पूर्वाश्रमीच्या साथीदारांच्या मुकाबल्याचा दिंडोरी मतदारसंघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019
Total Views |



नाशिक : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनराज महाले आणि भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना आपल्या पूर्वाश्रमीच्या साथीदारांशीच सामना करावा लागणार आहे. कारण, या मतदार संघातील विद्यमान भाजप उमेदवार पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होत्या, तर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवसैनिक होते. शिवसेनेचे वाघ म्हणून ओळखले जाणारे धनराज महाले दोन वेळा विधानसभा व एक वेळा जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरले होते. तसेच, सेनेच्या वाघांची साथ मिळाल्याने २००९ मध्ये महाले यांनी विधानसभा निवडणुकीत अवघ्या १४९ मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांचा पराभव करत आपले आमदारकीचे स्वप्न साकारले होते. मात्र, २०१४ साली मात्र झिरवाळ यांचे पारडे जड असल्याने महाले यांना पराभवाची चव चाखावी लागली होती.

 

या पराभवानंतर मंत्रालय नाही, तर किमान हवे मिनी मंत्रालय जिंकू, असे म्हणत महाले यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खेडगाव गटातून भास्कर भगरे यांचा पराभव करत नाशिक जिल्हा परिषदेत आपले बस्तान बसविले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांचे मुळगाव असलेल्या खेडगावमध्ये शिवसेनेचे उमेदवार धनराज महाले निवडून आले होते. मात्र, आता भाजप–सेना युती झाल्याने एकेकाळी शिवसेनेच्या साथीने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे महाले यांनी धनुष्यबाण खाली ठेवत हाती घड्याळ हाती घेतले. त्यामुळे कोणेएकेकाळी त्यांना पराभूत करणाऱ्या नेत्याचाच आज त्यांना 'आपला उमेदवार' म्हणून प्रचार करावा लागत आहे. त्यामुळे साहजिकच निष्ठावंत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या गोटात अस्वस्थता असण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर ज्याला निवडणुकांमध्ये सर्वपरीने साथ दिली, तेच धनराज महाले आता आपल्या विरोधात असल्यामुळे शिवसैनिकदेखील उट्टे काढण्याच्या तयारीत असण्याची देखील शक्यता आहेच.

 

दुसरीकडे भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या समोरील आव्हान देखील काही वेगळे नाही. युती झाल्यावर डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रावादीला राम राम करत भाजपची वाट धरली. सन २०१4च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या डॉ. भारती पवार यांनी तब्बल तीन लाखांच्या घरात मते प्राप्त केली होती. मात्र, यावेळी धनराज महाले यांच्या नावाची राष्ट्रवादीकडून घोषणा होताच, डॉ. भारती पवार यांनी देखील घड्याळ सोडत हाती कमळ घेतले. त्यामुळे सलग तीन वेळा दिंडोरीचे मैदान गाजवणाऱ्या खा. हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे, त्यांच्या गोटात नाराजीचा सूरही उमटल्याचे चित्र आहे.

 

या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. पवार यांच्या समोर स्वपक्षातील खासदार हरिश्र्चंद्र चव्हाण यांच्यासह व त्यांच्या समर्थकांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर राष्ट्रवादीत असताना डाॅ. पवार यांनी उभ्या केलेल्या महिला मोर्चालाही, आपण यंदा कमळ हाती का घेतले, हे पटवून देत त्यांचाही पाठिंबा मिळविण्याची कसरत करावी लागणार आहे. या व अशा सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकीकडे धनराज महाले यांना शिवसेना आणि सध्याचा स्वपक्ष असलेल्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांचीही मर्जी सांभाळावी लागणार आहे. तसेच, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी असल्याने काँग्रेसच्या एका पारंपरिक विचारसारणीच्या गटाला देखील आपल्या मर्जीत ठेवण्यासठी कौशल्य पणाला लावावे लागणार आहे.

 

अशा गरमागरम वातावरणातच दिंडोरीतील कॉंग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी नुकताच समर्थकांचा मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. त्यामुळे युतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना दिंडोरीत बळ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, असे असले तरी, या दोन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक आधीच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा पत्करलेला रोष आणि नवीन पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी, अशा समसमान दुहेरी आव्हानांमुळे अटीतटीची होईल, यात शंका नाही.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@