पाकिस्तानसमोरचा पेच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2019   
Total Views |


 
 
 
 
भारत-पाकिस्तानचा प्रश्न हा कोणत्या अटीवर शांतता नांदेल, असा नसून पाकिस्तानचा दृष्टिकोन कसा बदलेल, यावर अवलंबून आहे. त्यासाठी आज जे डाव पाकिस्तान खेळतो आहे, त्यातून पाकिस्तानचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे, याची जाणीव करून दिली पाहिजे किंवा त्याने भागले नाही, तर अस्तित्वच धोक्यात आणले पाहिजे. त्यासाठी सर्व काही करू शकण्याच्या क्षमतेचे व मानसिकतेचे नेतृत्व भारतापाशी असणे गरजेचे आहे.
 

भारताने बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान संबंधात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक स्वातंत्र्यापासून या दोन्ही देशांचे संबंध हे तणावाचेच राहिले आहेत. परंतु, अन्य वेळची परिस्थिती व आताची परिस्थिती यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या भारत व पाकिस्तानमध्ये काश्मीरसाठी युद्ध झाले. त्यावेळी इंग्लंडची भूमिका ही पाकिस्तानला पाठिंबा देणारी होती. जरी माऊंटबॅटन भारताचे व्हाईसरॉय असले तरी त्यांनी आपले पाकिस्तानप्रेम लपवून ठेवलेले नव्हते. १९६५ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात इंग्लंड व अमेरिकेचे समर्थन पाकिस्तानला होते. १९७१ च्या युद्धात तर अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने युद्धात उतरायचीच बाकी होती. रशियाने आपले सैन्य अफगाणिस्तानमध्ये घुसविल्यानंतर अमेरिकेने आपला पूर्ण वरदहस्त पाकिस्तानच्या डोक्यावर ठेवला. तो एवढा होता की, पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीकडे अमेरिकेने पूर्णपणे कानाडोळा केला. त्याचा फायदा पाकिस्तानने उचलून काश्मीरमधल्या दहशती कारवायांना अधिकृत धोरणाचे स्वरूप दिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा जेव्हा भारत या दहशतवादाचा उल्लेख करे, तेव्हा तेव्हा पाकिस्तान, “हा दहशतवाद नसून काश्मिरींचे स्वातंत्र्ययुद्ध आहे,” असे सांगून त्याची संभावना करत असे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानने भारताची कोंडी केली होती. पाकिस्तान अण्वस्त्रधारी राष्ट्र बनल्यानंतर त्यात आणखी भर पडली. भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर त्यातून अण्वस्त्रयुद्ध भडकू शकते, असे वातावरण पाकिस्तानने निर्माण केले व त्याला भारत बळी पडला. दहशतवाद्यांचा संसदेवरील हल्ला असो, कारगिलवरचा असो की मुंबईतील असो, तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यापलीकडे भारताने काही केले नाही. कारगिलमधली भारताची कारवाईही गेलेला भूभाग मिळविण्यापुरती मर्यादित होती. या पलीकडे भारत काही करू शकला नाही. त्यामुळे भारतीयांच्या मनात एक हतबलतेची भावना तयार झाली होती.

 

कोणत्याही युद्धामध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याची प्रतिक्रिया जोखता येणे, हा मिळालेला अर्धा विजय असतो. ती प्रतिक्रिया लक्षात घेऊन आपले डावपेच आखता येतात. बालाकोट येथील कारवाईने पाकिस्तानला आता यापुढे भारताची प्रतिक्रिया काय असेल, हे जोखता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाकिस्तान मानसिकदृष्ट्या असंतुलित झाल्यासारखा वागत आहे. कोणत्याही हल्ल्याचे दोन परिणाम असतात. युद्धभूमीवरचे नुकसान हा पहिला परिणाम व शत्रूचे मानसिक असंतुलन तयार करणे हा दुसरा परिणाम. पहिला परिणाम नेमका किती झाला, त्याविषयी वेगवेगळी मते आहेत व कदाचित नेमकी काय वस्तुस्थिती आहे, हे कधी कळणारही नाही. परंतु, पाकिस्तानचे मानसिक असंतुलन निर्माण करण्यात मात्र भारत यशस्वी झाला आहे, हे निश्चित. पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांबद्दल रोज जी विसंगत विधाने येत आहेत, तो त्याचा उत्तम नमुना आहे. अशा दहशतवादी कारवाया एकदोन हल्ल्यानंतर कधी थांबत नाहीत. त्याकरिता त्यामागे दीर्घकालीन धोरण असावे लागते. भारत-पाकिस्तान संबंधात प्रथमच असे धोरण असल्याचे व त्याचे परिणाम मिळू लागल्याचे स्पष्ट होत आहे.

 

या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एकटे पडायला सुरुवात झाली आहे. पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीच्या वाटेवर असताना युद्धजन्य वातावरण का तयार करीत आहे, असा प्रश्न त्याची मित्रराष्ट्रेही विचारत आहेत. त्यांच्या दडपणामुळेच पाकिस्तानला अभिनंदनची लगेच सुटका करावी लागली. ती सुटका इमरान खान यांच्या शांतता प्रेमामुळे झाली, असा प्रचार भारतातीलच काहीजण करीत आहेत व त्याचा उपयोग प्रचारासाठी पाकिस्तान करून घेत आहे. या आंतरराष्ट्रीय दडपणामुळे पाकिस्तानमधील लष्कर व राज्यकर्ते यांच्यात तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानातील लष्कराला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरी राजवटीचा मुखवटा हवा आहे, पण त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे राज्य करू द्यायचे नाही. परंतु, आता स्थिती अशी तयार होत आहे की, जर आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानला मदत हवी असेल तर दहशतवाद पोसून ती मिळणार नाही. भारत, अफगाणिस्तान व इराण हे तिन्ही देश पाकिस्तानी दहशतवादाने त्रासले आहेत. चीनचा अपवाद वगळता आज कोणताही देश निःसंदिग्धपणे पाकिस्तानच्या मागे उभा नाही. काश्मीरमधला दहशतवाद हे तिथले स्वातंत्र्युद्ध आहे, हा पाकिस्तानचा दावा कुणीही मान्य करीत नाही. पाकिस्तानला नाराज करूनही मुस्लीम देशांच्या संघटनेने भारताला विशेष अतिथी म्हणून बोलाविले, ही पाकिस्तानला बसलेली फार मोठी चपराक होती. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय दडपण कसे हाताळायचे, याबाबत पाकिस्तानमधले लष्करी नेतृत्व व नागरी नेतृत्व यांच्यातील मतभेद वाढत जाणार, हे निश्चित. त्यामुळे भारत हे दडपण जसे वाढवित नेईल, तसा या दोन्ही नेतृत्वातील विसंवाद वाढत जाईल. आपण काश्मीरमध्ये करीत असलेला दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला अधिकाधिक एकटे पाडत जाईल, ही वस्तुस्थिती हाताळणे नागरी नेतृत्वाला अशक्यप्राय होत जाईल. पाकिस्तान जर चीनचा गुलाम देश बनला तरच काही काळ निभावून नेता येईल.

 

याचबरोबर पाकिस्तानबाबत इराण व बलुची स्वातंत्र्यप्रेमी यांनीही आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला यापुढे अनेक आघाड्यांवर लढावे लागेल. शक्यता आहे की, भविष्यात भारतही पाकिस्तानमधल्या अंतर्गत असंतोषाला सक्रिय पाठिंबा देऊन पाकिस्तानचा डाव उलटवू शकतो. पाकिस्तानमधल्या पंजाबी वर्चस्वावर नाराज असलेले अनेक गट पाकिस्तानमध्ये आहेत. इराण व अशा गटांच्या आक्रमकतेमुळे पाकिस्तानला आपली शक्ती इतरत्रही वापरावी लागेल व त्या प्रमाणात भारतावरील ताण कमी होईल. भारताने असे प्रत्युत्तर द्यायचे ठरविले तर दहशतवादी संघटनांचा काटा काढण्यासाठी पुढे विमान हल्ला करण्याऐवजी अशा गटांचाही उपयोग करता येईल. एकदा हल्ल्याला प्रतिहल्ल्याने उत्तर द्यायचे, हे ठरले की अनेक मार्ग दिसू लागतात व अनुभवाने त्यात आणखी भर पडत जाते. आजवर भारताने असा विचारच न केल्याने आपले पर्याय मर्यादित राहिले. एकदा पाकिस्तानप्रमाणे भारतानेही ते पर्याय स्वीकारले तर भारताची प्रतिघात करण्याची क्षमता कितीतरी अधिक आहे. त्यातून पाकिस्तानच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल.

 

पाकिस्तानसमोरचा नेमका पेच कोणता आहे, याचा विचार न करता स्वतःला ‘शांतीदूत’ म्हणविणारे अनेक जण शांततेचा उपदेश करीत असतात. एक स्थिर समाज म्हणून जगायचे असेल तर त्या देशातील नेतृत्वात सांस्कृतिक विविधता स्वीकारण्याची तयारी पाहिजे व तिथल्या लोकसंस्कृतीत अशी बहुविधता असली पाहिजे. पाकिस्तानमध्ये ती नाही. त्यामुळे एक धर्म असूनही बांगलादेश व पश्चिम पाकिस्तान एकत्र नांदू शकले नाहीत. आज पाकिस्तानमधील सर्व वांशिक गटही एकत्र नांदू शकत नाहीत. त्यांना एकत्र ठेवण्याकरिता भारताचा द्वेष करणे, ही पाकिस्तानची गरज बनली आहे. आज त्यासाठी काश्मीर हे एक कारण आहे इतकेच! जर पाकिस्तानने आपल्याच प्राचीन बहुविधता मानणाऱ्या संस्कृतीचे पुरुज्जीवन केले तर त्याच्या लक्षात येईल की, मग पाकिस्तानला भारतापासून कोणतेच भय राहाणार नाही. भारत आक्रमक असता तर त्याचे अधिक भय श्रीलंकेला वाटायला हवे होते. काश्मीरबाबतही हेच आहे. जर भारतातील अनेक भाषिक, अनेक प्रांत आपापल्या विविधतेसह भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत राहू शकतात तर केवळ काश्मीरच का राहू शकत नाही? पाकिस्तानमधील व काश्मिरी मुस्लीम समाजाने आपला स्वभाव बदलणे, हेच खरे त्यावरचे उत्तर आहे. भारत जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा एवढी विविधता असलेला देश भविष्यात एकत्र राहील का, अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या. त्यानंतरची आता तिसरी पिढी आहे व अनेक लाटा पचवून भारत समर्थपणे उभा आहे.

 

पाकिस्तान व काश्मीरही तसेच उभे राहू शकते. पण, त्यासाठी दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. दहशतवादाच्या आरोपावरून अफजल गुरूला फाशी दिली गेली व त्यावरून भारतातील मुस्लिमांना चिथावणी देण्यासाठी देशाचे तुकडे तुकडे केले जातील, अशा घोषणा दिल्या गेल्या. अशा घोषणा देणे हेच जणू आविष्कारस्वातंत्र्याचा भाग आहे, असा प्रचार केला गेला. पण, याच अफजल गुरूच्या मुलाला गालिबला त्याच्या आईने दहशतवादी विचारांपासून वेगळे ठेवले व आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले. आज गालिब भारतातून किंवा भारताबाहेरून डॉक्टर होण्याची स्वप्ने पाहात आहे. पाकिस्तानी नेतृत्वाने भारतद्वेषाचे विष पेरून केवळ भारताचेच नव्हे, तर पाकिस्तान व काश्मीरमधल्या अनेक पिढ्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानचा प्रश्न हा भारत व पाकिस्तानात कोणत्या अटीवर शांतता नांदेल, असा नसून पाकिस्तानचा दृष्टिकोन कसा बदलेल, यावर अवलंबून आहे. त्यासाठी आज जे डाव पाकिस्तान खेळतो आहे, त्यातून पाकिस्तानचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे, याची जाणीव करून दिली पाहिजे किंवा त्याने भागले नाही तर अस्तित्वच धोक्यात आणले पाहिजे. त्यासाठी सर्व काही करू शकण्याच्या क्षमतेचे व मानसिकतेचे नेतृत्व भारतापाशी असणे गरजेचे आहे. देशातील व्यवस्थाच टिकली नाही, तर देशापाशी कितीही शस्त्रे असली तरी ती देशाचे रक्षण करू शकत नाहीत, असा अनुभव रशियाने घेतला आहे. एवढी प्रचंड अण्वस्त्रे असतानाही रशियन संघराज्य विघटनापासून वाचू शकले नाही. पाकिस्तान तो धडा आपणहून शिकेल, असे वाटत नाही. त्याला तो शिकविण्याची गरज आहे व ते काम भारतालाच करावे लागेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@