पवारांनी ‘कलम ३७०’ संदर्भात भूमिका स्पष्ट करावी : विनोद तावडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019
Total Views |



मुंबई : “घटनेचे ‘कलम ३७०’ व ‘कलम ३५ अ’बाबत तुमची भूमिका स्पष्ट करा. कारण, ‘कलम ३७०’ जर तसेच ठेवले, तर काश्मीर प्रश्न तसाच राहतो. पण जर ‘कलम ३७०’ काढले, तर काश्मीर प्रश्न सुटण्यास आपोआप मदत होते. दहशतवादी पाकिस्तानला हे कलम तसेच ठेवले गेले पाहिजे असे वाटते. त्यामुळे यासंदर्भात तुमची नेमकी भूमिका काय आहे,” असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला. पवार राष्ट्रीय नेते असल्याने आपण त्यांना हा सवाल करत असल्याचेही तावडे यांनी सांगितले.

 

विरोधकांनी एकत्र येऊन जी काही तोडकीमोडकी महाआघाडी तयार केली आहे, त्या आघाडीचीही यासंदर्भातील भूमिका स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे तावडे म्हणाले. “महाआघाडी तोडकीमोडकी आहे हे माझे म्हणणे नसून सीताराम येचुरी यांचे म्हणणे आहे,” असे ते म्हणाले. “विरोधक देशभरात एकत्र नाहीत. पण निवडणुकीनंतर मात्र आपल्याला एकत्र यावे लागेल. निवडणुकीनंतर एकत्र येऊन भाजपशी लढावे लागेल. अशाप्रकारचे वक्तव्य सीताराम येचुरी करत आहेत. याचा अर्थ भाजप सत्तेत येईल आणि आपण विरोधात बसू,” असे येचुरी बोलत आहेत. “कदाचित शरद पवारांना हे आधीच कळले म्हणुनच त्यांनी यावेळी निवडणुक लढण्याचे धाडस केले नाही, असे तावडे यांनी सांगितले. पवारांना आता गांधी कुटुंबाचे बलिदान व त्याग दिसत आहे. पण त्यांनी जेव्हा दोन वेळा काँग्रेस सोडली तेव्हा ते काँग्रेस बद्दल काय बोलले होते ते अद्याप जनता विसरलेली नाही,” असे तावडे म्हणाले.

 

निवडणुकीमध्ये पैसे हे काँग्रेसचे मुख्य हत्यार आहे. परंतु, सध्या त्यांचे पैसे अडकले असल्यामुळे काँग्रेस अस्वस्थ झाली आहे. निवडणुकीच्या काळातील काँग्रेसच्या हालचालींची माहिती आयकर विभागाला कळल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली असेल. निवडणूक आयोगानेही यामध्ये सरकारचा हात नसल्याचे स्पष्ट केले आहे,” असे तावडे यांनी स्पष्ट केले. “सध्या चॅनलवर दाखविण्यात येणार्‍या मालिकांमधून भाजप आपला निवडणूक प्रचार करत आहे, असा सध्या होत असलेला आरोप चुकीचा असून भाजपाचा मालिका निर्मात्यांवर अथवा लेखकांवर कोणताही दबाव नाही. ज्याप्रमाणे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकांमध्ये सातत्याने सामाजिक विषय घेतले जातात, त्याचपद्धतीने या मालिकांमध्येही तसे विषय घेतले गेले असावेत. तरीही विरोधकांचा या संदर्भात काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोग हा विषय तपासून पाहील,” असेही तावडे यांनी सांगितले. खार येथे मंगळवारी निवडणूक आयोगाने टाकलेल्या छाप्याचा भाजपशी काहीही संबध नाही. ते आमचे प्रचार साहित्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@