राहुलना पाडण्याची सुपारी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2019
Total Views |




केरळचे मुख्यमंत्री व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते पिनराई विजयन तसेच प्रकाश करात या दोघांनीही राहुल गांधींनी वायनाडमधून निवडणूक लढविल्यास आम्ही पराभवाचा हिसका दाखवू, असे स्पष्ट केले. डाव्या पक्षांच्या या भूमिकेमागे निश्चितच काही कारणे आहेत, ज्यामुळे आज त्यांनी उघडपणे राहुल गांधी व काँग्रेसला विरोध करण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते.


सदैव यशाचे धनी झालेल्याला अपयशाची भीती कायम सतावत असते. पराभवाची जराशी चाहूल लागली तरी अशी माणसे कावरीबावरी, सैरभैर होतात. सध्या अशीच अवस्था बटाट्यापासून सोने पैदा करण्याची अचाट कल्पना मांडणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची झाल्याचे दिसते. अमेठी हा गांधी कुटुंबाचा परंपरागत मतदारसंघ, नेहमीच यशाची हमी देणारा. केंद्रात काँग्रेसची सत्ता असो वा नसो, अमेठीतल्या मतदारांनी नेहमीच गांधी कुटुंबीयांवर विश्वास दाखवत भरभरून मतदान केले. पण, संपूर्ण देशालाच गेल्या ७० वर्षांपासून बनविणाऱ्यांनी अमेठीतल्या लोकांचाही विश्वासघातच केला. देशाला तीन-तीन पंतप्रधान दिलेल्या गांधी घराण्याने अमेठीच्या विकासासाठी, प्रगतीसाठी काहीही केले नाही. म्हणूनच आजही काँग्रेस अध्यक्ष प्रतिनिधीत्व करत असलेल्या अमेठीला अवकळा आल्याचेच दिसते. कारण, गांधी कुटुंबाने समस्या सोडविण्यापेक्षा जुमलेबाजी करून लोकांना भुलवण्याला दिलेले प्राधान्य, तर अशा मतदारसंघात २०१४च्या निवडणुकीत भाजपनेत्या स्मृती इराणी यांनी अमेठीला स्वतःची खाजगी जहागीरदारी समजणाऱ्या राहुल गांधींना सळो की पळो करून सोडले. तीन-साडेतीन लाखांचे मताधिक्य घेणाऱ्या राहुलना केवळ लाखभर मतांच्या फरकाने रडतखडत विजय मिळवता आला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी यांनीच राहुल गांधींची झाक उतरविण्याचे आव्हान देत अमेठीच्या मैदानात उडी मारली. परिणामी जिथून सदैव यशच मिळत राहिले तिथूनच हरण्याच्या भीतीने घराण्याच्या युवराजाची अन् गुलामांचीही चांगलीच तंतरली. म्हणूनच त्यांनी आपल्या खाविंदांच्या कीर्तीला (!) धक्का पोहोचू नये, असा विचार करत सुरक्षित मतदारसंघासाठी शोधाशोध चालू केली. अखेरीस केरळच्या वायनाड मतदारसंघात मुस्लीम आणि ख्रिस्ती मतांच्या भरभक्कम पाठिंब्यावर राहुल गांधी निवडून येऊ शकतील, अशी खात्री गांधीपरिवार शरणविंदांना पटली व त्यांनी पक्षाध्यक्ष तिथूनच निवडणूक लढवतील, असे जाहीरही करून टाकले. मात्र, ज्या मतदारसंघाचा ‘सुरक्षित, सुरक्षित’ म्हणून गाजावाजा केला तिथेच डाव्यांनी बेटकुळ्या दाखवत दंड थोपटले व निवडणूक लढवल्यास राहुल गांधींना पाडूनच दाखवणार, असा निर्धारही बोलून दाखवला. केरळचे मुख्यमंत्री व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते पिनराई विजयन तसेच प्रकाश करात या दोघांनीही राहुल गांधींनी वायनाडमधून निवडणूक लढविल्यास आम्ही पराभवाचा हिसका दाखवू, असे स्पष्ट केले. डाव्या पक्षांच्या या भूमिकेमागे निश्चितच काही कारणे आहेत, ज्यामुळे आज त्यांनी उघडपणे राहुल गांधी व काँग्रेसला विरोध करण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते.

 

वस्तुतः राहुल गांधीच नव्हे तर गांधी घराण्यातील इतरही दोन व्यक्तींनी उत्तरेतल्या पराजयाच्या धास्तीने दक्षिणेत आश्रय घेतल्याची उदाहरणे आहेत. देशावर लादलेल्या आणीबाणीने रसातळाल्या गेलेल्या लोकप्रियतेने इंदिरा गांधींचा १९७७च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. रायबरेलीतून जिंकून येणाऱ्या इंदिरा गांधींना भारतीय लोकदलाच्या राज नारायण यांनी ५० हजारांहून अधिक मतांनी हरवले होते. ‘इंदिरा इज इंडिया’ समजणाऱ्यांच्या दृष्टीने हा तगडा झटका होता व त्यातूनच केवळ रायबरेलीच नव्हे तर संपूर्ण देशातही काँग्रेसची अवस्था बिकट होत गेली. १९७७च्या पराभवाची गडद छाया डोक्यावर असणाऱ्या इंदिरा गांधींनी म्हणूनच १९७८च्या लोकसभा पोटनिवडणुकीत कर्नाटकातील चिकमंगळूरमधून, तर १९८०च्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशातील (आता तेलंगण) मेडकमधून निवडणूक लढवली. इंदिरा गांधींना वाटत असलेली अपयशाची भीतीच थेट कर्नाटकातल्या अन् आंध्र प्रदेशातल्या सुरक्षित मतदारसंघातून निवडणूक लढवण्यामागे होती. पुढे सोनिया गांधींनीदेखील १९९९ साली अमेठीसह कर्नाटकच्या बेल्लारीतून निवडणूक लढवली. इटालियन वंशामुळे अमेठीत आपला निभाव लागणार नाही, असे समजूनच सोनिया गांधींनी बेल्लारीच्या दिशेने पळ काढला होता. आज राहुल गांधीदेखील घराण्याच्या इतर परंपरांप्रमाणेच हा पलायनाचा वारसादेखील इमानेइतबारे पुढे नेत असल्याचे दिसते. वायनाड लोकसभा मतदारसंघाची सामाजिक रचनादेखील याला कारणीभूत आहे. गेल्या काही काळापासून सौम्य हिंदुत्वाची पिपाणी वाजवणाऱ्या काँग्रेसींचा उत्तरेतल्या हिंदू मतदारांवर भरवसा नाही. राहुल गांधींना ‘जानवेधारी ब्राह्मण’ म्हणून प्रोजेक्ट करून वा मठा-मंदिरांचे उंबरठे झिजवून वा गंगेच्या पाण्यात डुबक्या मारून हिंदू मतदार आपल्यामागे येणार नाहीत, हे काँग्रेसलाही पटते. हिंदू दहशतवादाची अस्तित्वात नसलेली संकल्पना जन्माला घालणाऱ्या आपल्या पक्षाला हिंदू लोक समर्थन देणार नाही, हे काँग्रेसींना चांगलेच समजते. म्हणूनच हिंदुबहुल अमेठी वा उत्तर भारतातले चंबुगबाळे केरळातही घेऊन जाण्याची वेळ राहुल गांधी आणि काँग्रेसवर आली. ४९ टक्के हिंदू व ५१ टक्के मुसलमानांची, ख्रिस्त्यांची वस्ती असलेल्या मतदारांतल्या सर्वच अहिंदूंनी झोळीत मतांचे दान टाकले की, जिंकले राहुल गांधी, असा साधा-सरळ विचार टीम काँग्रेसने केला. जोडीला मुस्लीम लीगही काँग्रेसच्या पारड्यात गेली. पण, ज्यांनी अल्पसंख्याकांच्या भावनांशी खेळून, त्यांना सातत्याने झुलवण्यातच धन्यता मानली, त्यांच्या विकासाचे कोणतेही मापदंड निर्माण केले नाही, त्या काँग्रेसला मुस्लीम वा ख्रिस्ती समाजाने तरी का मतदान करावे, हा प्रश्न उरतोच. शिवाय इथे हिंदू मतदारांकडे काँग्रेसने दुर्लक्ष केल्याचे व आपले तेच खरेखुरे लांगूलचालनी रूप दाखविल्याचेही स्पष्ट होते.

 

दुसरीकडे पक्षाध्यक्षांना निवडून आणण्यासाठी कंबर कसलेल्या काँग्रेसी गुलामांच्या घोषणेला २४ तास उलटत नाहीत, तोच डाव्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. “तुम्ही भले राहुल गांधींना वायनाडमधून उमेदवारी जाहीर कराल, पण आम्ही मात्र राहुलना पराभूत करण्यासाठी काहीही करू,” अशा आवेशात पिनराई विजयन आणि प्रकाश करात यांनी विरोध केला. खरे म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभरात लढत होईल ती भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांतच. पण, राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि भाजप कार्यकर्त्यांचा तसेच देशातल्या सर्वसामान्य मतदारांचा एवढा धसका घेतला की, ते मुख्य प्रवाहातील पक्षाऐवजी माकपसारख्या उरल्यासुरल्या पक्षाविरोधात लढायला उतरले. राहुलनी देशात अन्यत्र कुठल्याही भाजप उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली असती तर त्यांचे धाडस नक्कीच दिसले असते. पण तसे काही नसल्याने अवसान गळालेल्या गांधी घराण्याच्या या युवराजाने माकपच्या गडात उतरण्याचे ठरवले. म्हणजेच राहुल गांधींमध्ये भाजपशी थेट टक्कर देण्याची हिंमत आणि धमक नाही, हीच गोष्ट स्पष्ट होते. परिणामी केरळ वगळता इतरत्र समविचारी, धर्मनिरपेक्ष, पुरोगामी नि आणखी कसली कसली लेबले लावून एकत्र येणाऱ्या डाव्यांचा तिळपापड झाला. राहुल गांधींना भाजपला नव्हे तर माकपलाच संपवायचे असल्याने ते केरळात आल्याचे डाव्यांनी मनोमन निश्चित केले. आता राहुल गांधींना केरळमध्ये भारतीय जनता पक्ष तसेच माकपशीही दोन हात करावे लागतील. केरळात गेल्या काही निवडणुकांनंतर व माकप तसेच काँग्रेसच्या दाढी कुरवाळू अन् चर्चमधल्या झग्यांबाबतच्या गळेपडू धोरणाने तिथल्या हिंदूंमध्ये कमालीचा रोष उत्पन्न झाल्याचे पाहायला मिळाले. शबरीमला प्रकरणानंतर सत्ताधारी माकपविरोधात तर लाटच निर्माण झाली, तसेच काँग्रेसदेखील वायनाडमध्ये हिंदूंच्या नव्हे तर मुसलमान व ख्रिस्त्यांच्या बळावरच विजयाचे इमले बांधताना दिसली. अशात भाजपला हिंदूंनी पाठिंबा दिल्याने आणि मुसलमान व ख्रिस्त्यांची मते काँग्रेस-माकपमध्ये विभागल्याने पराभव पदरी पडेल, अशी भीती पिनराई विजयन यांच्यासह प्रकाश करातांच्याही डोक्यात निर्माण झाली. सोबतच देशात भाजपविरोधात लढणाऱ्या काँग्रेसींनी छोट्या छोट्या पक्षांना संपविण्याचा डाव तर शिजवला नाही ना, असेही डाव्यांना वाटत असावे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस विजयी होणार नाहीच, पण अन्य राज्यांतल्या प्रादेशिक वा पुरोगामी पक्षांशी आघाडी करण्याऐवजी स्वबळावर लढायचे आणि मतविभागणीच्या माध्यमातून समविचारी पक्षांचेच खच्चीकरण करायचे, अशी खेळीही काँग्रेसने रचली असेल. जेणेकरून पुढेमागे इतरांना काँग्रेसला आपल्या तालावर नाचवता येईल. माकपच्या इशाऱ्याकडे या पृष्ठभूमीवरही पाहिले पाहिजे व तसे होऊ नये म्हणूनच माकपने राहुलना पाडण्याची जणू काही सुपारीच घेतली असावी. अर्थात काँग्रेस असो वा माकप देशातल्या जनतेला दोन्हीही नकोतच अन् ते असे आपापसात भांडून संपले तर उत्तमच!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@