चैत्रवनातील रामधून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019
Total Views |




चैत्र मासारंभ म्हणजे नववर्षारंभ! आम्रतरूवर मोहोरलेला गंध आणि पर्णसंभारातून तानावर तान घेणारी कोकिळा! कोकिळा गाऊ लागली की जाणवतं ते सर्वत्र पसरलेलं सुगंधाचं वातावरण... कोवळ्या पालवीचं पालवणं! लालसर, तांबूस, कोवळ्या पर्णांनी आशा पल्लवीत करणारा निसर्ग. नववर्ष हे नवे संकल्प घेऊन येणारे असतं. श्रीरामाची विजयपताका अंबरात झळकावणारी गुढी! सर्वत्र उत्साह, उल्हास ओसंडून वाहतो. प्रभू श्रीरामाच्या जयघोषात, नामघोषात आसमंत दुमदुमतो. विजयाची यशोगाथा स्वपराक्रमाने साकारणारे प्रभू श्रीराम! चैत्र मास व प्रभू श्रीराम मरगळलेल्या मनांना पुनश्च प्रफुल्लता प्रदान करतात. हे दोघंही नववर्षाला आपल्या समवेत घेऊन येतात.

 

सूर्यनारायणही आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी आतुर झालेला. आकाश निळ्याशार रंगामधून आश्वासकता पेरते. त्याचसमवेत चैत्रगौरदेखील निसर्गाच्या आनंदझुल्यात बसते. भक्त तिचं आणि प्रभू श्रीरामाचं पूजन करण्यात गढून गेलेले असतात. भक्त शक्तीला भजतात आणि रामपाठात रमतात. झुलणे, रमणे आणि भजणे, पूजणे याचा सुरेख मेळ होऊन भक्तीला उधाण येतं. एका आगळ्या धुंदीने धुंदावतात. रामनाम, रामकथा आणि रामगीता घराघरात, मंदिरा-मंदिरात घुमते. त्याचबरोबर देवीच्या श्रीसूक्ताचे सूर धूप-दीपाबरोबर मना-मनाभोवती रेंगाळतात. रामपाठ आणि देवीपाठाचे दैवीस्वर भक्तांना भावतात, त्यांच्यात ऊर्जा निर्माण करतात.

 

भारताच्या कानाकोपर्‍यातून, कडेकपारीतून भक्तांचा भावपूर्ण सूर आणि स्वर घुमतो. चैत्र मोठ्या कौतुकाने सगळा सुंदर सोहळा अनुभवतो. त्याला आपण भाग्यवान असल्याची प्रचिती येते. एकपत्नी, एकवचनी आणि एकबाणी श्रीरामाच्या गुणगायनाचा आस्वाद घेण्यात चैत्र रममाण होतो. आदर्शाचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे श्रीराम. आपल्या पित्याच्या वचनाचे पालन करण्यासाठी आनंदाने १४ वर्षांचा वनवास पत्करणारे आदर्श पुत्र श्रीराम! दानव, दैत्यांचे निर्दालन करून साधू-संत, सज्जनाचे रक्षण करणारे श्रीराम! प्रजाहितदक्ष, कर्तव्यतत्पर असा आदर्श राजा श्रीराम! रामराज्यामध्ये दु:खाला शिरकाव करण्यास फटही न ठेवणारा, चोरांच्या वृत्तीला पूर्णविराम देणारा राजाराम! सुख, समाधान आणि संपन्नतेचा कलश काठोकाठ भरणारा राजाराम! संपूर्ण समाजाला आदर्श राज्याचा पाठ घालून देणारे श्रीराम! याचा आनंद अनुभवणारा चैत्र अंतर्बाह्य फुलून येणं स्वाभाविक आहे.

 

सर्वत्र नववर्षाचा जल्लोष आणि भक्तीचा कल्लोळ झालेला. समाजमनाला आदर्शाची पूजा करण्यासाठी प्रवृत्त करणारा चैत्रमास! चैत्रपालवी ही मनामनाला फुटलेली आणि जगण्याला नवा आयाम देणारी असते. जीवनाला स्वानंदाचे धुमारे फुटून त्यामधून भक्तीचा भावपूर्ण रंग लाभलेला असतो. चैत्राच्या तेजस्वी चांदण्यात न्हाताना येणारी अनुभूती आगळीच असते. एक सुंदर पोत प्रदान करणारा राममय होऊन गेलेला चैत्रमास... रामायणाचा नायक श्रीराम समाजाचा नायक झाला की रामराज्य साकारणार हे नक्की! रामराज्याची सात्त्विक स्वप्न प्रत्यक्षात येण्याची सुलक्षणं एकवटून आलेली. रामाची उपासना करून रामरायाला बुद्धी मागणारा, युक्ती आणि शक्ती यांचे ऐक्य होऊन नितांत, नितळ झालेला रामभक्त परिवार! या परिवाराची विशालता मोठी झालेली आहे. सगळे हवेहवसे वाटणारा चैत्रमास. वर्षाचा प्रारंभ इतका चांगला झाल्यावर संपूर्ण वर्ष उत्तम जाणार याची ग्वाही देणारे प्रभू श्रीराम! श्रीरामासमवेत देवी गौरीची शक्ती असल्यावर अजून काय पाहिजे? आंबट कैरीचे गोड आंब्यामध्ये रूपांतर करणारा भगवंत आणि आदिमाया यांच्या अलौकिकतेपुढे मानव नतमस्तक होतो. मानव आपल्या जन्माचे सार्थक होण्यासाठी कळवळून मागणं मागतो.

 

कोमल वाचा दे रे राम।

विमल करणी दे रे राम

तुझी आवडी दे रे राम।

दास म्हणे मज दे रे राम।

 

चांगली, गोड, कोमल वाचा देण्याची विनंती भक्त रामाला करतो. त्या वाचेने तुझं नाम घेण्याची बुद्धी दे, असं मागणं मागतो. शुद्धाचरण हातून घडण्याची विनंती करतो आहे. हे रामा, रामनामाची, रामसेवेची आवड तूच मला दे.

 

ब्रह्मानुभव दे रे राम।

अनन्यसेवा दे रे राम॥

 

हे रामराया, तू तर साक्षात सावळं परब्रह्म आहेस पण, मला त्याचा अनुभव येत नाही. मी तुला शरण आलो आहे. मला परमार्थातील सर्वोच्च असा परब्रह्माचा अनुभव देण्यास तूच समर्थ आहेस. ती प्रचिती येण्यासाठी तू मला अनन्य भावानं सेवा करण्याची बुद्धी दे. खरेच भक्ताने भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन आर्तपणे मागणे मागितल्यावर रामाला ते पूर्ण केल्याशिवाय चैन पडणं शक्य नाही. श्रीराम भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. त्यामुळे त्यांना कळवळा येणारच. हे जाणून भक्त करुणा भाकतात.

 

तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी

 

भगवान श्रीराम आणि रामभक्त यांच्यामधील हे नातं नितांत गहिरे आहे. भक्तांनी भावपूर्णतेने करुणा भाकली की भवसागरात बुडण्याचा धोका संपून जातो. चैत्रमास, गुढी, तोरणे, नववर्षाचा प्रारंभ, प्रभू रामरायाची अनन्य भक्ती याचं वेगळंच रसायन तयार होतं. या सगळ्याला संपूर्ण साथ देतेे ती देवी गौरी मग भक्तांच्या रामगजरात अवघा निसर्ग अधिकच चैतन्यदायी होऊन जातो. चैतन्यमय श्रीराम जीवनात शुद्ध पुनश्च राम आणून रामरसाचा आस्वाद प्रदान करतात. मग केलेले शुद्ध संकल्प विरून न जाता पूर्णत्वाला नेण्यास प्रभू राम संपूर्ण साहाय्य करतात. ‘हे प्रभो, हे रामराया, तू सकलांचे कल्याण कर,’ ही प्रार्थना भक्तांच्या मुखातून श्रवण करताना रामाचे मन भरून येते. आत्माराम आनंदाने नाचायला लागतो. रामभक्तीचे अमृत प्राशन करणारे भक्त अजरामर होऊन जातात.

 

- कौमुदी गोडबोले 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@