दहा रेल्वेस्थानकांवर स्वयंचलित रक्तदाब तपासणी यंत्र बसविणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2019
Total Views |


 


मुंबई : राज्यात महिला दिनानिमित्त कर्करोग तपासणी मोहीम शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. मुंबई येथील दहा रेल्वे स्थानकांवर स्वयंचलित रक्तदाब तपासणी यंत्र बसविण्यात येणार असून त्याचा शुभारंभ गुरुवार शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. राज्यात दहा महापालिका क्षेत्रामध्ये ६० आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना, आरोग्यवर्धिनी केंद्र, मिशन मेळघाट उपक्रम, रक्तदाब तपासणी यंत्र, डायलिसिस केंद्र आणि कर्करोग तपासणी अशा विविध लोककल्याणकारी उपक्रमांचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळी झाला.

 

जागतिक महिला दिनापासून महिलांसाठी कर्करोग तपासणी

 

राज्यात शुक्रवारपासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्करोगाची मोहीम सुरु करण्यात आली. दि. ९ एप्रिल पर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. त्यामध्ये स्त्रियांमध्ये आढळून येणाऱ्या स्तनाचा कर्करोग, गर्भाशयमुख कर्करोग, मौखिक कर्करोग याची तपासणी केली जाणार आहे. आरोग्य विभाग व टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून ही तपासणी केली जाणार असून पुरुषांची देखील कर्करोग तपासणी या मोहिमेंतर्गत केली जाणार आहे.

 

मुंबईतील दहा रेल्वेस्थानकांवर स्वयंचलित रक्तदाब तपासणी यंत्र बसविणार

 

राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाबाचे नियंत्रण करण्याकरिता स्वयंचलित रक्तदाब तपासणी यंत्र राज्यात सातारा, सिंधुदुर्ग, वर्धा आणि भंडारा या ४ जिल्ह्यांमध्ये बसविण्यात आले आहे. दैनंदिन व्यस्त जीवनात रक्तदाबासंदर्भात वेळीच तपासणी करणे शक्य होऊन त्यावर उपचार करणे सुलभ व्हावे यासाठी स्वयंचलित रक्तदाब यंत्र मुंबईतील दहा रेल्वेस्थानकांवर प्राथमिक टप्प्यात बसविण्यात येणार आहे. या यंत्राचे वैशिष्ट म्हणजे ते चालविण्यासाठी कुठल्याही तंत्रज्ञाची किंवा नर्स यांची आवश्यकता भासत नाही. ज्याला रक्तदाब तपासणी करायची आहे त्या व्यक्तीने यंत्रामध्ये हात ठेवायचा त्यानंतर त्याचा रक्तदाब मोजला जातो आणि त्याची माहिती प्रिंटद्वारे त्या व्यक्तीला समजते. त्यामुळे व्यक्त दिनक्रमातही आपल्या रक्तदाबाविषयी जागृकता निर्माण करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरतील, असे आरोग्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

 

आदरणीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्काराची आरोग्यमंत्र्यांकडून घोषणा

 

आरोग्य क्षेत्रात काम करणारे अधिकारी, संस्था, माध्यमं, आदिवासी भागात काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना या वर्षीपासून आदरणीय बाळासाहेब ठाकरे ‘आरोग्यरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल या कार्यक्रमात केली. एकूण पाच पुरस्कार दरवर्षी देण्यात येणार असून प्रत्येकी एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.

 

बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ६० ठिकाणी

 

आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना १० महापालिका क्षेत्रात ६० ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे.ठाणे-१०, कल्याण-डोंबीवली-१०,भिवंडीनिजामपूर, मालेगाव, नागपूर, पुणे, अमरावती, औरंगाबाद, परभणी आणि नांदेड येथे प्रत्येकी ५ क्लिनिक सुरु करण्यात येत आहे.

 

मिशन मेळघाट अंतर्गत सप्तपदी उपक्रम

 

मिशन मेळघाट उपक्रमांतर्गत या भागातील बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य व अन्य विभागांच्या सहाय्याने सप्तपदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. गंभीर माता व बालरुग्णांना संदर्भ सेवा त्वरित मिळण्याकरिता उपाययोजना करणे, आरोग्य यंत्रणेची क्षमता वाढविणे, एमबीएस तसेच विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध करुन देणे, आरोग्य यंत्रणेच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे, माता व बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा करणे, आरोग्य सेवा घेण्यात या भागातील नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि स्थलांतराचे प्रमाण कमी होण्याकरिता उपाययोजना राबविणे असा सप्तपदी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

 

आरोग्यवर्धिनी केंद्रांचा शुभारंभ

 

राज्यात आयुष्यमान भारत योजने अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु करण्यात आले आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने १० हजार ६६८ उपकेंद्रांचे, १८२८ ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आणि ६०५ नागरी आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. सध्या ३४३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रुपांतर करण्यात आले आहे.

 

डायलिसिस सेंटरची सुविधा

 

रुग्णांना डायलिसिसची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ३१ ठिकाणी डायलिसिस केंद्र सुरु करण्यात आली आहेत. सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासामार्फत ११२ डायलिसिस यंत्राचा पुरवठा करण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ३१ पैकी २६ डायलिसिस सेंटरचे श्रेणीवर्धन करुन त्यांना अतिरिक्त डायलिसिस यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्या व्यतिरिक्त २० सेंटर नव्याने स्थापन करण्यात आली आहेत. त्याचबरोबर अतिरिक्त ४० डायलिसिस यंत्र खरेदी केली जाणार आहे. या यंत्रांच्या वापरासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होण्याकरिता सीएसआरच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@