युद्ध, बुद्ध आणि निर्बुद्ध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2019
Total Views |



बुद्धाची युद्धाबाबतची शिकवण जशीच्या तशी आचरणे आज व्यवहार्य ठरेल का? याबद्दल शंका असू शकेल. पण, पुलवामा हल्ल्यानंतर गौतम बुद्धाने काय भूमिका घेतली असती, याचा अंदाज बुद्धकालिन ग्रंथांचा संदर्भ घेऊन किमान अक्कल असणारा लावू शकेल. त्यामुळे आपल्या लाडक्या पाकिस्तानला वाचविण्यासाठी बुद्धाचे नाव पुढे करण्याची गरज नाही. तसे चाळे करणारे निसंशय ‘निर्बुद्ध’ वर्गात मोडतात.


ज्या महापुरुषांवर भारतीय इतिहासकारांनी आणि त्यांच्या अनुयायांनी अगणित अन्याय केले, त्यात भगवान बुद्धांचे नावही समाविष्ट व्हायला हवे. त्यात सध्या पुलवामा हल्ल्यानंतर एरवी शांती नाकारत क्रांतीचा मार्ग पत्करणाऱ्या शुद्ध निर्बुद्धांनी ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ अशी हवा वळवण्याचा प्रयत्न करून बुद्धांवर आणखीन एक अन्याय केला आहे. बुद्धांच्या आध्यात्मिक शिकवणीत साधकांना शांतीतत्त्व, अहिंसेचा उपदेश आहेच; पण दुसरीकडे राज्यकारभार करणाऱ्यांना राज्यशास्त्रीय शिकवण देण्यातही भगवान बुद्ध कसर करीत नाहीत. महापुरुषांनी काय शिकविले, याऐवजी कोणत्या प्रसंगी काय शिकविले, यावर अधिक भर दिल्यास महापुरुषांच्या जीवनातील केवळ एकाच पैलूला उजळून उद्भवणारे पेचप्रसंग टाळता येतील. त्यासाठी अशा सत्पुरुषांच्या उपदेश, प्रवचनांचे अर्थ स्वीकारतानाच त्यांच्या जीवनात त्यांनी निरनिराळ्या प्रसंगी घेतलेल्या निर्णयांचेही अन्वयार्थ लावले पाहिजेत. सिद्धार्थ गौतमास ज्ञानप्राप्ती झाल्याच्या दुसऱ्याच वर्षी बुद्धांच्या शिष्यांनी राजा बिंबिसारच्या काही सैनिकांना धम्मदीक्षा दिली. धम्मदीक्षा घेऊन, भिक्खू संघात सामील झालेल्या व्यक्तीला भिक्खू संघाच्या नियमांचे पालन करावे लागते. जे सैनिक भिक्खू संघात सामील झाले, त्यांना आता सैनिकाचे कर्तव्य पार पाडणे अशक्य होते. आपल्या सैन्यातील सैनिकांना धम्मदीक्षा दिली गेली, हे राजा बिंबिसाराच्या लक्षात आल्यावर बिंबिसार आपली तक्रार घेऊन गौतम बुद्धांकडे गेले. आपल्या शिष्यांनी केलेला हा प्रकार गौतम बुद्धांच्या लक्षात आणून दिल्यावर, बुद्धाने एक कठोर नियम बनविला. तो नियम असा होता की, कोणत्याही सैनिकास, सेनानायकास भिक्खू संघाचा सदस्य करता येणार नाही. तसेच कोणत्याही भिक्खूने सैन्याच्या प्रतिनिधीस धम्मदीक्षा देऊ नये. जो सैनिकास धम्मदीक्षा देऊन भिक्खू संघात समविष्ट करून घेईल, तो दुष्कर्माचा दोषी असेल. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास २ हजार, ६०० वर्षांचा कालावधी उलटून गेल्यावरही या नियमाचे पालन ब्रह्मदेशासारख्या अनेक बुद्धानुयायी देशात केले जाते. बुद्धाच्या शिकवणीनुसार प्रजेचे रक्षण करणे हा राजाचा प्रमुख धर्म आहे. कारण, जर सेनाच नसेल तर संरक्षण होणार तसे कसे?

 

पुरातन भारतातील गौरवमयी राज्यव्यवस्थेच्या प्रशिक्षणाची एक घटना गौतम बुद्धांनी सांगितली आहे. ती महावजित नावाच्या एका महापराक्रमी राजाच्या जीवनातील आहे. त्या घटनेच्या कथनावेळेस राजाने आपली कर्तव्ये पार पाडल्यामुळे प्रजा सुखी होती, असे भगवान म्हणाले आहेत. भगवान बुद्धांनी राजाकडे अत्यंत बलशाली चतुरंगिणी सेना असल्याचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे विदेशी आक्रमकांची भारताकडे वाकड्या डोळ्याने पाहण्याची हिम्मत होत नसे. भगवान बुद्धांच्या मते, ते राज्य प्राचीन भारतातील आदर्श राज्यशासन होते. बुद्धकालीन मगध राज्याचे पश्चिमेकडच्या प्रदेशावर राज्य करणाऱ्या प्रसेनजितशी व्याहीसंबंध होते. त्यामुळे त्यांची पश्चिम सीमा सुरक्षित असे. पण, पूर्वेकडे अनेकदा छोट्या-मोठ्या चकमकींचा सामना करावा लागत असे. अशा वेळेस मग राजधानी राजगृहातून अतिरिक्त कुमकही पाठवावी लागे. एकदा राजा बिंबिसारचा पुत्र अभय याच्या नेतृत्वात सेना पाठविण्यात आली. शत्रूला पराजित करून राजपुत्र अभय परत राजधानीत आला, तेव्हा त्याच्या या पराक्रमाबदल्यात अभयला सात दिवस राजेपद बहाल करण्यात आले होते. याप्रसंगी भगवान बुद्ध तिथे उपस्थित होते. तसेच संपूर्ण विजयोत्सव गौतम बुद्धांच्या माहितगारीत झाला होता. कौशलनरेश प्रसेनजितदेखील आपल्या राज्याच्या सुरक्षेसाठी सदैव सतर्क असल्याबाबत ऐतिहासिक तथ्ये उपलब्ध आहेत. कौशलराज्याच्या पश्चिमी सीमेवर आक्रमकांशी लढण्याकरिता स्वत: राजा प्रसेनजितही जात असे. काही प्रसंग असेही आहेत, ज्यावेळेस युद्धाच्या आधी राजा प्रसेनजित गौतम बुद्धांचे आशीर्वाद घ्यायला गेला आहे. प्रसेनजित गौतम बुद्धांना युद्धवार्ता देत असे. एकदा राजा प्रसेनजितला गौतम बुद्धांनी मिश्किलपणे विचारल्याची नोंद आहे की, “आज कोणाशी लढायला निघालास? बिंबिसार, लिच्छवी की कोणी अन्य शत्रू?”

 

वृत्तीने धार्मिक असलेल्या राजाच्या हातात तलवारही असणे आवश्यक आहे. भगवान बुद्धांच्या वाणीनुसार जे पाच राजचिन्ह, जे सदैव राजाच्या सोबत असले पाहिजेत, त्यामध्ये तलवारदेखील आहे. भगवान बुद्धांचा प्रामाणिक शिष्य असलेल्या सम्राट अशोकाच्या शिलालेखावरून देशाच्या बाह्य सुरक्षेसंबंधी केलेल्या बंदोबस्तांचा अंदाज येऊ शकतो. सम्राट अशोकाबद्दल परराज्यातील राजे कायम दबकून असत. सुदूर पश्चिमी सीमेवरील एका शिलालेखावर परकीय शत्रूच्या राज्यातील प्रजेला उद्देशून, ‘त्यांनी घाबरू नये, माझ्या (सम्राट अशोक)वर विश्वास ठेवावा,’ असा मजकूर आढळला आहे. पण, या महान सम्राट अशोकाच्या साम्रज्याचा अंत का झाला असावा, याबाबत इतिहासकारांनी वेगवेगळे निष्कर्ष काढले आहेत. सावरकर बुद्धाच्या शिकवणीतून आलेल्या अहिंसाप्रेमाला दोष देतात, तर बौद्ध धर्माचे अभ्यासक, आचार्य सत्यनारायण गोएंका मात्र सम्राट अशोकच्या पुत्रांना आणि सत्ताप्राप्तीसाठी झालेल्या अंतर्गत राजकारणाला जबाबदार धरतात. त्याखेरीज देशाच्या बाह्य सुरक्षेसाठी सीमांत भागात कसा बंदोबस्त असावा, याबाबत भगवान बुद्धांनी सात गोष्टी अत्यावश्यक सांगितल्या आहेत. नगरोपमसुत्तात त्याची नोंद आहे.

 

. इंद्रकील : नगराच्या सुरक्षेसाठी एक सुदृढ स्तंभ नगरद्वाराच्या समोर जमिनीत उभा गाडण्यात यावा. हा स्तंभ एवढा मजबूत असावा की, एखाद्या हत्तीच्या धडकेनेही उखडला जाऊ नये. हा स्तंभ जितका जमिनीवर त्यापेक्षा जास्त जमिनीत गाडलेला असावा. हा स्तंभ राज्याच्या सार्वभौमत्त्वाचे प्रतीक असेल. (सारनाथ येथील अशोकस्तंभ याच संकल्पनेतील असावा, असा लेखकाचा अंदाज आहे.)

 

. सीमेलगत खोल दरी : किल्ल्याच्या सीमेलगत एक रूंद आणि खोल दरी असावी, जी शत्रूला ओलांडण्यास कठीण जाईल.

 

. सपाट जमीन : किल्ल्याच्या भिंती आणि दरी यांच्यामध्ये सपाट उंच जमिनीचा भाग असावा, ज्यावर नेहमी सेना तैनात केलेली असावी.

 

. आयुध भंडार : नगररक्षक महामात्य जवळ पुरेसे शस्त्रभांडार असावे. शस्त्रास्त्रे अपुरी पडली, म्हणून कधी पराजय ओढवता कामा नये.

 

. चतुरंगिणी सेना आणि शूर सैनिक : सुरक्षेसाठी युद्धप्रवीण सेना असली पाहिजे, ज्यात काही सुप्रशिक्षित सैनिक असावेत, जे शत्रुदलात थेट घुसून हल्ला करतील. याशिवाय इथे उपचारशाला, सैनिकांसाठी वैद्य इ.बाबत मार्गदर्शन केले आहे.

 

. शूरवीर द्वारपाल : किल्ल्याच्या दरवाजाची जबाबदारी सांभाळणारा अनुभवी, समजदार द्वारपाल असावा. जेणेकरून कोणतीही संदेहजनक व्यक्ती किल्ल्यात प्रवेश करू शकणार नाही.

 

. किल्ल्यांच्या भिंती : भिंती उंच असाव्यात आणि त्याच्या आडून एक सपाट रूंद भाग असावा, ज्यावर उभे राहून सैनिक शत्रुदलावर प्रक्षेपणास्त्रांनी हल्ला करू शकतील पण, शत्रू मात्र त्यांना इजादेखील करू शकणार नाही. यासोबतच भगवान बुद्ध चार आवश्यक गोष्टी भरपूर प्रमाणात कायम किल्ल्यात असाव्यात याबाबत मार्गदर्शन करतात. त्यात पशूसाठी चारा, अन्नधान्य तत्सम वस्तूंचा समावेश आहे.

 

थोडक्यात, गौतम बुद्धांच्या जीवनातील केवळ आध्यात्मिक, शांतिप्रिय जीवनाचाच आजवर ऊहापोह केला गेला. अर्थात, भगवान बुद्धांचे जीवन साधनाप्रधान, वैरागी होते. पण, म्हणून त्यांनी राज्यकारभार, राज्यशास्त्र, राजकारण या विषयांकडे दुर्लक्ष केलेले नाही, उदासीनता तर कधीच बाळगली नव्हती. सावरकरांनी ‘सहा सोनेरी पाने’ लिहिले तेव्हा देशात अहिंसा, शांती तत्वाने स्तोम माजवले होते. त्याकाळी देशाच्या मध्ययुगीन पारतंत्र्यासाठी बुद्धाच्या शिकवणीला जबाबदार धरणाऱ्यांचा एक मोठा गट इतिहासकारांमध्ये होता. त्यांनी त्यांचे संदर्भ घेतले असावेत. आज तितके सावरकर ‘विचारधनातून ऋण’ न्यायाने वगळले पाहिजेत. बुद्धाची युद्धाबाबतची शिकवण जशीच्या तशी आचरणे आज व्यवहार्य ठरेल का? याबद्दल शंका असू शकेल. पण, पुलवामा हल्ल्यानंतर गौतम बुद्धाने काय भूमिका घेतली असती, याचा अंदाज बुद्धकालिन ग्रंथांचा संदर्भ घेऊन किमान अक्कल असणारा लावू शकेल; अन्यथा सम्राट अशोकाने सारनाथ येथील स्तंभावर चारी बाजूला भेदक नजर ठेवणाऱ्या हिंस्र सिंहाच्या प्रतिमा उभारल्या नसत्या, त्याऐवजी शांतिप्रिय गाय किंवा कोकराला आपले आदर्श मानले असते. कराटे आणि कुंग-फुची कला भारतातून धर्मप्रसारासाठी जाणाऱ्या बौद्ध भिक्खूद्वारेच परदेशात गेली. (छद्मविज्ञानाबद्दल गळे काढणाऱ्यांचे लक्ष अजून इथे गेलेलं नाही; अन्यथा ते ‘छद्मकराटे’ वगैरे शब्दाचाही शोध लावून त्यावर लेख लिहू लागतील). आजही अनेक बुद्धानुयायी देशांमध्ये नियुद्ध कला जपल्या जातात. त्यामुळे आपल्या लाडक्या पाकिस्तानला वाचविण्यासाठी बुद्धाचे नाव पुढे करण्याची गरज नाही. तसे चाळे करणारे निसंशय ‘निर्बुद्ध’ वर्गात मोडतात. ‘निर्बुद्ध’ या शब्दाचा अर्थ, ‘ज्यांनी बुद्धीची आणि बुद्धांची दोघांचीही साथ सोडली,’ असा घेणे अपेक्षित आहे.

 

- सोमेश कोलगे

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@