तिचा तर प्रत्येक दिवस...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2019   
Total Views |




वंचितातली वंचित अन् शोषितातली शोषित

रंगणार प्रतिमा किती काळ हीच...

या दुःखापलीकडेही ती आहेच ना समर्थ उभी माणूस म्हणून

माणसाला जन्म देणारी.. प्रत्येक क्षणाला अर्थ देणारी...

 

जगाला अर्थ देणार्‍या स्त्रीशक्तीच्या जगण्याचा वेध घेतला तर काय जाणवते? निदान मुंबई शहराचा वेध घेऊ. कालपरवाच ‘प्रजा फाऊंडेशनया स्वयंसेवी संस्थेने महिलांवर होणार्‍या अत्याचारांसंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये २०१३ ते २०१८ बलात्कारासंबंधी गुन्ह्यांची नोंद पोलीसदप्तरी होण्याचे प्रमाण ८३ टक्क्यांनी वाढल्याचे, तर विनयभंगाच्या गुन्ह्यांसंबंधी हेच प्रमाण ९५ टक्क्यांनी वाढले असल्याचे जाहीर केले आहे. अर्थात, या अहवालावर दोन विभिन्न आणि टोकाची उत्तरेही येतात. त्यापैकी एक उत्तर बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे या पाच वर्षांत वाढले असतील का? आणि दुसरे उत्तर पूर्वी पीडित महिला परिस्थितीजन्य कारणांमुळे अत्याचार सहन करायच्या. पण, या पाच वर्षांत महिला अन्यायविरुद्ध आवाज उठवू लागल्या आहेत. आपल्याला न्याय मिळेल, अशी आशा वाटल्यामुळे पोलीसदरबारी गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. असो, दोन्ही कारणं विचार करण्याजोगी आहेत. कारण, बुद्धी आणि तर्कशुद्ध नैतिकता यामुळे माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा गणला गेला. पण, इतर प्राण्यांपेक्षा वेगळा गणल्या गेल्यामुळे खरेच माणूस आणि पशू यांतले अंतर कमी झाले आहे का? दुर्दैवाने, आज असे चित्र दिसते की, स्त्रियांच्या काल ज्या समस्या होत्या, त्या आज नाहीत. पण, आज ज्या समस्या आहेत, त्या कालपेक्षा गंभीर आहेत. तिच्या प्रतिभेपेक्षा तिच्या बेगडी प्रतिमेच्या वलयाची अपेक्षा तिच्याकडून केली जात आहे. देहाच्या खाचखळग्यात तिला शोधू पाहणार्‍यांची गर्दी वाढली आहे. स्त्रीला स्त्री म्हणून बघण्यापेक्षा माणूस म्हणून बघण्याचा सुदिन केव्हा येईल देव जाणे. अर्थात ‘दिस जातील, दिस येतील, भोग सरंल, सुख येईल’ या आशेवर जगभरातली स्त्री शक्ती आहे. जगाच्या पाठीवरच्या अनंत संकल्पनांना निर्मित, प्रसवत, सहन करत, संघर्ष करत ती अनादी अनंत भूमिका जगत आहे. त्या मानवी स्त्रीशक्तीला, त्या अगाध आत्मप्रेरणेला वंदन आहे. जगाच्या दिनदर्शिकेमध्ये तिच्यासाठीचा ८ मार्च हा दिवस आहे. तिला विचारा, तिचा तर प्रत्येक दिवस आहे.

मुक्तीची परिभाषा



महिला दिनानिमित्तचे एक मार्गदर्शन आठवते
. स्थळ मुंबई. कबिरांचे नाव घेऊन मंच चालविणार्‍यांच्या टोळक्यातली एक जण तिथे मार्गदर्शक म्हणून आली होती. समोर घरसंसार आणि मुलाबाळांसाठी हाडाची काडं करणारी मातृशक्ती. या युवतीने ‘मुक्ती’ची संकल्पना सांगितली. नातीगोती, रितीरिवाज, परंपरा यापासून मुक्ती मिळायलाच हवी. समोरच्या महिलांना प्रश्न पडला होता, “आम्ही सगळे सोडू, मुक्त होऊ, आम्ही काय करू? आमच्या रक्ताच्या माणसांशिवाय आणि घरच्या कुलपरंपरेशिवाय आम्ही कसे जगू?” अर्थात, या प्रश्नांची उत्तरे नव्हती. मात्र, यावर मनात दाटून आले की, ‘मुक्ती’च्या संकल्पना कशावर आधारित आहे? महिला दिनाच्या अनुषंगाने कितीतरी चुकीच्या संकल्पना मांडल्या जातात आणि त्यांना विरोध होत नसल्यामुळे त्या समाजाने स्वीकारल्या, असेच चित्र रंगवले जाते. त्यापैकी एक चुकीची संकल्पना म्हणजे, सावित्रीबाई फुले या भारतीय स्त्रीमुक्तीच्या प्रणेत्या आहेत. सावित्रीमाई या थोरच आहेत. पण, सावित्रीमाईंचे कर्तृत्व कधीही स्त्री-पुरुष भेदावर विसंबलेले दिसत नाही. समोरची व्यक्ती दुःखी आहे, अन्यायग्रस्त आहे, तिच्या दुःखाचे, तिच्या अन्यायाचे निवारण झालेच पाहिजे, ही सावित्रीमाईंची भूमिका. समोरची व्यक्ती स्त्री आहे की पुरुष, यावर सावित्रीमाईंनी दुःखाचे परिमाण आणि परिणाम मोजलेलेे नाहीत. तीच गोष्ट झाशीच्या राणीचीही. समोरचा शत्रू स्त्री आहे की पुरुष, तिच्या लेखी गौणच होते. तिच्यासाठी तो परकीय आक्रमक शत्रूच होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहचरणी रमाबाईंचे उदाहरणही द्यायलाच हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचा सूर्य जगाच्या पटलावर उगवला. पण, त्या सूर्यामागे रमाई आंबेडकरांचा त्याग तर शब्दातीत. त्या त्यागाच्या समोर मुक्तीची परिभाषा कशी द्यावी? मुक्ती कशापासून हवी? हे चित्र स्पष्ट व्हायला हवे. हेच आजच्या स्त्रियांपुढील खरे आवाहन आहे. कारण, स्त्री-पुरुष भेद हा स्त्रीचा किंवा पुरुषांच्याही मुक्तीचा मार्ग असूच शकत नाही. निसर्गदत्त अस्तित्वाला सामर्थ्य समजून आपली भूमिका त्या त्या वेळी मानवी मूल्यांवर आधारित असणे, यापलीकडे मुक्तीची परिभाषा काय असेल?



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@