निसर्ग संवर्धनातील ‘भाऊ’ माणूस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2019
Total Views |



वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामाची व्याप्ती असूनही प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच दूर राहिलेले महाराष्ट्रातील एक नाव म्हणजे भाऊ काटदरे.

 

डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफीक यांसारख्या वाहिन्यांमुळे प्रसिद्ध झालेल्या स्टीव इरविन, डेविड अ‍ॅटनबोरो यांसारख्या आंतरराष्ट्रीय वन्यजीव संवर्धनकर्त्यांची नावे आपल्याला परिचयाची आहेतच. पण, भारतातील वन्यजीव संवर्धन क्षेत्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या प्रामाणिक संशोधनकर्त्यांमध्ये भाऊ काटदरे यांच्या नावाचा समावेश होतो. मेहनत, सचोटी आणि निसर्गाप्रती असलेल्या प्रामाणिकतेच्या बळावर भाऊंनी वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रात स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. आपल्या ’सह्याद्री निसर्ग मित्र’ या संस्थेच्या माध्यमातून भाऊ गेली २५ वर्ष या क्षेत्रात मुशाफिरी करत आहेत. जैवसाखळीत महत्त्वाचे स्थान असूनही मानवी हस्तक्षेपामुळे दुर्मीळ होणार्‍या वन्यप्राणी प्रजातींचे संरक्षण आणि संशोधनामध्ये भाऊंचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर त्यावर उपजीविका असणार्‍या लोकांचा आणि समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचे महत्त्वाचे कामही भाऊ आपल्या संस्थेच्या माध्यमातून करतात.

 

विश्वास दत्तात्रय काटदरे हे भाऊंचे मूळ नाव. जन्म गुहागरच्या शिर या खेडेगावातील, ६ फेब्रुवारी १९६१ सालचा. त्यांच्या घरचे वातावरण निसर्गाप्रती पोषक. भाऊंचे वडील दत्तात्रय काटदरे उर्फ ‘तात्या’ हे ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे (बीएनएचएस) सदस्य. पक्ष्यांमध्ये अधिक रस असणारे. तात्या त्या काळात बीबीसी, व्हॉईस ऑफ अमेरिका यासारखे कार्यक्रम ऐकत. रिडर्स डायजेस्ट, नॅशनल जिओग्राफीकसारखे अंक वाचत असल्याचे भाऊ सांगतात. या पार्श्वभूमीमुळे निसर्गप्रेमाचे बाळकडू भाऊंच्या मनात रुजत गेले. सातवीपर्यंतचे शिक्षण गावातच घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी भाऊ चिपळूणला आले. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात भाऊंचा क्रीडा क्षेत्राकडे कल वाढला. कबड्डी या खेळात त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. दहा वर्ष या क्षेत्रात कार्यरत राहिल्यानंतर नव्या पिढीचे असहकार्य आणि शारीरिक परिस्थितीचा अंदाज घेऊन १९९९० मध्ये भाऊंनी या क्षेत्रातून निवृत्ती घेतली. परंतु, या क्षेत्रातील प्रसिद्धीचा फायदा वन्यजीव संवर्धनाच्या कामात होणार असल्याचा भाऊंना त्यावेळी अंदाज नव्हता.

 

त्यानंतर वडिलांच्या आजारपणामुळे भाऊंनी निसर्गसंवर्धनाच्या कामात सक्रियसहभाग घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीचे व्यासपीठ म्हणून फेब्रुवारी १९९२ मध्ये ’सह्याद्री निसर्ग मित्र’ या संस्थेची स्थापना केली. पण, या क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पार्श्वभूमी भाऊंकडे नव्हती. भाऊ वाणिज्य शाखेचे विद्यार्थी. त्यासाठी त्यांनी वन्यजीवांच्या शास्त्रीय साहित्यांचे वाचन केले. तज्ज्ञांची भेट घेऊन त्यांच्याकडून सल्ले घेतले. अशातच पांढर्‍या पोटाचा समुद्री गरुड दुर्मीळ झाल्याची बातमी भाऊंच्या कानावर आली. कोकण किनारपट्टीवर या गरुडांची घरटी असल्याने त्यांच्या शास्त्रीय माहिती संकलनाचे काम १९९६ मध्ये भाऊंनी सुरू केले. पुढील तीन ते चार वर्ष रत्नागिरी जिल्ह्यातील किनारे पिंजून काढत सागरी गरुडांच्या २०० घरट्यांची माहिती भाऊ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मिळविली. परंतु, झपाटल्यासारखे हे काम करत असताना भाऊंनी आपला एक डोळा गमावला. मात्र, या कामात मिळालेल्या यशामुळे भाऊ आणि त्यांच्या सहकारी मंडळींचा आत्मविश्वास अधिकच दुणावला आणि संस्थेच्या कामाला एक दिशा मिळाली.

 

पुढे २००० मध्ये भाऊ आपल्या सहकार्‍यांसमवेत वेंगुर्ला येथे पक्षीनिरीक्षणसाठी गेले होते. तेथील ’वेंगुर्ला रॉक्स’ या बेटावर भारतीय पाकोळ्यांच्या घरट्यांची तस्करी होत असल्याची माहिती त्यांना स्थानिकांकडून मिळाली. पाकोळी पक्ष्यांनी आपल्या लाळेपासून बनविलेल्या घरट्याचे सूप प्यायल्याने लैंगिक शक्ती वाढत असल्याचा गैरसमज आशियाई देशांमध्ये होता. त्यामुळे त्यांच्या तस्करीचे प्रमाण अधिक होते. अशावेळी पोलिसांच्या मदतीने भाऊंनी या तस्करांना पकडले. मात्र, भारतीय पाकोळीला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण नसल्याने तस्करांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता कमीच होती. अशावेळी राष्ट्रीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून या पक्ष्यांच्या संवर्धनाचे महत्त्व ’सह्याद्री निसर्ग मित्र’ या संस्थेने पटवून दिले. त्यामुळे या पक्ष्याला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत प्रथम क्षेणीत संरक्षण देण्यात आले.

 

यादरम्यान २००२ मध्ये संस्थेच्या एका कार्यकर्त्याला मंडणगड तालुक्यातील वेळासच्या किनार्‍यावर सागरी कासवांची अंडी सापडली. चौकशी केल्यानंतर ही अंडी गावकरी खात असून ती विकलीही जात असल्याची माहिती हाती लागली. तोपर्यंत महाराष्ट्राच्या किनार्‍यावर सागरी कासवांची घरटी होतात, याचा कोणालाच मागमूस नव्हता. सागरी कासवे ही वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत वाघांइतकीच संरक्षित असल्याने त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे होते. भाऊ लगोलग कामाला लागले. गावात अधिक चौकशी केली. मात्र, ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत नव्हता. अशावेळी भाऊंच्या कबड्डीच्या प्रसिद्धीचे वलय कामी आले. वेळासच्या सरपंचांनी भाऊंना ओळखले आणि खर्‍या अर्थाने त्यांच्या कामाला पाठिंबा मिळाला. कासवांच्या अंड्यांची जपणूक कशी करावी, याबद्दल माहिती काढून त्यांनी सागरी कासव संवर्धन मोहिमेला २००३ मध्ये सुरुवात केली आणि बघता बघता ही मोहीम संपूर्ण कोकणभर विस्तारली. वयाच्या या टप्प्यावरही भाऊ कार्यरत असून सध्या ते भारतीय खवले मांजराच्या मागावर आहेत. वन्यजीव संवर्धन आणि संरक्षण क्षेत्रात वेगळ्या वाटांचा मागोवा घेणार्‍या या अवलियाला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम !

 

- अक्षय मांडवकर 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@