जयंती विशेष : डॉ. हेडगेवार यांच्या जीवनातील 'हे' दोन प्रसंग तुम्हाला प्रेरित करतील...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2019
Total Views |



रा.स्व.संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म नागपूरमध्ये १ एप्रिल १८८९ रोजी झाला. पेशाने डॉक्टर असणारे हेडगेवार जन्मापासूनच राष्ट्रभक्तीच्या विचारांनी प्रेरित होते. रा.स्व.संघाचे स्वयंसेवक नाना पालकर यांनी त्यांच्या बालपणाबद्दलच्या काही अशा घटनांचा उल्लेख केला कि, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वाची ओळख होते. त्यांच्या जीवनातील ते दोन महत्वाचे प्रसंग पालकर यांच्या शब्दातून...

 

केशव हे आपल्या तीन भावंडांमध्ये सर्वात लहान... त्यांचे वडील बळीराम पंत हेडगेवार हे केशव यांना आधूनिक शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील होते. पालकर यांनी उल्लेख केल्यानुसार, 'केशव यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवण्याचा निर्णय ठरला. महाल येथील नीलसिटी हायस्कुलमध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला. मात्र, त्याकाळच्या इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतरही त्यांची देशाविषयीची भावना तशीच कायम होती. लवकरच त्यांच्या देशभक्तीची परिक्षा घेणारा एक प्रसंग घडला'.

 

पालकर यांनी उल्लेख केल्यानुसार, '२२ जून १८९८ रोजी इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरीया यांच्या राज्यरोहण सोहळ्याला साठ वर्षे पूर्ण झाली होती. त्यानुसार या घटनेच्या पार्श्वभूमीवर इंग्रजांच्या अधिपत्याखालील राष्ट्रांमध्ये त्यांच्या विजयाचा डंका पिटवला गेला. राज्यरोहणाच्या दिवशी प्रत्येक गावागावांमध्ये विजयोत्सव साजरा करण्याचेही आदेश देण्यात आले होते. ध्वज, हार, पताका, वाद्य आदींनी गावे सजली होती. लहान मुलांना मिठाई वाटप करण्यात आले होते. मात्र, ही मिठाई भारतीयांच्या गुलामीचीच एक प्रतिक होती. बाळ केशव यांच्याही मनात मिठाईबद्दल राग होता. इतर मुले मिठाई मिळाल्याने आनंद व्यक्त करत होती, त्यावेळेस केशव यांनी मिठाई कचरा कुंडीत फेकली. केशव यांच्या बंधुंनी त्यांच्या चेहऱ्यावरील राग पाहून 'तुला मिठाई मिळाली नाही का ?', असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, "आपल्याला गुलाम बनवणाऱ्यांच्या मिठाईचे कसले कौतूक"

 

यानंतर असा प्रसंग पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात आला. इसवी सन १९०१ मध्ये राजा एडवर्डच्या राज्यरोहण सोहळ्यानिमित्त स्थानिक मिल मालकांनी प्रचंड आतषबाजी केली होती. डोळे दिपवून टाकणारे फटाके पाहून त्यांच्या वयाची मुले ही आतषबाजी पाहण्यासाठी धावले. मात्र, केशव यांना विचारल्यावर त्यांनी नकार दिला. विदेशी राज्यरोहण दिवस साजरा करणे आपल्यासाठी लज्जास्पद आहे. हा सोहळा पाहण्यासाठी मी येणार नाही.

 

१९२५ मध्ये वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांनी रा.स्व.संघाची स्थापना केली. देशभक्तीची भावना त्यांच्या बालमनावर खोलवर होती. बालपणापासून छत्रपती शिवचरित्रांचा प्रभाव होता. नागपूरच्या सीताबर्डी किल्ल्यावर ब्रिटीश सरकारचे प्रतीक असलेला युनियन जॅकचा झेंडा फडकता पाहून त्यांच्या मनावर आघात होत होता. युनियन जॅकचा झेंडा हटवून त्या जागी भगवा फडकवण्याचा विचार केशव आणि त्यांच्या मित्रांच्या मनामध्ये आला. त्यानुसार योजनेला सुरुवात झाली. शाळेपासून किल्ल्यापर्यंत एक सुरुंग बनवून झेंडा हटवण्याची योजना त्यांनी आखली.

केशव हेडगेवार ज्या वेदशाळेत शिकत होते
, त्यानुसार सुरुंग खोदण्याचे काम सुरू झाले. त्या शाळेतील विद्वान श्री नानाजी वझे यांच्या अभ्यासिकेच्या खोलीतून सुरुंग खोदण्याचे काम सुरू झाले. बराच वेळ खोली बंद असल्याने वझे गुरुजींना शंका आली. त्यावेळी गुरुजींनी आपल्याला पकडले हे समजून सर्व मुले भयभीत झाली मात्र, गुरुजींनी त्यांच्यावर न रागवता त्यांच्या देशप्रेमाचे कौतूक केले. मात्र, अशा मोहिमांमध्ये वेळ वाया घालवू नका, असा सल्ला त्यांना दिला.

 

त्यानंतर हेडगेवार उच्च शिक्षणासाठी कोलकात्याला गेले. १९१५ मध्ये डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केल्यावर ते पुन्हा नागपूरात परतले. काही काळ प्रॅक्टीस केल्यानंतर त्यांनी संघाची स्थापना केली. तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या जन्मकाळापासूनच आतापर्यंत नाव, पद, यश, प्रतिष्ठा, आत्मस्तुती आणि प्रचार यापासून कित्येक कोस दूर राहून राष्ट्रहिताला प्राधान्य दिले आहे. २१ जून १९४० रोजी वयाच्या ५१ व्या वर्षी हेडगेवार यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@