लोकशाही नव्हे तर, ठोकशाहीचा प्रकाश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2019
Total Views |


 


प्रकाश आंबेडकरांचा कायद्यावर, न्यायालयावर विश्वास असता तर त्यांनी “मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा,” अशी विधाने केलीच नसती. उलट आपल्यावर होणाऱ्या टीकेत काही आक्षेपार्ह असेल, तर आपण कायदेशीर कारवाईचा आधार घेऊ, असे म्हटले असते. मात्र, ज्या बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, तिलाच धाब्यावर बसविण्याचा चंग बांधला असेल, तर प्रकाश आंबेडकर मवालेगिरीशिवाय दुसरे काय करणार म्हणा?


कोणी काडीचीही किंमत देत नसले की, माणूस लक्ष वेधून घेण्यासाठी आक्रस्ताळेपणा करू लागल्याचे बहुतांशवेळा पाहायला मिळते. भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांची अवस्था मागल्या काही काळापासून अशीच झाल्याचे दिसते. गेल्यावर्षीच्या पहिल्याच दिवशी मुंबईसह राज्यभरात धुमाकूळ घालत प्रकाश आंबेडकरांचे पाठीराखे, समर्थक, कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांना वेठीस धरले होते. कोरेगाव-भिमा व नंतर उसळलेल्या दंगलीला हिंदुत्वनिष्ठ व्यक्ती व संघटनाच जबाबदार असल्याचा आरोप करत आंबेडकरांनी एका समाजाला दुसऱ्या समाजापुढे उभे करण्याचा डावही पद्धतशीरपणे खेळला. पुढे पुढे तर मेंदू चक्रावल्यागत प्रकाश आंबेडकर काहीही बरळत सुटले. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना बेड्या ठोकणार इथपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घटनेच्या चौकटीत बसविण्याच्या फाजील मागणीपर्यंत प्रकाश आंबेडकरांची वैचारिक पातळी घसरत गेली. आताही प्रकाश आंबेडकरांनी आपण लोकशाहीऐवजी ठोकशाहीचाच पुरस्कार करत असल्याचे आपल्याच वक्तव्यातून दाखवून दिले. समाजमाध्यमांवर सत्ताधाऱ्यांची बाजू हिरीरीने मांडणारे जसे असतात, तसेच विरोधकांचीच भूमिका योग्य असल्याचे सांगणारेही मूठभर का होईना दिसतातच. मात्र, हे समजून घेण्याची योग्यता नसलेल्या प्रकाश आंबेडकरांनी, “समाजमाध्यमांवर माझ्याविरोधात टीका करणाऱ्यांना ठोकून काढा,” अशा भाषेत कार्यकर्त्यांना चिथावणी दिली. सोबतच प्रकाश आंबेडकरांनी माझा लढा समोरच्या हुकूमशहाविरोधात (नरेंद्र मोदी) असल्याने मलाही काही बाबतीत हुकूमशहासारखे वागावे लागेल, असे म्हणत हाणामारीच्या आदेशाचे समर्थनही केले. अर्थात, अकोला शहराचा कारभारही धड करता न येणाऱ्या आंबेडकरांनी वा अन्य कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हुकूमशहा ठरविण्याचा प्रकार बिल्कुल नवा नाही. उलट मोदी सत्तेत आल्यापासून अशाच प्रकारच्या बिनबुडाच्या आरोपांची राळ उडविण्याचे काम दिवाळखोरीत गेलेल्या दुकानदारांकडून राजरोस करण्यात आले. मात्र, कोणी कितीही घसा खरवडून मोदींच्या हुकूमशाहीविरोधात बोंबलले तरी या सगळ्यांच्याच हाती भल्यामोठ्या भोपळ्याशिवाय काहीही लागले नाही, हेही एक वास्तवच.

 

२६ जानेवारी, १९५० रोजी लागू करण्यात आलेल्या भारतीय राज्यघटनेने देशातल्या तमाम जनांना इतर अनेक स्वातंत्र्यापैकी अभिव्यक्तिस्वातंत्र्यही बहाल केले. उल्लेखनीय म्हणजे, राज्यघटनेचा मसुदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला आणि म्हणूनच बाबासाहेबांना ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ असेही म्हणतात. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, पण आता मात्र ते आपल्या आजोबांचाच अपमान करण्याच्या मागे लागल्याचे दिसते. वस्तुतः प्रकाश आंबेडकर बुद्धिमान आणि सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्त्व. कधीकाळी देशात जन्मलेल्या व्यक्तीच्या दाखल्यावरून जात हटविण्याची व तिथे फक्त ‘भारतीय’ म्हणून लिहिण्याची मागणीही प्रकाशबापूंनी केली होती. मात्र, मधल्या काळात असे काही झाले की, प्रकाश आंबेडकरांना आपले तन-मन-धन सगळेच समाजद्रोही विचारांच्या व्यक्तींकडे गहाण ठेवावेसे वाटले. परिणामी, माओवाद्यांचे समर्थन करण्यापासून ते ओवेसींसारख्या धर्मांध व्यक्तीच्या ताब्यातील एमआयएम पक्षाशी जोडी जमविण्यापर्यंत प्रकाश आंबेडकरांचे अधःपतन होत गेले. आता असंगाशी संग केला की, माणूस गुण नाही, पण वाण उधळणारच ना? परिणामी, “पोलीस संरक्षण काढल्यास १५ मिनिटात हिंदूंना संपवू,” अशी वल्गना करणाऱ्यांच्याच तोंडचे शब्द ओढून घेत आंबेडकरांनीही माझ्यावर टीका करणाऱ्यांविरोधात गुंडगिरीचा ‘प्रकाश’ पाडण्याचे सांगितले. उद्या आंबेडकरांवरील प्रेमापोटी भावनेच्या भरात कोणी कार्यकर्ते असे करतीलही. कारण, राज्याच्या राजकारणात नेत्याने ‘छू’ म्हटले की, हल्लागुल्ला करणाऱ्यांची संख्या अजिबात कमी नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खळ्ळ्खट्याक प्रयोगातून जनतेला अशा नमुन्यांचा परिचय वेळोवेळी होतच असतो. पण, पुढे काय?

 

नेत्यावरील एकनिष्ठेचा कंड शमवण्यासाठी मारामारी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली, तर संबंधित कार्यकर्त्यांचे व कुटुंबीयांचे काय? शिवाय ज्याला वठणीवर आणण्यासाठी बुकलून काढले, त्याच्याशी निर्माण होणाऱ्या वैराचे काय? प्रकाश आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांना या सगळ्या भानगडींपासून वाचवणार आहेत काय? असे प्रश्नही उपस्थित होतात. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी हेही म्हटले की, प्रसारमाध्यमांतून टीका करणाऱ्यांवर माझा राग नाही, तर केवळ सुपारीबाज व राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांविरोधातच दादागिरी केली जाईल. मात्र, आपणच एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला अश्लील भाषेत धमकी दिल्याची गोष्ट प्रकाश आंबेडकर विसरल्याचे दिसते. आताचा हा इशारा जर प्रसारमाध्यमांतील कर्मचाऱ्यांविरोधात नसेल तर प्रकाशबापूंना हीच गोष्ट तेव्हा का सुचली नाही? की आता त्यांना झालेल्या चुकीची उपरती झाली? मुळात प्रकाश आंबेडकर आता जे काही बोललेत, ते आपण लोकशाहीला आणि संविधानालाही जुमानत नसल्याचेच प्रकरण म्हटले पाहिजे. कारण त्यांचा कायद्यावर, न्यायालयावर विश्वास असता तर प्रकाश आंबेडकरांनी अशी विधाने केलीच नसती. उलट आपल्यावर होणाऱ्या टीकेत काही आक्षेपार्ह असेल, तर आपण कायदेशीर कारवाईचा आधार घेऊ, असे म्हटले असते. मात्र, ज्या बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, तिलाच धाब्यावर बसविण्याचा चंग बांधला असेल, तर प्रकाश आंबेडकर मवालेगिरीशिवाय दुसरे काय करणार म्हणा?

 

आता समोरच्या हुकूमशहाबद्दल. संसदेच्या पायरीवर डोके टेकवून वंदन करणाऱ्या, स्वतःला ‘प्रधानसेवक’ आणि ‘चौकीदार’ म्हणवून घेणाऱ्या, सफाई कामगारांचे पाय धुणाऱ्या माणसाला प्रकाश आंबेडकर ‘हुकूमशहा’ म्हणत असतील, तर त्यांनी आपला शब्दकोश नक्कीच तपासून घेतला पाहिजे. खरे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात सर्वसामान्य व्यक्ती, लेखक, पत्रकार आणि सर्वच प्रकारच्या बुद्धीजीवींना जितके स्वातंत्र्य आहे, तितके अन्य कुठल्याही काळात अपवादानेच असेल. कारण, देशात सध्या मोदींवर कुठल्याही स्तरावर जाऊन आरोप करणारे जसे दिसतात, तसेच मोदींविरोधात बडबडणारे, लिहिणारेही आहेतच की अन् विशेष म्हणजे मोदी सरकारने कोणाही विरोधात कधीही सूडभावनेने कारवाई केल्याचेही सापडत नाही. तरी प्रकाश आंबेडकर असो वा अन्यही विरोधक मोदींना हुकूमशहा ठरविण्यासाठी तुटून पडल्याचे दिसते. हो, एक मात्र मान्य करावेच लागेल की, आधीच्या सरकारशी जुळवून घेत जी मंडळी देशविरोधी, देशविघातक, माओवादी कारवायांत सहभागी होती, त्यांच्याविरोधात विद्यमान सरकारने नक्कीच कारवाई केली. अर्थात देशाच्या, समाजाच्या सुरक्षेसाठी, एकतेसाठी ही कारवाई गरजेचीच होती आणि न्यायालयानेही ते मान्यच केले. आता राष्ट्राच्या सार्वभौमत्व व अखंडतेसाठी सरकारने उचललेल्या पावलांनाही प्रकाश आंबेडकर ‘हुकूमशाही’ म्हणत असतील तर त्यांचे टाळके ठिकाणावर नसल्याचेच स्पष्ट होते. शिवाय हुकूमशहाशी लढण्यासाठी हुकूमशहा होण्याची इच्छा बाळगणारे प्रकाशबापू मग बलात्काऱ्याशी लढण्यासाठी बलात्कारी, दहशतवाद्याशी लढण्यासाठी दहशतवादी, देशद्रोह्याशी लढण्यासाठी देशद्रोही होणार का, हाही प्रश्न विचारावासा वाटतो. सोबतच पाकिस्तानमधील ‘एअर स्ट्राईक’वर प्रश्नचिन्ह उभे करून वायुसेनेच्या कारवाईचे पुरावे जाहीर करण्याची मागणीही प्रकाश आंबेडकरांनी केली. पण, नुकतेच भारतीय सैन्यदलांनी एका पत्रकार परिषदेत ‘एअर स्ट्राईक’चे पुरावे केंद्राकडे सुपूर्द केल्याचे म्हटले होते. प्रकाश आंबेडकरांना हे माहिती नाही काय? की विरोधकांच्या पंगतीत बसल्यावर आपणही वायुसेनेच्या कारवाईवर शंका घेतली पाहिजे, असे प्रकाश आंबेडकरांना वाटते? तसेच जर असेल, तर मुळातच स्वतःच्या पक्षाच्या झोळीत काहीही नसलेल्या प्रकाश आंबेडकर व कंपनीची पाटी पुढेही कोरीच राहील. कारण, राज्यासह देशातल्या कोट्यवधी लोकांचा सैन्यदलांच्या शौर्यावर विश्वास आहे आणि सैनिकांवर संशय घेणाऱ्यांची डाळ शिजावी, असे त्यांना वाटत नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@