संजय निरुपमचा प्रचार करणार नाही : बाळा नांदगावकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019
Total Views |
 


मुंबई : मराठीचा आणि मराठी भाषिकांचा द्वेष करणाऱ्या व महाराष्ट्र विरोधात भूमिका घेणाऱ्या संजय निरूपम यांचा आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही, भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. याचा अप्रत्यक्ष फायदा शिवसेनेला होणार असून शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांना होणार आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही माहिती दिली आहे.

 

कॉंग्रेस नेते संजय निरुपम आणि मनसे यांच्यात परप्रांतियांच्या मुद्द्यांवरुन अनेकदा खटके उडाले आहेत. संजय निरुपम मुंबई अध्यक्ष असताना राज ठाकरेंच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यातूनच संजय निरुपम यांचे कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. मनसे यंदाची लोकसभा निवडणूक लढवत नसली तरी राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या भाजपविरोधामुळे मनसेची मते महत्वाची भूमिका बजवाणार आहेत.

 

गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला मतदान करु नका, असे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांच्या मनसे भूमिकेचे काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वागत केले असले तरीही भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी राज यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ज्यांच्या विरोधात मनसे कार्यकर्ते लढले, राज ठाकरेंना ज्यांनी लुख्खा अशा शब्दाचा प्रयोग केला अशा संजय निरुपमचा प्रचार मनसे कार्यकर्त्यांना करावा लागणार. हा मनसे कार्यकर्त्यांवर अत्याचार आहे असा टोला विनोद तावडे यांनी मनसेला लगावला होता. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाष्य केले आहे.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मराठीमाणसाच्या विरोधात नेहमी भूमिका घेणारे संजय निरुपम यांचा प्रचार राज ठाकरे करणार, असा प्रश्नही यावेळी विचारण्यात येत होता. अखेर मनसे नेते बाळा नांदगावकरांनी संजय निरुपम यांना कोणत्याही प्रकारे मदत करण्याची मनसेची भूमिका नाही. निरुपम यांचा प्रचार करणार नाही हीच पक्षाची अधिकृत भूमिका आहे, तशा सूचना मनसेच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. निरुपम यांच्या मतदारसंघातील आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईतील इतर मतदारसंघात फिरतील असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केल्याने याचा फायदा अप्रत्यक्षरीत्या खासदार गजानन किर्तीकर यांना होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@