कललेले आणि कलंडलेले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019
Total Views |




शरद पवार काय आणि राज ठाकरे काय, एकेकाळचे हे मोदींचे स्तुतिपाठक आता एकाएकी मोदींच्या विरोधात काँगेसचे गुणगान करू लागले आहेत. २०१४च्या निवडणुकीत अनेकांचे मुखवटे गळून पडले. आता अनेकांचे चेहर्‍यामागचे खरे चेहरेही समोर येणार आहेत.

 

पुतणे सांभाळायचे केंद्र चालविण्याचा एकहाती ठेका घेतलेल्या शरद पवारांवर सध्या काँग्रेससाठी मतांचा वाडगा घेऊन फिरायची वेळ आली आहे. अशी वेळ आलेले पवार एकटेच नव्हेत. पण, पवार जे काही बरळत आहेत, त्याचा समाचार घ्यायलाच हवा. गांधी घराण्याच्या त्यागाविषयी ते आता बोलायला लागले आहेत. “ज्या घरातील व्यक्तींनी बलिदान केले, त्यांच्या पुढच्या पिढ्या जबाबदारी घ्यायला तयार आहेत,” असे विधान पवारांनी केले आहे. पवार एवढ्यावर थांबलेले नाहीत. त्यापुढे जाऊन पवारांनी जे म्हटले आहे, ते पवारांचे अस्सल रूप आणि अगतिकता हे दोन्ही दर्शविणारे आहे. या विधानाच्या पुढे जाऊन पवार विचारतात की, “तुम्ही काय दिवे लावलेत?” आजच्या घडीला मोदींसारख्या राजकारण्याला असा प्रश्न विचारणारा माणूस एक तर मूर्ख तरी असू शकतो किंवा पराभवाच्या भीतीने तरी पछाडलेला असला पाहिजे. पहिली शक्यता पवारांच्या बाबतीत लागू नाही. दुसरी शक्यता मात्र नक्कीच लागू होते. खरंतर पवारांनाच प्रश्न विचारला पाहिजे की, आपली स्थिती काय? गांधी घराण्यातल्या ज्या दोन व्यक्तींनी आपले आयुष्य देशासाठी दिले, त्याचा शोक सगळ्यांनाच आहे.

राजीव गांधी व इंदिरा गांधी यांच्याबरोबर जे झाले ते दुर्दैवीच होते. प्रदीर्घ राजकीय अनुभव गाठीशी असलेल्या भाजपमधील दिग्गजांनीदेखील या विषयावर संवेदना दर्शवित त्यावर राजकारण केले नाही. या उलट गांधी घराण्यातील पुढच्या पिढ्यांनी याचे पुरेपूर राजकारण केले. राजकीय लाभही मिळविला आणि सत्तेचे फायदेही लुटले. असेच दोन मृत्यू ज्या विचारधारेच्या विरोधात आज पवार आणि कंपनी बोंबलत फिरत आहेत, तिथेही झाले आहेत. दीनदयाळ उपाध्याय व श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे मृत्यू ज्या स्थितीत झाले, त्यावर आजतागायत एकाही काँग्रेसी नेत्याने संवेदना दर्शविलेली नाही. श्यामाप्रसाद मुखर्जींचा मृत्यू जम्मू-काश्मीरमध्ये, “एक देश मे दो प्रधान दो निशान नही चलेंगे,” अशी घोषणा देत सुरू झालेल्या आंदोलनात झाला होता. मुगलसराय रेल्वेस्थानकावर दीनदयाळ उपाध्याय यांचा मृतदेह सापडला होता. गांधी परिवार केंद्रस्थानी ठेऊन ज्यांनी आपापले राजकारण शिजवले, त्यांना हे दोन लोक दिसणार नाहीत. तुम्ही काय दिवे लावले? असा जो काही प्रश्न आज पवार विचारतात, तेव्हा ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राहुल आणि प्रियांका गांधींची तळी उचलण्याचे कामच करीत असतात.

 

या दोघांमागे दडलेले रॉबर्ट वाड्रा शरद पवारांना दिसत नाही, असे नाही. मात्र तो त्यांना पाहायचा नसतो कारण, खुद्द यांच्या घरातच असे वाड्रा दडलेले असतात. पवारांच्या निवडणूक न लढविण्याच्या अनेक कारणांपैकी चर्चिले जाणारे एक कारण नंतर हळूहळू बाहेर पडले. पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढवित असल्यानेच पवारांना माघार घ्यावी लागली होती. पवारांचा हा नातू तर रॉबर्ट वाड्राशी स्पर्धा करेल, असा निघाला. कोणतीही गुंतवणूक न करता कोट्यवधी रुपयांचे शेअर्स, मालकी, बंगले असे कितीतरी तपशील आता समोर येत आहेत. पार्थ पवारचे अजून एक मोठेपण म्हणजे संपूर्ण देशातील सर्वच पुरोगामी मंडळी ज्या पवारांकडे आशेने पाहात असतात, त्या पवारांनाच लाखो रुपयांचे कर्ज देण्याची ताकद नातवाकडे आहे. इतकेच नव्हे तर आपला लाडका लोकसभा मतदार संघ ज्या सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांनी वारसाहक्काने दिला, त्या सुप्रिया सुळेंनादेखील पार्थ पवारांनी कर्ज दिले आहे.

 

२०१४च्या निवडणुकीत अनेक मुखवटे गळून पडले होते. २०१९च्या निवडणुकीत चेहर्‍यामागे दडलेले असली चेहरेही समोर यायला लागले आहेत. गंमत म्हणजे काँग्रेसचे लोक स्वत: ज्या आक्रमकतेने प्रचार करायला तयार नाहीत, यापेक्षा कितीतरी अधिक आक्रमकपणे हे एकेकाळचे काँग्रेसचे विरोधकच काँग्रेससाठी टाहो फोडत आहेत. काँग्रेसमध्ये नसतानाही कॉंग्रेससाठी मतांचा वाडगा फिरविणार्‍यातले सध्याचे नवे नाव म्हणजे राज ठाकरे. प्रचलित राजकारणाला पर्याय म्हणून मोदींच्या उदयापूर्वी मराठी लोकांनी राज ठाकरेंकडे मोठ्या आशेने पाहिले. पक्षाच्या सुरुवातीलाच आमदार, खासदार, नगरसेवकांचे माप भरभरून राज ठाकरेंच्या पदरात पडले. त्याच्या मोबदल्यात राज यांनी लोकांच्या पदरात भरूभरून निराशाच टाकली. आज पाठीमागे एकही आमदार, खासदार व नगरसेवक नसलेले राज ठाकरे “राहुल गांधींना एक संधी द्या,” अशी घंटा बडवित फिरत आहेत. यांच्यापैकी कुणीही अद्याप निवडणुकीला उतरलेले नाही; अन्यथा यांच्या मुलाच्या नावावरही अशाच कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांचे तपशील सापडू शकतात.

 

शरद पवार काय किंवा नव्यानेच उत्क्रांत झालेले राज ठाकरे काय, या सगळ्या मंडळींच्या घरोघरी असेच अनेक रॉबर्ट वाड्रा दडलेले आहेत. पवार काय आणि राज ठाकरे काय, या दोन्ही नेत्यांसाठी नरेंद्र मोदी कधी काळी आशेचा खूप मोठा किरण होते. आज मोदींना उठता बसता शिवीगाळ करणारे हे दोन्ही नेते कधीकाळी मोदींचे कौतुक करताना थकत नसत. मात्र, आज असे काय घडले, असा विचार केला तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, राजकीय साट्यालोट्यांचा काळ आता संपला आहे. लोकांना मूर्ख बनवून स्वत:ची घरे भरण्याचे जे उद्योग इतकी वर्षे झाले, त्याला आता चाप बसला आहे. हे सगळे राजकारण आता आपल्या पथ्यावर पडणारे नाही, याची या मंडळींना कल्पना आहे. त्यामुळेच इथून पुढे अशा नाटकांना आपण तयार राहिले पाहिजे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@