स्वागत नव्या निकषांचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019   
Total Views |


पोलीस म्हणजे करारी नजर आणि सुदृढ शरीरयष्टी. मात्र, हल्ली कोणत्याही प्रकारची सुदृढता नसणारे आणि बॉडीमास्क इंडेक्समध्ये नसणारे अधिकारी व कर्मचारीच पोलीस दलात सहज दिसून येतात. यावर उपाय म्हणून नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी बदलीपात्र पोलिसांना बदल्यांसाठी शारीरिक क्षमतेचा निकष लावण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक शहर पोलीस दलात एकूण ८०० बदल्या सध्या प्रस्तावित आहेत. यातील सुमारे १०० बदल्या या शारीरिक निकषांच्या आधारावर पसंतीच्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, अन्य ७०० बदल्यांसाठी गुणवत्ता व अन्य क्षमता यांचे निकष ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे पसंतीच्या ठिकाणी ज्या पोलीस कर्मचार्‍यांना बदली हवी आहे, त्यांना यापुढे आपली शारीरिक क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. त्यांनी अशा प्रकारे आपली क्षमता सिद्ध केल्यास त्यांना पसंतीच्या ठिकाणी बदली करून कर्तव्यावर रुजू करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस दलातील कर्मचार्‍यांचे वय लक्षात घेऊन त्यांनी किती किलोमीटर अंतर किती वेळात पार करावे, याचेदेखील निकष ठरविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वाहतूक आणि गुन्हे शाखेत बदलीवर जाऊ इच्छिणार्‍या कर्मचार्‍यांची बॉडी मास्क इंडेक्स चाचणीदेखील घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस दलात कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांकडून स्वतःच्या शरीराची व आरोग्याची काळजी घेतली जावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचेदेखील आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. विस्तारणार्‍या नाशिक शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता शहर पोलिसांना अनेकविध कार्ये हे नित्यनियमाने पार पाडावी लागत असतात. त्यातच राजकीय नेते, विविध मोर्चे यांचे बंदोबस्त वेगळे. या सर्व बाबी लक्षात घेता पोलिसांच्या शारीरिक सुदृढतेला पर्याय नाही, हेही तितकेच खरे. त्यामुळे आता हव्या त्या ठिकाणी बदली मिळावी, यासाठी शारीरिक सक्षमतेचे लावलेले हे निकष पोलीस दलाला फीट करण्यासाठी निश्चितच स्वागतार्ह आहेत.

 

दिला इशारा तरी?

 

सरकारी कार्यालये म्हणजे अधिकारी व कर्मचार्‍यांची नागरिकांनी प्रतीक्षा करण्याची ठिकाणे, असे मत अनेक नागरिक कायमच व्यक्त करताना दिसतात. सरकारी कामाप्रती तेथील अधिकारी व कर्मचारी यांची वेळेवर उपलब्ध न होण्याची सवय हीच नागरिकांमध्ये सरकारच्या विविध खात्याप्रती अनास्था निर्माण करणारी ठरत असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मनपाला हजेरीची शिस्त लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार त्यांनी एप्रिलमध्ये मनपाच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना येथील बायोमेट्रिक हजेरी प्रणालीची पूर्तता न केल्यास मे महिन्यात अदा करण्यात येणारे वेतन रोखण्याचा इशारा दिला आहे. तसेच, यापुढे मनपा कर्मचारी व अधिकार्‍यांचे वेतन हे बायोमेट्रिक प्रणाली गृहीत धरून काढण्याचे धोरणदेखील आखण्यात आले आहे. खाजगी आस्थापनात अनिवार्य असणारी बायोमेट्रिक प्रणाली ही सरकारी पातळीवर का गृहीत धरली जात नाही, केवळ मस्टरच्याच विळख्यात सरकारी कार्यालये असणार का? अशा सामान्यांना पडणार्‍या प्रश्नांची दखल आयुक्त गमे यांनी घेतली आहे, असे म्हणण्यास यामुळे वाव मिळाला आहे. मात्र, असे असले तरी, चहाची टपरी हेच आपले कार्यालय व कार्यस्थळ आहे, असे समजणार्‍या बाबू लोकांना हा इशारा समजेल का, हाच मोठा प्रश्न आहे. या इशार्‍यामुळे कार्यालयातील रिकामी टेबले ही कामकाजासाठी उपयोगी पडतील का? गरगरणार्‍या पंख्याची हवा नागरिकांबरोबरच येथील कर्मचारीही घेतील का? अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल. मात्र, आयुक्त गमे यांनी दिलेला हा इशारा नाशिककर नागरिकांसाठी मात्र आशेचा किरण निर्माण करणारा आहे. या बायोमेट्रिक प्रणालीच्या सक्तीला सफाई कर्मचार्‍यांनी विरोध दर्शविला आहे. यामागे सेवाभावाचा अभाव आणि कामचुकारपणातच कर्तव्यदक्षता समजणे, हा हेतू असावा का? असा प्रश्न या निमिताने सामान्य नाशिककरांना सतावत आहे. मात्र, असे असले तरी, आयुक्तांनी दिलेला इशारा हा केवळ इशारा न ठरत त्याला कृतिशीलतेची जोड मिळणेदेखील आवश्यकच आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@