कर्मण्येवाधिकारस्ते...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2019   
Total Views |

 

 
 
 
 
 
श्रीगुरुजी रुग्णालयाची एक सामाजिक उपक्रम असणारी सेवा संकल्प समिती ही ‘कर्मण्येवाधिकारस्ते...’ या भावनेतून आपली संकल्पसिद्धी आजमितीस साकारत आहे. नावाप्रमाणेच समितीने सेवेचा हा संकल्प करत हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी आपले सेवाव्रत अर्पिले आहे. त्यांच्या कार्यामुळे गोदातीरावरील वनवासी क्षेत्रातील नागरिक आज आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करताना दिसतात. 
 
सेवा संकल्प समितीचे संस्थापक-सदस्य असलेले आणि सध्या सेवा संकल्प समिती कार्यवाह हे दायित्व असलेल्या डॉ. राजेंद्र खैरे यांनी या समितीच्या कार्याबाबत माहिती देताना सांगितले की, “लँड मार्क फोरम या संस्थेमार्फत एका प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील समाविष्ट निकषांनुसार सहभागी व्यक्तीने एक सामाजिक प्रकल्पाची मांडणी (प्रविष्ठ निकषांनुसार) करणे आवश्यक होते. यात डॉ. खैरे यांनी सूक्ष्म नियोजन, नेतृत्व उभारणी, समाजाभिमुख प्रकल्प आदी निकषांवर आधारित सेवा संकल्प समितीची मांडणी केली. त्यानंतर हा प्रकल्प त्यांनी श्रीगुरुजी रुग्णालयाच्या स्थानिक समितीसमोर सादर केला. दि. १० ऑक्टोबर, २०१६ रोजी नाशिकमध्ये सेवा संकल्प समितीची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्थापन झालेली सेवा संकल्प समिती ही रुग्णालय व वनवासी बांधव यांच्यातील दुवा म्हणून पुढे येऊ लागली. पेठ तालुक्यातील करंजखेड येथून जून २०१६ च्या पावसाळ्याच्या दिवसात गावात अतिसाराची लागण झाली असून रुग्ण दगावत असल्याची माहिती तेथील एका वनवासी बांधवाने दूरध्वनीद्वारे दिली. यावर तत्काळ प्रतिसाद देत रुग्णालयाचा चमू तत्काळ तेथे दाखल झाला. त्यांनी एका दिवसात १७५ रुग्णांची तपासणी केली. या तपासणीत गावातील ७० ते ७५ टक्के नागरिकांना अतिसाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यावेळी येथे रुग्णालयाच्या चमूला गावात एक हपशा दिसून आला. त्या हपशाच्या बाजूला गावातील सांडपाणी संकलित होऊन ते जमिनीत मुरत होते. या घटनेतून वनवासी पाड्यावरील अनारोग्याचे मूळ कारण शोधण्यात या चमूला यश आले. जिल्ह्यातील वनवासी बांधव हे केवळ औषधोपचारांनी बरे न होता त्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी ठोस उपायांची निकड असल्याचे श्रीगुरुजी रुग्णालयाच्या लक्षात आले. या घटनेतूनच सेवा संकल्प समितीची स्थापना झाली.
 
 

 
 

आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, पाणी, सेंद्रिय शेती, स्त्री-सबलीकरण या सहा आयामांच्या माध्यमातून समिती कार्य करत आहे. आज त्र्यंबकेश्वर व पेठ या दोन तालुक्यांतील २४ पाड्यांवर व नाशिक शहरातील आम्रपाली व प्रबुद्ध नगर या सेवावस्तीवर समितीच्या माध्यमातून कार्य केले जात आहे. आपल्या कार्याच्या माध्यमातून ६५०० कुटुंबे आणि सुमारे ४० हजार नागरिक या वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात समितीला यश प्राप्त झाले आहे. आरोग्य या आयामावर कार्य करताना वनवासी भागातील मोतीबिंदूग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार, असे जाहीर करण्यात आले. मात्र, मोफत उपचार असूनही एकही रुग्ण तपासणीसाठी आला नाही. यावेळी असे निदर्शनास आले की, त्यांच्याकडे रुग्णालयात येण्यासाठीही सुविधा उपलब्ध नाहीत. पैशाची चणचण आहे. सेवेचे व्रत स्वीकारलेल्या रुग्णालयाने त्यांची ही समस्या ओळखून वनवासी भागात आरोग्यरक्षक नियुक्त केले व आता ते तेथील रुग्णांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करत आहेत. दाखल होणाऱ्या रुग्णाची न्याहारी ते रात्रीचे भोजन व दुसऱ्या दिवसाची न्याहारी व भोजन यांसह तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया, मलमपट्टी अशी सर्व सेवा ही मोफत करण्यात येत आहे. २०१८ पासून आतापर्यंत २२५ रुग्णांना या माध्यमातून नेत्रसंजीवनी प्राप्त झाली आहे. तसेच, इतर व्याधींसंबंधी सुमारे ४५ हजार रुग्णांची मोफत तपासणी समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

 

‘कौशल्य विकास’ या आयामाच्या माध्यमातून सुमारे १८ वनवासी विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रशिक्षण घेतले आहे. तर, ६ विद्यार्थ्यांनी एक्स रे तंत्रज्ञान व रुग्ण साहाय्य अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तसेच, नॅशनल स्कील डेव्हलपमेट कोर्सच्या माध्यमातून १९० विद्यार्थ्यांनी बेसिक पेंटिंग कोर्स, ६५ शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण, २६२ नागरिकांनी कुक्कुटपालन प्रशिक्षण, ५५ महिलांनी शिवणकाम अशा एकूण ५८६ वनवासी बांधवांनी रोजगारक्षम प्रमाणपत्र धारण केले आहे. १९ वनवासी गावांत समितीने जलस्त्रोतापासून पाईपलाईन टाकून जलसंकलनासाठी टाकी बसवून या गावांना दुष्काळाच्या छायेतून मुक्त करण्यात आपले योगदान दिले आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्येही समितीचे काम उल्लेखनीय आहे. शिक्षक आणि विद्यार्थी दोघांच्या मूल्यशिल प्रगतीसाठी समिती काम करते. समितीमार्फत ५ अंगणवाड्या दत्तक घेण्यात आल्या असून दर तीन महिन्यांनी वनवासी भागातील बालकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. या वनवासी भागातील शेतकरी केवळ तीन महिने शेती करतो व नऊ महिने ते शहरी भागात स्थलांतरित असतात. त्यामुळे त्यांची कौटुंबिक व्यवस्थाही बिघडत आहे. यावर उपाय म्हणून समितीच्या माध्यमातून सेंद्रिय शेती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या माध्यमातून आजवर येथे १००० शेतकऱ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी संशोधन विभागामार्फत ७० कार्यशाळांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतले आहे.

 

समितीमार्फत सात बचतगट तयार करण्यात आले आहेत. या बचतगटांच्या माध्यमातून येथील महिलांना गृहउद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले व त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीची व्यवस्थादेखील ‘स्वावलंबन’ या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दैनंदिन भोजनात आवश्यक असणारे २५ प्रकारचे जिन्नस या बचतगटांच्या माध्यमातून उत्पादित करण्यात येत असतात. तसेच, शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होऊ नये यासाठी समितीमार्फत तांदूळ २२ ते २५ रुपये प्रती किलो दराने खरेदी केला जातो व त्या तांदळाची महिला बचतगटाच्या माध्यमातून पॅकिंग करून विक्री केली जाते. आजवर ६००० किलो तांदळाची विक्री समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. वनवासी भागात हिंदू धर्माप्रती माहिती व्हावी व आस्था निर्माण होण्याच्या उद्देशाने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन समिती करते. तसेच, येथील वनवासी युवकांच्या क्रीडाकौशल्यास वाव मिळावा यासाठी आंतराष्ट्रीय दर्जाच्या मॅरेथॉन स्पर्धादेखील समितीच्या माध्यमातून येथे आयोजित करण्यात येत असतात. येणाऱ्या काळात समितीतर्फे वनवासी भागात कम्युनिटी सेंटर स्थापन करण्यात येणार आहे व येथील वनवासी बांधव हे स्वयंपूर्ण व्हावे व त्यांचे स्थलांतरण थांबावे या उद्देशाने हे कम्युनिटी सेंटर आपले कार्य करणार आहे. कोणत्याही फलप्राप्तीची अपेक्षा न ठेवता, फलनिष्पत्ती व्हावी, या उद्देशाने कार्य करणाऱ्या या संस्थेस ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ हेच बिरूद समर्पक ठरते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@