काऊंट अॅन्टन फेबर - एकदम बिनधास्त!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 
 
 
काऊंट अॅन्टनने पेन्सिलवरही ही रबरी पुंगळी चढवली. हा बदल विद्यार्थीवर्गाला फारच आवडला. अशा आणखीही काही अभिनव कल्पना काऊंट अॅन्टननच्या मनात आहेत.
 

'सायबाचा पोर मोठा अकली रे, बिनबैलाची गाडी कसा हाकली रे’ असं एक कवन मुंबईतल्या कोणी हौशी कवीने केले होते. १८५३ साली भारतात रेल्वेची सुरुवात झाली. पहिली रेल्वेगाडी मुंबई (भायखळा) ते ठाणे या मार्गावर धावली. त्यावेळी आणि नंतरही कित्येक दिवस लोकांचे जथ्येच्या जथ्ये रूळाच्या दोन्ही बाजूंना गर्दी करून उभे राहायचे. बैल, घोडा, गाढव किंवा खेचर अशा कोणत्याही जनावराने न खेचता ही गाडी आपली आपण चालते कशी, हे त्यांना काही केल्या उमगत नसे. त्यातूनच वरील काव्य निर्माण झालं आहे. ‘सायबाच्या पोरा’च्या या अक्कलहुषारीबद्दल सर्वसामान्य लोकांना कमालीचं आश्चर्य वाटत असे. रेडिओच्या सुरुवातीच्या दिवसातही लोकांना वाटायचं की, ही रेडिओतही माणसं त्या खोक्याच्या आत कशी जातात आणि तिथून कशी बोलतात? असंच काहीसं ‘पेन्सिल’च्या बाबतीतही झालं. साधारण सन १९००च्या सुमारास ‘पेन्सिल’ ही बिगर शाईची लेखणी भारतात आली. गजानन ताम्हाणे हे तत्कालीन बडोदा संस्थानाचे दरबारी पहिलवान होते. त्यांना ‘माणिकराव’ असा किताब मिळाला होता. माणिकराव नुसतेच कुस्तीपटू नव्हते, तर ते कुस्ती या क्रीडाप्रकाराचे अभ्यासक होते. देशभरात सर्वत्र हिंडून ते टिप्पणं करीत असत. अशाप्रकारे ते इंदौरच्या होळकर संस्थानातल्या एक कुस्तीची टिपणं करीत असता त्यांच्या हातातील ‘पेन्सिल’नामक बिगर शाईची लेखणी पाहून खुद्द होळकर महाराजांना आश्चर्य वाटले होते. त्यापूर्वी भारतातच नव्हे, तर जगभरच शाईची दौत आणि वारंवार तिच्यात लेखणी बुडवीत कागदावर लिहिणे हाच लेखनाचा प्रकार रूढ होता. त्यामुळे लेखन हे अपरिहार्यपणे एक जागी बसूनच करावे लागत असे. माणसाच्या स्वभाववैचित्र्याप्रमाणे लेखण्यांचे अनेक प्रकार होते, शाईचे अनेक प्रकार होते आणि कागदाचेही अनेक प्रकार होते. पण कागद, लेखणी नि शाई यांची एकत्र गाठ घालायची असेल, तर बैठक मारून बसण्याला पर्याय नव्हता.

 

आज या सगळ्या गोष्टी आठवताना इतकं आश्चर्य वाटतं की, गेल्या १५०-२०० वर्षांत माणसाने जीवनाच्या प्रत्येकच क्षेत्रात केवढा बदल घडवून आणला आहे. जेमतेम १२० वर्षांपूर्वी जिथे पेन्सिलसुद्धा आश्चर्याने बघण्याचा प्रकार होता, तिथेच आज पोरसोरंसुद्धा खिशातून रुबाबात ‘आयपॅड’ काढून त्यांच्यावर मॅग्नेटिक लेखणीने लिहू शकतात. पण, अगदी खोलात जाऊन पाहिले, तर प्राचीन इजिप्शियन आणि रोमन लोकांना शिशाने लेखन करता येते, हे माहिती होते. इजिप्तमध्ये पपायरसवर म्हणजे गवतापासून बनवलेल्या विशिष्ट कागदावर शिसे वापरून लेखन केल्याचे पुरावे मिळालेले आहेत. म्हणजे शिशाने कागदावर केलेले लेखन हजारो वर्षे टिकलेले आहे. तरीही लेखनासाठी शाईचाच उपयोग होत राहिलेला दिसतो. यात बदल होण्यास सुरुवात झाली. सन १५६५ मध्ये. त्यावर्षी इंग्लंडमध्ये कंबरलँड भागात बॉक्ससाईट या खनिजाच्या खाणी सापडल्या. बॉक्साईट हे कागदावर शिशापेक्षाही जास्त चांगलं उमटतं, असं आढळलं. पण त्यातून ‘पेन्सिल’ निर्माण होण्याऐवजी सरकारने त्या खाणीच ताब्यात घेतल्या. का? तर बॉक्साईटचा उपयोग तोफेच्या गोळ्यामध्ये केला जात असे. पण, एकंदरीत बॉक्साईटच्या कांडीने कागदावर लिहिता येतं, हे हुषार लोकांच्या लक्षात आलं. एकट्या इंग्लडमध्येच नव्हे, तर युरोपातल्या अनेक देशांमधल्या कसबी सुतार व्यावसायिकांनी लाकडाच्या नळीत बॉक्ससाईटची कांडी भरून पेन्सिल ही बिगर शाईची लेखणी तयार करण्यास सुरुवात केली. याला उद्योगाच स्वरूप दिलं, ते जर्मनीतल्या किंवा तत्कालीन बव्हेरिया या जर्मन संस्थानातल्या न्यूरेंबर्ग शहराजवळच्या स्टाईन गावच्या कॅस्पर फेबर याने. कॅस्पर फेबर सन १७६१ साली मजबूत लाकडाची, ठळक लेखन करणारी उत्तम पेन्सिल तयार केली. फेबर हा अतिशय कल्पक डोक्याचा सुतार होता. अनेक गोष्टींचा विचार करून त्याने तयार केलेली ही पेन्सिल तत्कालीन जगात सर्वोत्तम होती. म्हणजे युरोपात अन्यत्रही पेन्सिल्स बनवल्या जात होत्या. पण, त्यांचा दर्जा बेताचाच होता. अमेरिकेतही पेन्सिल्स तयार होत होत्या. बेंजामिन फ्रँकलिन हा अमेरिकन राज्यघटनेचा निर्माता. तो पुढे राष्ट्राध्यक्षही झाला. त्याने सन १७९९ साली आपल्या ‘पेनसिल्व्हेनिया गॅसेट’ या वृत्तपत्रात पेन्सिल्सची जाहिरात छापलेली उपलब्ध आहे. जॉर्ज वॉशिंग्टन हा अमेरिकेचा राष्ट्रनिर्माता आणि पहिला राष्ट्राध्यक्ष. सन १७६९ साली त्याने ओहायो प्रांताचे सर्वेक्षण करताना पेन्सिल वापरली होती. परंतु, या सगळ्या पेन्सिल्समध्ये कॅस्पर फेबरने तयार केलेली पेन्सिल फारच उत्तम दर्जाची होती.

 

परिणाम एवढाच झाला की, कॅस्पर फेबरचा उद्योग हा लवकरच एक मोठा व्यवसाय बनला. फेबरच्या पुढच्या पिढ्याही अतिशय कल्पक आणि कर्तबगार निघाल्या. त्यांनी व्यवसाय प्रचंड वाढवला. अनेक प्रकारचे ‘स्टेशनरी आयटेम्स’ फेबर कंपनी बनवू लागली. सन १८४९ मध्ये फेबर कंपनीने आपली पहिली आंतरराष्ट्रीय शाखा न्यूयॉर्कला उघडली. १८५१ साली लंडनला, १८५५ साली पॅरिसलास, १८७९ साली वियेनाला (व्हिएन्ना); तर १८७४ साली रशियात सेंट पीटर्सबर्गला आपल्या शाखा उघडून फेबर कंपनीने स्टेशनरी उत्पादन व्यवसायात नवं युगच सुरू केलं. सन १९०० साली कॅस्पर फेबरचा पणतू लोथार फेबरची नात कॅसल या सरदार घराण्यात दिली गेली. तेव्हापासून फेबरचे पुढचे वंशज ‘फेबर-कॅसल’ असं जोडनाव लावू लागले. नंतरच्या काळात ‘फेबर-कॅसल’ कंपनीने अनेक दर्जेदार उत्पादनं बाजारात आणली. ‘फेबर-कॅसल’च्या एका वंशजाला जर्मन सम्राटाने ‘प्रिन्स’ ही पदवी दिली. पण, राजपुत्राने स्टेशनरीचा धंदा करावा, हे राजघराण्यातल्या नि इतर सरदार घराण्याच्या प्रतिष्ठित मंडळींना आवडेना आणि या पोकळ प्रतिष्ठेसाठी आपण आपला प्रचंड व्यवसाय सोडावा, हे त्या प्रिन्स अलेक्झांडर फेबर-कॅसलचा अजिबातच रुचेना. शेवटी तडजोड म्हणून त्याला ‘प्रिन्स’ऐवजी ‘काऊंट’ ही पदवी देण्यात आली. एकंदरीत पोकळ डामडौल, खोटी प्रतिष्ठा, भपकेबाजी यांची हौस सगळ्यांना सारखीच असते. अलेक्झांडर ‘फेबर-कॅसल’ने ‘प्रिन्स’ पदवीपेक्षा व्यवसाय महत्त्वाचा मानला. यावरून घराण्याची उद्योजकता त्यांच्यात चांगलीच मुरली होती, असं दिसतं. असो, तर ‘फेबर-कॅसल’ कंपनीने इतर अनेक स्टेशनरी उत्पादनं निर्माण केली. तरी ‘पेन्सिल’ हा आपल्या उद्योगाचा मूळ पाया ते विसरलेले नाहीत. आजही ‘फेबर-कॅसल’ कंपनी ही जगभरातली सर्वात मोठी पेन्सिल उत्पादन करणारी कंपनी आहे. सध्या जगभरात दर वर्षाला किमान दीड ते दोन अब्ज पेन्सिल्स बनतात. यापैकी किमान २० कोटी पेन्सिल्स ‘फेबर-कॅसल’ कंपनी बनवते. जगभरातल्या १०० देशांमध्ये कंपनी व्यवसाय करते. तिच्या १४ फॅक्टऱ्या नि बील विक्री केंद्र जगाच्या पाचही खंडांमध्ये पसरलेली आहेत.

 

अलीकडे आपल्याकडेसुद्धा संगणकीकरणामुळे एकंदरीत लेखन हा प्रकार कमी होत चालला आहे. शाईचे पेन वापरणे, तर दुर्मीळच झाले आहे. असंख्य प्रकारची बॉलपेन्स, जेलपेन्स माफक किंमतीत उपलब्ध होत आहेत. त्यामुळे लोक रिफील संपली की, नवीन रिफील घालण्याऐवजी पेनच नवीन घेतात, अशा प्रकारचं वृत्त अलीकडेच प्रसिद्ध झालं होतं. आता बॉलपेन आणि फाऊंटन पेनची जर ही स्थिती, तर पेन्सिल कोण लेकाचा वापरतोय! असं आपल्याला वाटतं. पण, तो आपला गैरसमज आहे. विविध प्रकारच्या तांत्रिक कामांसाठी अगदी आजही आवर्जून पेन्सिलच वापरली जाते. शिवाय विद्यार्थीवर्गही फार मोठ्या प्रमाणावर पेन्सिलच वापरतो. त्यामुळे सध्याच्या जागतिक मंदीच्या काळातही ‘फेबर-कॅसल’ कंपनीला चिंता नाही. कंपनीची गेल्या वर्षीची विक्री अगोदरच्या वर्षापेक्षा सहा टक्क्यांनी वाढली आहे. यात अर्थात कंपनीचा सध्याचा प्रमुख काऊंट अॅन्टन वुल्फगाँग फॉन फेबर-कॅसल याच्या कल्पकतेचाही भाग आहेच. मुलं रंगीत पेन्सिल्स खूप वापरतात आणि वापरताना पेन्सिल हमखास मागच्या बाजूने तोंडात घालून चावतात. आपल्याकडे अशा किरकोळ गोष्टींकडे कोणाचं लक्षदेखील नसतं. पण, युरोप-अमेरिकेतले पालक आणि शिक्षक अशा गोष्टींबद्दल फार जागरूक असतात. रंगीत पेन्सिल्स या काही प्रमाणात विषारी असतात. त्या तोंडात घालून चावल्यामुळे मुलांच्या पोटात विष जाऊ नये म्हणून पालक आणि शिक्षक खूप लक्ष देतात. काऊंट अॅन्टनने १९९० पासूनच रंगीत पेन्सिल्समध्ये ‘इको-फ्रेंडली’ रंगांचा वापर सुरू केला. परिणामी, पालक आणि शिक्षक मुलांसाठी आवर्जून ‘फेबर-कॅसल’च्याच पेन्सिल्स खरेदी करू लागले. कॅस्पर फेबरने १७६१ साली बनवलेली पेन्सिल त्याच्या काळात सर्वोत्तम होती. पण, तिच्यात एक मोठा दोष होता. ती पूर्ण गोल होती. त्यामुळे ती बरेचदा गडगडत खाली पडायची. कॅस्परचा पणतू लोथार फॉन फेबर याने १८३९ साली गोल पेन्सिलला पंचकोनी बनवून तिचं गडगडणं थांबवलं. आता काऊंट अॅन्टटने पेन्सिलला त्रिकोणी बनवले. अशा पेन्सिलवर बोटांची पकड जास्त चांगली बसते, असं त्याचं म्हणणं. ग्राहकांनी त्याच्या या बदलालाही उजवा कौल दिला. अलीकडे बॉलपेनवर जिथे आपण बोटांची पकड घेतो, तिथे बारीक बारीक उंचवटे असलेली एक रबरी पुंगळी बसवतात. घामाने हात ओले झाल्यास पकड सुटू नये म्हणून ही सोय असते. काऊंट अॅन्टनने पेन्सिलवरही ही रबरी पुंगळी चढवली. हा बदल विद्यार्थीवर्गाला फारच आवडला. अशा आणखीही काही अभिनव कल्पना काऊंट अॅन्टननच्या मनात आहेत. संगणकाचा वाढता प्रसार, लॅपटॉप, पामटॉप, आयपॅड वगैरे साधनांचा सुळसुळाट याची काऊंट अॅन्टनला अजिबात काळजी वाटत नाही. उद्या समजा अवकाश प्रवासही सुलभ झाला, तर तिथेही बॉलपेनापेक्षा पेन्सिलच वापरली जाणार, याची त्याला खात्री आहे. कारण, अवकाशयानात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे तिथे बॉलपेन निरुपयोगी असते. तिथे फक्त पेन्सिलच चालते. येत्या १५-२० वर्षांत तरी पेन्सिलचे हे स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही, याची त्याला खात्री आहे. पण, १०० वर्षांनंतरही हीच स्थिती असेल का? या प्रश्नावर तो हसून म्हणतो, “त्याची काळजी पुढच्या पिढ्या करतील की! आपण आतापासून कशाला चिंता करत बसायचं!”

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@