पीएमआरडीएच्या १७२२ कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2019
Total Views |



रिंगरोड, नदी सुधार पाणी पुरवठा, नगर रचना योजना व हायपरलूपच्या विकासकामासाठी भरीव तरतूद

 
 

मुंबई : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)च्या सन २०१९-२० साठीच्या १७२२ कोटी १२ लाख इतक्या अंदाजपत्रकास शुक्रवारी मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आली. या अंदाजपत्रकामध्ये रिंगरोड, नदी सुधार पाणीपुरवठा, नगर रचना योजना व हायपरलूपच्या विकास कामासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पीएमआरडीएच्या विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना मिळणार आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने पायभूत सुविधा व आर्थिक विकासाचा वेग वाढणार आहे. प्राधिकरणाने मंजूर केलेल्या संकल्पना आराखडा हा विकास आराखडा व्हावा, यासाठी नियोजन करावे. यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सन २०१९-२०च्या १ हजार ७२२ कोटी १२ लाख इतक्या अंदाजपत्रकीय तरतुदीस मान्यता देण्यात आली. प्राधिकरणाची आरंभीची शिल्लक रक्कम रुपये ७९४ कोटी इतकी आहे. त्यामध्ये रिंग रोड प्रकल्पासाठी ५६९ कोटी, नदी सुधार व पाणी पुरवठा प्रकल्पासाठी ३५ कोटी, नगर रचना (टीपी स्कीम) मधील विविध विकासकामांसाठी ३२० कोटी, प्राधिकरण क्षेत्रात पूल, सबवे रस्त्यांची कामे करण्यासाठी १२५ कोटी, हायपरलूपसाठी ५५ कोटी, व इतर योजनावरील खर्चासाठी ७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळासोबत परवडणाऱ्या घरांसाठी संयुक्त भागिदारी

 

प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक ३ अन्वये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या नगर रचना योजनेतील अत्यल्प उत्पन्न गटातील राखीव भूखंडावर परवडणारी घरे बांधण्यासाठी “महाराष्ट्र गृह निर्माण विकास महामंडळ” सोबत सयुंक्त भागिदारी (Joint venture)तत्वावर बांधण्यासाठीच्या प्रस्तावास बैठकीत मान्यता देण्यात आली. पुणे शहर व महानगरातील नागरिकांचा जीवनस्तर उंचवण्यासाठी प्राधिकरणामार्फत नियोजनात्मक विकास व पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी अत्यल्प उत्पन्न गटासाठी परवडणाऱ्या गृहनिर्माण योजनेसाठी एकूण १४ विविध ठिकाणी १३.३ हेक्टर क्षेत्रावर म्हाळुंगे-माण नगररचना योजनेच्या माध्यमातून अत्यल्प उत्पन्न गटासाठी परवडणारी घरे उभी केली जाणार आहेत. त्यासोबत रस्ते, वीज, गटारे आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

 

राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ पासून हडपसर महादेवनगर मांजरी खुर्द ते वाघोली मार्ग क्र. ५६ काँक्रिटीकरण रस्त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी

 

पुणे जिल्हा हवेली तालुक्यातील वाहतुकीच्या व दळणवळणाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय महामार्ग ९ पासून हडपसर- महादेवनगर मांजरी खुर्द ते वाघोली मार्ग क्र. ५६ भाग मांजरी ते रेल्वे गेट ते मांजरी पूल साखळी क्र.३/४४ ते ५/१०० या लांबीमध्ये काँक्रिटीकरणाद्वारे (एकूण १३.९१ किमी) चौपदरीकरण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामकाजासाठी जवळपास ३० कोटी रुपयांच्या आसपास खर्च येणार आहे. सदर रस्ता प्राधिकरणाच्या प्रस्तावित ११० मी. रुंद रिंगरोडच्या पुणे-सोलापूर व पुणे-शिरूर रस्त्याला जोडणारा आहे. त्याचप्रमाणे मांजरी, आव्हाळवाडी व वाघोली या तीन टीपी स्कीमकरिता पोच मार्ग आहे. या रस्त्याच्या विकास कामामुळे निवासी क्षेत्रास चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे पुणे महानगर क्षेत्रातील वाहतुकीचे विविध भांडवली प्रकल्प राबविताना रस्ते विकास खासगी सहभागातून करण्यासाठी विविध आर्थिक नमुन्यांना (financing models) खासगी, सार्वजनिक सहभाग (पीपीपी) या विकल्पावर व इतर तरतुदीसह मंजुरी देण्यात आली आहे.तसेच पीएमआरडीए हद्दीतील पाणीपुरवठा योजना, सांडपाणी निर्मूलन, पर्जन्यजल व घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी बृहत आराखडा (Master plan) तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच पुरंदर येथील प्रस्तावित अंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता स्थापन करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विकास कंपनीमध्ये सहभागी (Equity Shares) होण्यासाठी प्रशासकीय मान्यताही यावेळी देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विकास नियंत्रण नियमावली पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता,पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस मदान, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास विभाग प्रधान सचिव डॉ.नितीन करीर, पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, प्राधिकरणाचे महानगरआयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव आदी यावेळी उपस्थित होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@