राज ठाकरे : एक सूडाचा प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2019
Total Views |




एकेकाळी मोदींचे प्रशंसक असलेले राज ठाकरे आता शरद पवार यांचे जणू भक्तच बनले आहेत. एखाद्या नेत्यावर अशी पाळी यावी, यामुळे वैफल्य नाही तर काय निर्माण होणार?

 
 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीबाबत घेतलेली विचित्र भूमिका म्हणजे वैफल्यापोटी त्यांनी सुरू केलेला सूडाचा प्रवास आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांना ही निवडणूक लढवायची होती. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संधान बांधून दोघांचेही दणक्यात रिलाँचिंगदेखील केले होते. पण काँग्रेस पक्षाच्या काही अपरिहार्यतेपुढे शरद पवारांना नमावे लागले आणि राज ठाकरेंच्या वाट्याला आताचा प्रवास आला. खरे तर मनसेला महाराष्ट्रातील आघाडीत सामील करून घ्यावे, यासाठी पवारांनी भरपूर प्रयत्न केले. पण, राहुल गांधींपुढे त्यांचे काहीही चालले नाही. मग आघाडीच्या बाहेर राष्ट्रवादी-मनसे अशी उपआघाडी तयार करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील काही जागा मनसेला द्याव्यात व तिने आपल्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असे त्या प्रयत्नाचे स्वरूप होते. पण, काँग्रेसला तेही मान्य नव्हते. शिवाय राष्ट्रवादीच्या स्वत:च्याच अडचणी इतक्या होत्या की, तो प्रस्तावही बारगळला.

 
 

त्यानंतर मनसेने राष्ट्रवादीच्या चिन्हावरच काही जागा लढवाव्यात, असा प्रयत्न झाला. कल्याण, नाशिक, मध्य मुंबई अशी मतदारसंघांची नावेही घेतली गेली. पण असे दिसते की, विशेषत: अजितदादा पवार मनसेबरोबर जाण्यास फारसे उत्सुक नव्हते. त्यामुळे शेवटी मनसे ही निवडणूकच लढणार नाही, अशी घोषणा राज यांनी केली. पण, निवडणुकीच्या धामधुमीत स्वस्थ राहणे शक्य नव्हते. त्यामुळे निवडणूक तर लढवायची नाही, कुणाला पाठिंबाही द्यायचा नाही पण मोदी आणि भाजप यांच्या विरोधात प्रचार करायचा, असे धोरण त्यांनी जाहीर केले. मोदींच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीही आहे. त्यामुळे आपण मोदींच्या विरोधात प्रचार केला तर त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीलाच होणार, हे न कळण्याइतपत राज काही खुळे नाहीत. कदाचित त्यांनाही तेच अपेक्षित असेल. पण, या सगळ्या भानगडीत त्यांची विलक्षण कुचंबणा झाली आणि आता ते अत्यंत त्वेषाने आणि त्वेषाने म्हणण्यापेक्षा द्वेषाने निवडणूक प्रचारात उतरले आहेत. वरवर पाहता हा मोदींविरुद्धचा सूडाचा प्रवास वाटत असेलही, पण मूलत: हा राज ठाकरे यांचा स्वत:विरुद्धचाच सूडाचा प्रवास आहे, असे म्हणावे लागेल.

 
 

त्याचे कारणही तसेच आहे. खरेतर ते असे भाग्यवान आहेत की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वात्सल्य त्यांना लाभले. कदाचित बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांचे जेवढे लाड केले नसतील, तेवढे राजचे केले आहेत. त्यांचे आणखी सुदैव म्हणजे बाळासाहेबांसारखीच हुबेहूब वक्तृत्वशैली त्यांना लाभली आहे. व्यंगचित्रकलेच्या बाबतीतही ते बाळासाहेबांप्रमाणेच प्रभावी ठरले. त्यांनी त्या दोन्ही कला परिश्रमपूर्वक आत्मसात करणेही अशक्य नाही. ज्यांच्याकडे पाहून, ज्यांना ऐकून फक्त बाळासाहेबांचीच आठवण होऊ शकते, असा आकार त्यांनी आपल्या व्यक्तित्वाला दिला. बाळासाहेब हयात असताना तेच उद्धवजींपेक्षा अधिक त्यांच्यासोबत राहत होते. त्यामुळे काकांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून शिवसेनेची जबाबदारी आपल्याकडेच येईल, असे त्यांना वाटणे स्वाभाविक होते, पण घडले उलटेच. बाळासाहेबांनी उत्तराधिकारी म्हणून उद्धवजींचीच निवड केली. काही लोकांना काय मलाही ‘शेवटी बाळासाहेबांचे पुत्रप्रेम आडवे आले’ असेच वाटत होते. पण आता घडत असलेल्या घटना पाहिल्या तर बाळासाहेबांचा निर्णयच अचूक होता, याची खात्री पटते. लोक तसे बोलूनही दाखवायला लागले आहेत.

 
 

अर्थात, अस्वस्थ असले तरी उद्धवजींच्या नियुक्तीनंतर राज यांनी लगेच शिवसेना सोडली नाही. ते शिवसेनेतच राहिले. कदाचित उद्धव फेल होतील आणि आपल्याला अपेक्षित स्थान मिळू शकेल, असे वाटले म्हणूनही ते सेनेत थांबले असतील. पण, एका म्यानात दोन आणि एवढ्या तेजतर्रार तलवारी राहणे शक्यच नव्हते. त्यामुळे बरीच घुसमट झाल्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या हयातीतच त्यांना ‘विठ्ठल’ मानून शिवसेना सोडली. इथून राज ठाकरेंची लाईन जी चुकत गेली ती आतापर्यंतही योग्य जागी पोहोचली नाही. त्यामुळे जर त्यांच्यात वैफल्य आले असेल तर तो विषयही समजून घेण्यासारखा आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बर्‍याच विचारांनंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तिचे प्रारूपही अतिशय विलोभनीय होते, याबद्दल वाद नाही. प्रारंभीच्या काळात तिला प्रतिसादही भरपूर मिळाला. एखाद्या पक्षाने स्थापनेनंतर प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवावी आणि तिचे तेरा आमदार निवडून यावेत, हे फक्त मनसेच्याच बाबतीत घडले. पाठोपाठ नाशिक आणि डोंबिवली महापालिकेतही त्यांनी आपला प्रभाव दाखवून दिला. पण, हे सगळे वक्तृत्व आणि ठाकरे घराण्याच्या दरार्‍याच्या बळावर. राज ठाकरे यांनी कधी संघटन बांधण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी झाला, असे कधी घडले नाही. आपली टीम उभी करणे त्यांना कधीच जमले नाही. काही विश्वासू सहकारी तयार झाले, पण ते काही काळापुरतेच. एकेकाळचे अत्यंत विश्वासू सहकारी बाळा नांदगावकर आज कुठे आहेत, माहीत नाही. एकेकाळी नितीन सरदेसाई त्यांच्या आसपास जेवढे दिसत होते, आज त्यांची जागा संदीप देशपांडे यांनी घेतलेली दिसते. मुंबई महापालिकेत त्यांचे सहा नगरसेवक निवडून आले होते. आज एकही त्यांच्यासोबत नाही. महाराष्ट्र विधानसभेत २०१४च्या निवडणुकीत त्यांचा एकच आमदार व तोही त्याच्या स्वत:च्या बळावरच निवडून आला होता. तोही नुकताच शिवसेनेत गेला. अशा स्थितीत एखाद्या नेत्याला वैफल्य आले तर ते स्वाभाविकच नाही का?

 
 

एकेकाळी ते मोदींचे कट्टर प्रशंसक होते. मोदींचे काम पाहण्यासाठी त्यांनी मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातचा दौरा केला होता. त्यानंतर मोदींची प्रशंसा करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नसेल. भाजप नेते नितीन गडकरी त्यांचे जिवलग मित्र होते. पण एकाएकी काय घडले, हे कुणालाच ठाऊक नाही. पण एकेकाळी मोदींचे प्रशंसक असलेले राज ठाकरे आता शरद पवार यांचे जणू भक्तच बनले आहेत. एखाद्या नेत्यावर अशी पाळी यावी, यामुळे वैफल्य नाही तर काय निर्माण होणार ? बरे, त्यांचा अहंकार म्हणावा तर तो एवढा प्रचंड आहे की, आतापर्यंत आपले काही चुकले, असे ते मान्यही करू शकत नाहीत. अशा स्थितीत कुणी त्रागा करीत असेल व त्यापोटी स्वत:वरच सूड उगविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते स्वाभाविक नाही काय? शेवटी प्रश्न उरतो, त्यांच्या सभांचा निवडणुकीवर काय परिणाम होईल? या प्रश्नाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय समर्पक उत्तर दिले आहे. ते म्हणतात, “राज ठाकरे यांचे चाहते मूलत: हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे राजनी काहीही म्हटले तरी ते काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाणार नाहीत. उलट राज भाजप-सेना युतीच्या विरोधात जेवढे बोलतील तेवढी युतीची मते वाढतील.” हे खरे आहे की, राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी भरपूर असते पण ती मनसे कार्यकर्त्यांचीच असते असे म्हणता येणार नाही. कारण त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे ती काँग्रेस-राष्ट्रवादीचीही असू शकते.

 
 
 - ल.त्र्य.जोशी
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@