तुमच्या सात पिढ्याही जम्मू-काश्मिरला वेगळे करु शकत नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019
Total Views |


अमित शाह यांचा ओमर अब्दुल्लांवर कडाडून वार


एटा : महागठबंधनाचे साथीदार जम्मू-काश्मिरला भारतापासून तोडण्याच्या गोष्टी करतात. परंतु, ओमर अब्दुल्लाच काय, पण त्यांच्या सात पिढ्या आल्या तरी, जम्मू-काश्मिरला भारतापासून कोणीही अलग करु शकत नाही. जम्मू-काश्मिर भारताचे आहे आणि भारताचेच राहणार, अशा शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी विरोधकांवर कडाडून वार केला.

 

काही दिवसांपूर्वीच ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मिरसाठी वेगळा पंतप्रधान असावा, असे म्हटले होते. सोबतच ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यात हिंमत असेल तर कलम ३७० हटवून दाखवावे, असे आव्हानही दिले होते. भाजपच्या संकल्प पत्राचा उद्देश आमच्या शरिया कायद्याला बदलण्याचा आहे, जे आम्ही होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले होते. आज अमित शाह यांनी आपल्या भाषणातून अब्दुल्लांच्या या बोलण्याचा चांगलाच समाचार घेतला.

 

निवडणुकीनंतर गठबंधन होईल खिळखिळे

 

सप-बसप आणि काँग्रेसला घेरताना अमित शाह म्हणाले की, हे तिन्ही पक्ष मतपेट्यांचे राजकारण करतात. मायावती याचमुळे आम्हाला एकाच समुदायाची (मुसलमान) मते मिळावीत, असे म्हणतात. मायावती आणि अखिलेश कित्येक वर्षे एकमेकांची तोंडेही पाहत नव्हते, नमस्कारही करत नव्हते. पण आज मोदींनी हरवण्यासाठी सगळे एकत्र आले आहेत. मात्र, एकदा का निवडणुक संपली की, गठबंधन खिळखिळे होईल, असे शाह म्हणाले.

 

चुक केल्यास परिणाम भोगावेच लागतील

 

भाजपाध्यक्षांनी आजच्या सभेत, मोदी सरकार दहशतवादी संघटनांशी कोणतीही चर्चा करणार नाही, असेही स्पष्ट केले. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. जर दहशतवाद्यांनी पुन्हा काही चुक केली तर त्यांना जबर धडा शिकवला जाईल. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात फुटीरतावाद्यांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे, त्यावरही अमित शाह यांनी निशाणा साधला. शाह म्हणाले की, राहुलबाब आणि बुआ-भतीजा तुम्ही सगळेच दहशतवाद्यांशी इलू-इलू करा. पण हे मोदी सरकार आहे, जर पाकिस्तानकडून एक गोळी आली तर इकडून गोळा (बॉम्ब) टाकला जाईल.

 

भाजपने दिली निजामापासून मुक्ती

 

भाजपने निजामापासून मुक्ती दिल्याचे सांगत अमित शाह म्हणाले की, निजाम म्हणजे नसीमुद्दीन सिद्दीकी, इमरान मसूद आणि आझम खान, अतीक अहमद, मुख्तार अन्सारी यांच्यापासून आम्ही मुक्ती दिली. सोबतच ते म्हणाले की, सप-बसपच्या सरकारात उत्तर प्रदेशच्या लोकांना गुंडांकडून त्रास दिला जात असे, पण योगी सरकारने गुंडांना उलटे टांगून सरळ करण्याचे काम केले. उत्तर प्रदेशात कायदा-व्यवस्थेचे राज्य आणण्याचे काम भाजप सरकारने केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@