धूळफेक की धूळधाण?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2019
Total Views |


 
 
 
 
आगामी काळात बलुचींची उग्र आंदोलने, भारतासह अफगाणिस्तान, इराणसोबतही पत्करलेले वैर, अशा परिस्थितीत हा आतून-बाहेरून धुमसणारा कर्जबाजारी पाकिस्तान पुन्हा दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची धूळफेक करतो की, त्याचीच धूळधाण उडते ते येणारा काळच ठरवेल.
 

लहान मुलांबरोबर लपंडाव खेळताना, त्यांचे लपण्याचे सगळे ठावठिकाणे चांगलेच माहिती असूनही खेळ आणखीन थोडा रंजक व्हावा, उत्सुकता काहीशी ताणली जावी म्हणून मुद्दाम इकडेतिकडे "कुठे लपलाय सोनू माझा..." असे म्हणत शोधमोहिमेत मुद्दाम वेळकाढूपणा केला जातो. आपण काही बुवा एवढ्यात पकडले जाणार नाही, या आत्मनादातच ते बिच्चारे लहान मूल मनातल्या मनात मग फिदीफिदी हसत असते. घरातील इतरही मंडळी मग लपलेलं आपलं पिल्लू दिसत असूनही अगदी "कुठ्ठे गेला कुणास ठावूक बाबा....?" असं अगदी बोबड्या आवाजात बोलून चेहऱ्यावर प्रश्नचिन्हाचे निर्विकार भाव उमटवतात. मग काय, त्या लपलेल्या मुलाला अजूनच जोश येतो आणि तो तसाच प्रतिसाद प्रत्येकवेळी देत जातो. सध्या पाकिस्तानची अवस्था ही अशीच लपंडावातील शोधाशोधीचे नाट्य रचणाऱ्या पालकांसारखी, तर ‘आपण दिसत असूनही, दिसत नाही’ या लहान मुलाच्या आर्विभावात पाकी दहशतवाद्यांचे गट वावरत असल्याचे दिसते. पण, पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि खासकरून भारताच्या ‘एअर स्ट्राईक’च्या आक्रमक प्रत्युत्तरानंतर पाकमधील दहशतवाद्यांची जन्नतस्थळेच जहन्नुममध्ये तबदील झाली आहेत. तसेच, ‘फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ च्या (एफएटीएफ) ‘ग्रे लिस्ट’ मध्ये असलेल्या पाकिस्तानला काळ्या यादीत टाकायला फारसा वेळ लागणार नाही, याची पूर्ण कल्पना ‘नया पाकिस्तान’ची टिमकी मिरवणाऱ्या पाकच्या पंतप्रधान इमरान खान यांना आहेच. म्हणून, दहशतवादी, ज्यांना ते ‘नॉन स्टेट अॅक्टर्स’ संबोधतात, त्यांच्यावर कारवाईचा फार्स आवळण्याची खेळी खान यांनी खेळून पाहिली. पण, या खेळीतही पाकिस्तानचा दुटप्पीपणा, दहशतवाद्यांवरील कारवाईचा तोंडदेखला प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला.

 

२००८ साली मुंबईवरील २६/११च्या लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी केलेल्या निर्घृण हल्ल्यात १६६ निष्पापांना प्राण गमवावे लागले. या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि तोयबाप्रणित जमात-उत-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला त्यानंतर डिसेंबर २००८ मध्येच संयुक्त राष्ट्रसंघाने १२६७च्या ठरावाअंतर्गत जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्टही केले. भारतानेही सईदविरोधात पुराव्यांची पूर्तताही केली. पण, पाकिस्तानने सईदवर कोणतीही ठोस कठोर कारवाई न करता, सईदला काही काळ नजरकैदेत ठेवण्याचा आव आणला. नजरकैदेपेक्षा आपल्या नजरेखालीच पाकने सईदला वेळोवेळी पंखाखाली पाळले-पोसले. नोव्हेंबर २०१७ मध्ये हाफिज सईद त्या तथाकथित नजरकैदेतूनही मोकाट सुटला. आज २०१९ साल उजाडले तरी सईद पाकिस्तानात जिवंत आहे, पाकच्याच सैनिकी रुग्णालयात त्याच्यावर उपचारही सुरू असल्याचे वृत्त आहे. पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांना त्याच्या सगळ्या खैरियतीचीही अगदी पक्की खबरबात. अशा या सईदच्या मृत्यूच्या वावड्याही उठवून दिशाभूल करण्याचा नापाक प्रयत्नही झाला. पण, पाकचा उद्दामपणा काही एवढ्यावरच थांबलेला नाही. हाफिज सईदने लाहोरमधील मिर्झा अॅन्ड मिर्झा या कायदेशीर कंपनीच्या मदतीने चक्क संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहून त्याला दहशतवाद्यांच्या यादीतून मुक्त करण्याचीही मागणी केली. साहजिकच, ती मागणी संयुक्त राष्ट्रसंघाने झिडकारली आणि सईदला प्रत्यक्ष जाऊन पाकिस्तानात भेटण्यासाठी त्यांच्या टीमने व्हिसासाठी न्यूयॉर्कमधील पाक दूतावासाकडे तशी रीतसर मागणीही केली. मात्र, पाकने त्याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाला स्पष्टपणे नकार कळवत व्हिसाही नाकारला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेवटी हाफिजची बाजू पाकमधूनच ऐकण्यात आली, पण तरीही सईदचे नाव दहशतवाद्यांच्या यादीतून न वगळण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघाने घेतला.

 

भारतासह, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनेही संयुक्त राष्ट्रसंघाच्या या निर्णयाचे स्वागत केले. अशा या पाकिस्तानलाच काय, संयुक्त राष्ट्रसंघालाही न जुमानणाऱ्या सईदने आपली दहशतवादाची फॅक्टरी मात्र चालूच ठेवली. जैशचे मुख्यालय, १०० पेक्षा जास्त मदरसे, मशिदींमधून दहशतवादाची ही पिल्लावळ तो इतकी वर्षं बिनबोभाटपणे पोसतच होता. काश्मीरमधील पुलवामा येथील सीआरपीएफ जवानांवरील आत्मघातकी हल्ला ही त्याचीच उपज. पण, भारताने ‘एअर स्ट्राईक’ करत घरात घुसून दहशतवाद्यांना त्यांच्याच जमिनीत जीवंत गाडल्यानंतर, पाकिस्तानने परत दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे सोंग घेतले. पाकमधील दहशतवादविरोधी कायदा, १९९७ अंतर्गत २१ फेब्रुवारीला अगदी घाईघाईत जैश-ए-मोहम्मद, जमात-उत-दावा, फलाह-ए-इन्सानियत यांसारख्या दहशतवादी संघटनांवर बंदीची पाकने घोषणा केली. त्यामागचे कारण म्हणजे, त्याच्या दुसऱ्याच दिवशी ‘एफएटीएफ’च्या पाकिस्तानच्या ग्रे यादीतील दर्जावर चर्चा पॅरिस येथील बैठकीत होणार होती. कारण, ‘एफएटीएफ’च्या हवाल्याने पाकमधील संशयास्पद व्यवहारांचा आकडा जो २०१७ साली ५,५४८ इतका होता, तो ८,७०७ वर पोहोचला असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली. याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने गांभीर्याने पाहिल्यास पाकिस्तान काळ्या यादीत जाऊन त्याच्या आर्थिक नाड्या पूर्णत: आवळल्या जातील, याची प्रचिती इमरान यांना आहेच. म्हणून दहशतवाद्यांना यापुढे पाकिस्तानात थारा नाही, हे जगाला खासकरून ‘एफएटीएफ’ला पटवून देण्यासाठीच तोंडदेखल्या कारवाईचा हा खेळ खेळला गेला. पण, यातली खरी गोम म्हणजे, या दहशतवादी संघटनांवर शेड्युल-१ नुसार सरसकट बंदी न लादता, शेड्युल-२ नुसार केवळ ‘देखरेखी’ खालीच ठेवण्यात आले. ही बाब ४ मार्चला पाकिस्तान सरकारच्या एका आदेशान्वयेच उघडकीस आली आणि पाकचा बुरखा फाटला. कारण, केवळ ६८ दहशतवादी संघटना कायद्यान्वये बंदी घालता येणाऱ्या शेड्युल-१ मध्ये आहेत, ज्यामध्ये ‘जैश’ आणि ‘जमात’ चा समावेशच नव्हता. म्हणजे, मुद्दाम या दोन संघटनांना बंदीच्या नावाखालीही पाक सरकारने वेळोवेळी दिशाभूल करत अभयच दिले.

 

पाकचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनीही नुकतीच कबुली दिल्याप्रमाणे, याच दहशतवादी संघटनांचा वापर पाकिस्तानी सैन्याने, गुप्तचर यंत्रणांनी वेळोवेळी भारताला धुमसत ठेवण्यासाठी ‘प्रोक्सी वॉर’ सारखा केला. मग नवाझ शरीफ असो वा इमरान खान, लष्कराचे हेच धोरण त्यांनीही मुकाट्याने ‘जैसे थे’च ठेवले. पण, यंदा प्रश्न पाकिस्तानच्या दिवाळखोरीपर्यंत येऊन ठेपला आहे. त्यामुळे अशा या कट्टर चार-आठ लोकांसाठी २२ कोटी पाकिस्तानी जनतेला वेठीस धरायचे की या ‘नॉन स्टेट अॅक्टर्स’चा कायमचा बंदोबस्त करायचा, अशा द्विधा अवस्थेत इमरान खान सापडलेले दिसतात. त्याचेच प्रत्यंतर या कारवाईतील धूळफेकीतही दिसून आले. काल-परवाही १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचे अटकसत्र, मदरशांचे राष्ट्रीयीकरण, मशिदींवर सरकारी नियंत्रण यांसारख्या प्रथमदर्शनी कडक वाटणाऱ्या कारवाया इमरान खान यांच्या सरकारने अमलात आणल्याचे दिसते. परंतु, पाकिस्तानच्या दिखाऊपणाच्या सवयीनुसार या कारवायाही तात्पुरत्या, दिशाभूल करणाऱ्या आणि दहशतवाद्यांना सरकारी ताब्यात घेऊन जीवनदान देणाऱ्याच ठरतील, याचीच साशंकता अधिक आहे. त्यामुळे आगामी काळात बलुचींची उग्र आंदोलने, भारतासह अफगाणिस्तान, इराणसोबतही पत्करलेले वैर, अशा परिस्थितीत हा आतून-बाहेरून धुमसणारा कर्जबाजारी पाकिस्तान पुन्हा दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची धूळफेक करतो की, त्याचीच धूळधाण उडते ते येणारा काळच ठरवेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@