एक लढवय्या राष्ट्रपती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2019   
Total Views |



राष्ट्रपतिपदी आरुढ होण्याबरोबरच जुजाना यांचे नाव जगभरातील कोणत्याही देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान वा राष्ट्रपतींच्या यादीतही सामील झाले.


गेल्या दोन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय माध्यमांत सर्वाधिक चर्चेत असलेली महिला म्हणजे जुजाना केप्यूटोवा. अर्थात जुजाना यांचे नाव गाजण्यामागेही एक विशेष कारण आहे, तेही राजकीय! वस्तुतः जुजाना स्लोव्हाकियाच्या पहिल्या महिला आहेत, ज्या आता राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्या. म्हणजेच जुजाना आता स्लोव्हाकियाच्या पहिल्या महिला ‘हेड ऑफ द स्टेट’ आहेत. राष्ट्रपतिपदी आरुढ होण्याबरोबरच जुजाना यांचे नाव जगभरातील कोणत्याही देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान वा राष्ट्रपतींच्या यादीतही सामील झाले. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनझीर भुत्तो, ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर, श्रीलंकेच्या पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ भंडारनायके, बांगलादेशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांच्यासह इतरही अनेकांच्या रांगेत आता जुजाना केप्यूटोवा यांच्या नावाचा समावेश झाला. वर पहिल्या महिला पंतप्रधानांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे इसाबेल पेरोन या पहिल्या अशा महिला आहेत, ज्यांनी कोणत्याही देशाच्या राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. १९७४ ते १९७६ दरम्यान इसाबेल यांनी अर्जेंटिनाच्या ४३ व्या राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. आशियाचा विचार करता मारिया कोरिझोन या पहिल्यांदा फिलिपिन्सच्या राष्ट्रपती झाल्या होत्या.

 

राष्ट्रपतिपदी निवडून आल्यानंतर जुजाना यांनी आपल्या विजयाबद्दल देशवासीयांसह हंगेरी, झेक प्रजासत्ताक, रोमानियाच्या नागरिकांनाही शुभेच्छा दिल्या. हे सर्वच स्लोव्हाकियाचे शेजारी देश आहेत. जुजाना यांना स्लोव्हाकियामध्ये एरिन ब्रोकोविच या नावानेदेखील ओळखले जाते. सोबतच ४५ वर्षांच्या जुजाना एक उदारमतवादी वकीलही आहेत. निवडणुकीनंतर पहिली प्रतिक्रिया देताना जुजाना म्हणाल्या की, “राष्ट्रपतिपदी निवड झाल्याने मी खूपच खुश झाले असून इथपर्यंतचा माझा प्रवास मात्र मोठ्या कष्टाचा आणि आव्हानांचा होता,” असेही त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी इथे झालेल्या निवडणुकीत जुजाना यांनी ५९ टक्के, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सेफकोविक यांना जवळपास ५२ टक्के मते मिळाली होती. सेफकोविक यांनीही आपला पराभव स्वीकारत केप्यूटोवा यांचे अभिनंदन केले. जुजाना यांचे नाव स्लोव्हाकियात पहिल्यांदा समोर आले ते भ्रष्टाचारविरोधी मोहिमेच्या कर्त्याधर्त्या म्हणून. जुजाना यांनी ही मोहीम स्लोव्हाकियाच्याच एका पत्रकाराच्या हत्येनंतर सुरू केली होती. जेन कुसियाक नामक पत्रकार आणि त्याच्या मैत्रिणीची हत्या गेल्यावर्षीच्या जानेवारीमध्ये झाली होती. हत्येनंतर जुजाना केप्यूटोवा यांनी याविरोधात हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून देशभरात आंदोलन छेडले. जुजाना यांना या मोहिमेत चांगलेच यश मिळाले आणि या हत्येसाठी जबाबदार असलेल्या एका स्थानिक उद्योगपतीला केवळ अटकच केली गेली नाही तर त्याला दोषीही ठरविण्यात आले. पत्रकाराची हत्या आणि जुजाना यांच्या विरोध निदर्शनानंतर स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता, हे आणखी एक विशेष.

 

जुजाना यांच्या राजकीय प्रवासावर नजर टाकली तर तो फार जुना असल्याचे दिसत नाही. पत्रकाराच्या हत्येला जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी चालवल्या गेलेल्या मोहिमेदरम्यानच जुजाना यांना राजकारणात येण्याचे तसेच देशाच्या सर्वोच्चपदी पोहोचण्याचे वेध लागले. दुसरीकडे स्लोव्हाकियन नागरिकांनीही जुजाना केप्यूटोवा यांच्या या लढ्याला सक्रिय पाठिंबा दिला. गेल्याच महिन्यात ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत जुजाना यांनी म्हटले होते की, “देशातली जनता भ्रष्टाचारामुळे दुःखी आहे आणि ते परिवर्तन घडवू इच्छितात.” पुढे जुजाना यांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला व त्या निवडूनदेखील आल्या. राजकारणात प्रवेश करण्याआधी जुजाना यांनी न्यायालयात पीडितांच्या हक्कांची लढाई लढताना अनेक मोठी प्रकरणे जिंकली होती. पर्यावरणाशी संबंधित दशकभरापासून प्रलंबित मुद्द्यावर त्यांनी खटला लढवला आणि जिंकलादेखील. हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट हिने एका चित्रपटात अशाच एका महिलेची भूमिका केली होती. ज्युलिया यांचे या चित्रपटातले नाव होते एरिन ब्रोकोविच. म्हणूनच जुजाना यांनाही हा खटला जिंकल्यानंतर त्या नावाने ओळखले जाऊ लागले. दरम्यान, स्लोव्हाकियामध्ये समलैंगितकेला कायदेशीर मानले जाते व केप्यूटोवा यादेखील एलजीबीटी समुदायाशी निगडित लोकांच्या अधिकारांसाठी लढल्या आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@