हत्या आणि सन्नाटा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2019
Total Views |



एखाद्या विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची हत्या झाली की रस्त्यावर उतरायचे; अन्यथा मंदाडाप्रमाणे बघत राहायचे, ही या देशातल्या काही अभिव्यक्तिवाल्यांची वृत्ती.

 

जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जम्मू-काश्मीर प्रांताचे सह सेवाप्रमुख चंद्रकांत शर्मा यांची जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. किश्तवाडमध्ये एका इस्पितळात घुसून दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. चंद्रकांत शर्मांच्या हत्येने व्यथित झालेल्या मंडळींनी त्यांच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी केली होती. जम्मू-काश्मीर पोलिसांनी काही लोकांना अटकही केली आहे. संशयित गुन्हेगारांची धरपकडही सुरु आहे. मात्र, आपल्याला ऐकून धक्का बसेल की, अशा प्रकारे हत्या झालेले चंद्रकात शर्मा हे एकटे नाहीत. यापूर्वीही किश्तवाडमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अनिल परिहार यांची अशीच हत्या झाली होती.

 

२०१७ साली गाहेर भट नावाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याचीही अशीच हत्या करण्यात आली होती. शोपियाँमध्ये ही हत्या झाली होती. किश्तवाडमध्ये जो तणाव यानंतर निर्माण झाला, तो निवळण्यासाठी प्रशासनाला जमावबंदी लागू करावी लागली. हत्या कुणाच्याही गंभीर म्हणूनच पाहिल्या गेल्या पाहिजेत. मात्र, किश्तवाडमधील हत्या अधिक गंभीर आहेत. कारण, हे घेतले गेलेले बळी एका विशिष्ट कारणांसाठी आहेत. ही मंडळी केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे, म्हणून त्यांची हत्या केली गेलेली नाही, तर एक देशविरोधी षड्यंत्र व देश यांच्यामध्ये उभे राहण्याची शिक्षा त्यांना दिली गेली आहे. गेल्या तीन चार वर्षांत जम्मू-काश्मीरमधली स्थिती अत्यंत झपाट्याने बदलली आहे. आपल्यासमोर काश्मीर खोर्‍याचे जे चित्र वारंवार येते, ते दगडफेकीचे. मात्र, समोर न दिसणार्‍या आणि या दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचणार्‍या कितीतरी गोष्टी जम्मू-काश्मीरमध्ये घडत आहेत. सीमारेषेच्या पलीकडून घुसखोरी करणारे दहशतवादी आता सीमेवरच रोखले जात आहेत. पण, तरीही स्थानिकांना चिथावणी देऊन त्यांच्यात फुटीरतावादाची बीजे रोवली जात आहेत. किश्तवाडला या सगळ्याचे मोठे केंद्र बनविण्याचे फुटीरतावादी आणि इस्लामी दहशतवाद्यांचे आराखडे तयार आहेत आणि परिहार किंवा चंद्रकांत शर्मा यांच्यासारखे कार्यकर्तेच या फुटीरतावाद्यांसाठी एक मोठा अडथळा ठरत आहेत.

 

चंद्रकांत शर्मा संघाच्या रचनेतून सेवा विभागाचे काम करीत होते. आता सेवेचे काम करणार्‍या माणसाला मारण्याची गरज काय, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि ‘देशाला उत्तर हवे आहे,’ असा खडा सवाल निर्माण करून चॅनलवर चर्चा चालविणार्‍यांनी त्याचे उत्तर शोधावे, अशी भाबडी अपेेक्षा आपण नक्कीच ठेऊ शकतो. बातमीच्या अनुषंगाने घडणार्‍या चर्चांमध्ये स्वत:चे मानवतावादी मुखवटे व्यवस्थित लावून चर्चेला पोहोचणार्‍यांकडेही आपण पाहिले पाहिजे. मात्र, या दोन हत्या झाल्याबद्दल कुणाच्याही मनात कसलाही खेद अथवा खंत दिसत नाही. बातम्या पहिल्या पानावर झळकल्या आहेत. मात्र, त्यात क्षोभ नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विषयात गुगलवर होत असलेल्या सर्चची संख्या पाहिली की, ती बातमी पहिल्या पानावर का लागली, याचे उत्तर मिळू शकते. हा केवळ कुतूहल शमविण्याचा विषय आहे. ज्या प्रकारच्या बातम्या, चर्चासत्रे, निदर्शने यावेळी व्हायला हवी होती, ती झालेली नाहीत. देशभरातील सहाशे आणि महाराष्ट्रातल्या १०७ लोकांनी आघाडी उघडून या सगळ्यावर सध्या एकच कल्ला चालविला आहे. त्यांच्या डोळ्यात खुपणारा नरेंद्र मोदी नावाचा माणूस पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून एक मोठा केविलवाणा प्रयोग सध्या देशभर चालू आहे. यांच्या चिटोर्‍यांना कुणीही भीक घालणार नाही, हे पहिल्या फेरीतल्या मतदानाच्या आकड्यावरून सिद्ध होतेच. कारण, हे मूठभर लोक त्या राहुल गांधींसाठी धावत जाऊन मतदान करू शकतात. देशाने मात्र कुणासाठी मतदान करायचे, हे निश्चित केले आहे.

 

हत्या वाईटच, मग त्या कुठल्याही विचारसरणीच्या माणसाच्या असोत. नरेंद्र दाभोलकर असोत किंवा गौरी लंकेश यांची मते अभद्र वाटत असली तरी त्यांचा खून करणे हा पर्याय असू शकत नाही. विचारांचा मुद्दा विचारांनीच व्हायला हवा. मात्र, विचारांची ही प्रगल्भता इथे दिसत नाही. हत्या वाईट, पण हत्या झालेल्याची जात, धर्म व विचारसरणी पाहून मग आवाज उठविणे, हे त्याहून वाईट. महत्त्वाचे म्हणजे, अशा लोकांनीच सध्या माध्यमांचे अवकाश भरलेले आहे. परिहार असो किंवा बट, यांची हत्या कुठल्या समुदायाच्या लोकांनी केली हे सांगता येणे फारसे अवघड नाही. मात्र, आपण मुसलमान असल्यामुळेच आपल्याला वेगळे वागविले जाते, अशी खंत व्यक्त करणारा नसिरुद्दीन शहा आता चिडीचूप आहे. गौरी लंकेशच्या हत्येच्या दरवर्षी फलक घेऊन रस्त्यावर उभे राहणारे कार्यकर्ते सध्या शोधून सापडणार नाहीत.

 

विचारांची घुसमट आणि हिंसा यांचा डांगोरा पिटणार्‍या शबाना आझमी सध्या कुठे आहेत? एरव्ही आपापसातल्या ‘गॉसिप स्टोरी’साठी प्रख्यात असणारे ते ६०० कलाकार कुठे आहेत? महाराष्ट्रातल्या त्या १०७ लोकांना तर आपण जबाबही विचारायचे कारण नाही. भिवंडीत पोलीस मारले गेले. मुंबईत बॉम्बस्फोट झाले, याकूब मेमनच्या जनाज्याला हजारो लोक एकवटले, तरीसुद्धा मराठी मुलुखातल्या आणि सध्या संवेदनशीलतेचा आव आणणार्‍या एलकुंचवार वगैरे मंडळींच्या सृजनाला करुणेचा पान्हा काही फुटलेला नाही. फादर स्टेन्सची हत्या झाली की, देशभर बोंबलत फिरणारे सध्या कुठल्यातरी बिळात जाऊन बसले आहेत. मुद्दा रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांचा नाही. अशा अनेक हत्या यांच्या लाडक्या केरळमध्ये झालेल्या आहेत. जिथे राज्याचा प्रमुखच हत्येनंतर प्रेताची विल्हेवाट कशी लावायची ते सांगतो. अशा हत्यांना घाबरून संघाचे स्वयंसेवक घरी बसणार नाही. पण, एका विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीच्या लोकांच्या हत्या झाल्यावरच कोकलणारे हे सोंडे किती खालच्या वृत्तीचे आहेत, हे ही शांतता ओरडून सांगत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@