २०० झाडे कापण्यात येणार आहेत. त्याविरोधात ‘सोसायटी फॉर इम्प्रुव्हमेंट, ग्रीनरी अ‍ॅण्ड नेचर’ या रहिवाशांच्या संस्थेनेही जनहित याचिका केली आहे. "विकासाबाबतची अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी सध्या बऱ्याच शहरांमध्ये हरितपट्टा नष्ट केला जात आहे. ही प्रक्रिया झपाटय़ाने सुरू आहे. दुर्दैवाने त्यामुळे पुढील पिढीला चिमण्या, फुलपाखरू काय, हे कधीच कळणार नाही." असेही मुंबई उच्चं न्यायालयाने सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@