राज्यात सायंकाळी साडेपाचपर्यंत ५५.९७ टक्के मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2019
Total Views |


अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती


 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या मतदानात राज्यातील ७ मतदारसंघात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५५.९७ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ वाजेनंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने उशीरापर्यंत मतदान सुरु होते, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज येथे दिली. काही ठिकाणच्या अपवादात्मक घटना वगळता सर्व सात मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान पार पडले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते. पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मतदान झाले. वर्धा 55.36 टक्के, रामटेक (अ.जा.) 51.72 टक्के, नागपूर 53.13 टक्के, भंडारा-गोंदिया 60.50 टक्के, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) 61.33 टक्के, चंद्रपूर 55.97 टक्के आणि यवतमाळ-वाशिम 53.78 टक्के.

 

कट्टर डावी विचारसरणीच्या कृत्यामुळे मतदान पथके पोहोचू न शकल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील वटेली, गर्देवाडा, गर्देवाडा (पुसकोठी), गर्देवाडा (वांगेतुरी) या ४ मतदान केंद्रांवर मतदान होऊ शकले नाही. या मतदान केंद्रांवर नंतर मतदान घेण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील फुलसरगोंदी येथे छोटा बॉम्ब टाकण्याचा प्रकार झाला. यात दोन जवान जखमी झाले. या जवानांना तातडीने हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणून उपचारासाठी दाखल करण्यात आले. याशिवाय आणखी एका बेस कॅम्पजवळ फायरींगचा प्रकार झाला. अशा अपवादात्मक घटना वगळता सर्व सात मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले, असे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

पहिल्या टप्प्यात राज्यात १४ हजार ९१९ मतदान केंद्रे होती. त्यापैकी अत्यंत कमी म्हणजे १.५ टक्क्यांपेक्षा कमी मतदान केंद्रावर मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाडीच्या घटना घडल्या. या मतदान केंद्रांमध्ये लगेच काही वेळात मतदान यंत्रे बदलून तातडीने मतदान सुरु करण्यात आले. त्यामुळे यंत्रातील बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत कोठेही खंड पडला नाही, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

 

सर्व मतदारसंघांमध्ये मतदारांसाठी आवश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या. दिव्यांग मतदारांनाही मागणीनुसार व्हीलचेअर, रँप आदी सुविधा पुरविण्यात आल्या. याशिवाय १ हजार २६१ इतक्या मतदान केंद्रावरील कामकाजाचे लाईव्ह वेबकास्टींग करण्यात आले असल्याचीही माहिती शिंदे यांनी दिली. राज्यात विविध कारवायांमध्ये आतापर्यंत १०४ कोटी १९ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. यामध्ये सुमारे ३५ कोटी रुपये रोकड, सुमारे १९ कोटी १२ लाख रुपये इतक्या किंमतीची दारु, सुमारे ५ कोटी ४६ लाख रुपयांचे अंमली पदार्थ तर ४४ कोटी ६१ लाख रुपये किंमतीचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@