एका वीरांगनेची यशोगाथा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019
Total Views |



डॉ. आश्लेषा तावडे-केळकर यांनी सैन्यासारख्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत अनेक महिलांना प्रेरणा दिली आहे. त्यांचा जीवनप्रवास आणि सैन्याविषयीचे त्यांचे विचार यावर प्रकाश टाकणारा हा लेख...

मेजर डॉ. आश्लेषा तावडे-केळकर यांचे शालेय शिक्षण पार्ले-टिळक महाविद्यालयात पूर्ण झाले. बारावीनंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी २६ फेब्रुवारी, २००९ मध्ये पुण्याच्या कमांड रुग्णालयामध्ये प्रवेश घेतला. चार महिन्यातच त्यांना ‘आर्मी कमिशन’ मिळाल्यानंतर त्यांना अधिकारी प्रशिक्षणासाठी लखनौ येथे पाठविण्यात आले. सप्टेंबर २००९ मध्ये नौशेरा श्रीनगरमधील अतिसंवेदनशील ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली. तेथील सर्व बटालियनमध्ये त्यांनी काम केले असून २८ मे, २०११ रोजी त्यांचे लग्न झाल्यावर अवघ्या पाच दिवसांत त्या देशसेवेसाठी कर्तव्यावर रुजू झाल्या. २०१२ मध्ये कंबाईन्ड सर्व्हिसमधून नेव्हीमध्ये नियुक्त झाल्यावर त्यांना ’मेजर‘ पदी बढती मिळाली. खरं तर सैन्याच्या प्रवेशप्रक्रियेतूनच त्यांच्या जिद्दीचा कस लागला. चित्रपटात दिसणारे सैन्यदल आणि प्रत्यक्ष सैन्यदल यामध्ये खूप फरक असतो. पण, एक महिला अधिकारी म्हणून त्यांना कायमच सन्मानपूर्वक वागणूक मिळाली. जवानांचे मनोबल वाढविणे, युद्धभूमीवर क्षणाचाही विलंब न करता निर्णय घेऊन उपचार करणे अशी महत्त्वाची कर्तव्ये त्यांनी बजावली आहेत.

मूळच्या कोकणातील वाडा, तालुका देवगडच्या मेजर डॉ. आश्लेषा तावडे-केळकर यांचे वडील अशोक तावडे उद्योजक असून, त्यांच्या आई अदिती तावडे नुकत्याच बँकेतून निवृत्त झाल्या आहेत. त्यांचे पती आदित्य केळकर ‘व्यवस्थापन सल्लागार’ म्हणून कार्यरत असून सध्या ते स्वित्झर्लंडला आहेत. मेजर डॉ. आश्लेषा तावडे-केळकर यांना दोन वर्षांची आनंदिता नावाची मुलगी आहे. सध्या त्या महात्मा गांधी नॅशनल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल, ऐरोली येथे आपले एमडीचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या सैन्यदलातील अतुल्य कामगिरीमुळे महात्मा गांधी मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलमध्ये नि:शुल्क त्यांना प्रवेश देण्यात आला. त्यांच्या परिवाराच्या पाठिंब्यामुळेच त्या इतक्या वेगळ्या क्षेत्रात काम करू शकल्या.

सैनिक आणि डॉक्टर म्हणून दुहेरी जबाबदारी पार पाडणार्‍या मेजर आश्लेषा सैनिकांच्या कर्तृत्वाविषयी अभिमानाने सांगतात की, ‘’शिस्त आणि कर्तव्य हेच आमचे ब्रीदवाक्य असून कोणत्याही कठीण समयी न डगमगता आपले सैनिक डोळ्यात तेल घालून देखरेख करीत असतात. म्हणूनच सामान्य माणूस आरामात जगू शकतो. श्रीनगरला रोजच चकमकी घडत असतात. अनेकदा दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ‘गोरिला वॉर‘ केले जाते. यावेळी सैनिक जखमी होतात. यावेळी सैनिकांसाठी एक सैनिक व डॉक्टर म्हणून मला महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागते.”

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, “आपल्या सैन्य, नौदल आणि वायुदलामध्ये ‘फ्री-हॅण्ड’ दिल्यानंतर सर्व निर्णय त्यांचे स्वत:चे असतात. त्यात राजकीय हस्तक्षेप नसतो. त्यामुळे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला झाला का? असे प्रश्न साहजिकच सैनिकांचे मनोबल खच्ची करणारे ठरतात. सामान्य लोकांना सर्वच महत्त्वाच्या गोष्टी सांगणे गरजेचे नसते. कारण, त्यामागे काही महत्त्वाची कारणं असतात.” तसेच त्या समाजमाध्यमांवरील पोस्ट्सवर सहजासहजी विश्वास न ठेवण्याचा सल्लाही देतात. कारण, त्यांच्या मते, यात काही राजकीय लोकांना आपली पोळी भाजायची असल्याने ते सामान्य जनतेला लक्ष्य करतात. या प्रकारच्या बातम्या जेव्हा जवानांपर्यंत पोहोचतात, तेव्हा त्यांचे खच्चीकरण होते. त्यांच्या जोश आणि जुनूनला तडा जाऊ नये, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज त्या बोलून दाखवतात.

त्या म्हणतात की, “सैन्याविषयी एखाद् विधान करणं खूप सोपं आहे. मात्र, त्या परिस्थितीत ज्यांनी अशा सर्जिकल स्ट्राईक किंवा ऑपरेशन्समध्ये भाग घेतला, त्यांनाच तेथील सत्यता माहीत असते. अशाप्रकारची अप्रत्यक्ष ऑपरेशन्स सतत सीमेवर सुरू असतात आणि त्यासाठी प्रत्येक सैनिक नेहमी सज्ज असतो. प्रत्येक दिवस त्याच्यासाठी वेगळा असतो.”

सैन्यातील नोकरीकडे हल्ली करिअर म्हणून बघण्याचा तरुणांचा वाढता कल याविषयी मेजर डॉ. आश्लेषा यांना विचारले असता, त्या म्हणतात की, “आजच्या पिढीसाठी सैन्य हे करिअरसाठी एक सुवर्णसंधी आहे. पण, फक्त अभिनंदनसारख्या मिशा ठेवण्यापेक्षा त्याच्यासारखं वाघाचं काळीज ठेवा. यासाठी प्रचंड मेहनत, कष्ट आणि जिद्दीची गरज आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल होणार्‍या, आपल्या जवानांविषयी अविश्वास व्यक्त करणार्‍या बातम्या जवानांसाठी नक्कीच खेदजनक असून त्यांच्या मनावर त्याचे आघात होतात. त्यामुळे सर्वांनीच याचे तारतम्य बाळगून बोलणे गरजेचे असल्याचे त्या अधोरेखित करताततसेच, महिलावर्गाला यशाचा मंत्र सांगताना त्या म्हणतात की, “महिलांनी नेहमीच सक्षम राहिले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीचा धैर्याने सामना केला पाहिजे. स्वतःचा आत्मविश्वास कायम ठेवून आपल्या क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” देशरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावणार्‍या या वीरांगनेस सलाम...!

- कविता भोसले 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@