शिट्टी, सेल्फी आणि बरंच काही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2019   
Total Views |


 


माणसाला लाभलेली कल्पनाशक्ती, हे एकूणच मानवी अस्तित्वाला लाभलेलं एक वरदान. ते मानवी अस्तित्वाचं एक शक्तिस्थळदेखील आहे. गरज आणि कल्पनाशक्ती यांची सांगड घालून माणसाने आजवरच्या इतिहासात स्वतःचं अफाट आणि अद्भुत असं विश्व निर्माण केलं. अगदी अग्नीचा शोध, चाकाचा शोध इथपासून ते आज स्मार्टफोन, इंटरनेट, खगोलशास्त्र, आरोग्याशी निगडित शोध आणि अशा असंख्य गोष्टी या सर्व याच गरज आणि कल्पनाशक्तीच्या मिलाफातून जन्मल्या. माणसाची ही वाटचाल अखंडपणे चालू असून अनेकविध क्षेत्रात नवनव्या प्रयोगांची मालिका आणि त्यातून नवं, अद्भुत असं काही गवसणं हेही अव्याहतपणे सुरू आहे.

 

भाषा हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग. दैनंदिन व्यवहार करण्यापासून ते राग-लोभ-प्रेम-दुःख इ. सर्व प्रकारच्या भावना व्यक्त करण्यापर्यंत आणि साहित्य-कलांतून जीवनाचा आनंद घेण्यापर्यंत ही भाषा माणसाची साथ देते. इंग्रजीसारख्या जगाच्या कानाकोपर्‍यात बोलल्या जाणार्‍या भाषेपासून ते दुर्गम, डोंगराळ वनवासी भागांतील स्थानिक जनजातींच्या भाषांपर्यंत, अशी ही हजारो भाषांची व्याप्ती पृथ्वीतलावर आहे. अनेक भाषा कालौघात लुप्तही झाल्या आहेत. परंतु, भाषा हा विषय इथेच थांबत नाही. माणसाची गरज आणि कल्पनाशक्ती यांचा मिलाफ काय काय निर्माण करू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण ठरावं. टर्की देशामध्ये कुस्कोय या भागातील लोकांनी चक्क नवीन भाषा निर्माण केली. या भाषेला ‘पक्ष्यांची भाषा’ म्हणतात. पक्षी जसे वेगवेगळे आवाज काढतात, तसेच हे लोक चक्क शिट्टी वाजवून बोलतात. हा सारा डोंगराळ प्रदेश आहे, त्यामुळे दोन घरांमधील अंतरही जास्त आहे. अशा वेळी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी ही भाषा शोधून काढली.

 

या पक्ष्यांच्या भाषेत जवळपास २५० शब्द आहेत. ही भाषा जवळपास गेली ५०० वर्षे ते वापरत आहेत. इतकेच नव्हे तर येथील शाळांतही ती शिकवली जाते. आपला कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु साधारणपणे . किमी लांब ही शिट्टी ऐकू जाते! त्यामुळे लांब असूनही कोणत्याही माध्यमाशिवाय केवळ शिट्टी वाजवून लोक संवाद साधू शकतात. टर्कीमधील या आगळ्यावेगळ्या उदाहरणाची ही बाजू तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे जगातील सर्वात लहान भाषा बोलली जाते. हेही भाषेचं एक अनोखं वैशिष्ट्य. ही आहे ऑस्ट्रेलियातील बोलीभाषा. याला ऑजि (Aussie) भाषा असेही म्हणतात. या भाषेची खासियत अशी की, ते सर्व शब्दांचे लहान शब्द बनवतात आणि या लहान शब्दांनी ही भाषा बनली आहे. जसे की, ‘अ‍ॅव्हेकाडो’ या फळाला ते ‘आवो’ असे म्हणतात. ‘कांगारू’ला ते ‘रूस’ म्हणतात, तर ‘सँडविच’ला ‘सांगा’ म्हणतात. ‘दुपार’ला‘ आर्वो’, ‘सिगारेट’ला ‘सिगी’ आणि सेल्फ पोर्ट्रेट पिक्चरला ‘सेल्फी’! अलीकडे जी कृती केल्याशिवाय आपल्यापैकी अनेकांचं पानही हलत नाही, ती कृती, अर्थात ‘सेल्फी’ हा चक्क ऑस्ट्रेलियन बोलीभाषेतील शब्द आहे. इतकंच नव्हे तर आपला देश ऑस्ट्रेलियालाही ते ‘स्ट्राया’ म्हणतात. थोडक्यात, या भाषेत सारंच ‘थोडक्यात’ आहे!

 

भाषा आणि भाषांमध्ये वापरले जाणारे लिंगवाचक शब्द, हे एक आणखी गमतीशीर प्रकरण. मराठीप्रमाणेच जगातील काही भाषांमध्ये शब्दाला लिंग असतं. मराठीत जसं आपण ‘ती’ गाडी किंवा ‘तो’ देव्हारा इत्यादी म्हणतो. संशोधनानुसार असं सिद्ध झालं आहे की, शब्दाचं लिंग कोणतं आहे, यानुसार त्यासाठी वापरण्यात येणारं विशेषण ठरतं. जसं की जर्मन भाषेमध्ये पुलाला ‘ब्र्युक’ (Brcke) म्हणतात. हा शब्द स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे जर्मन मंडळी पुलाचं वर्णन करताना पारंपरिकरित्या ‘स्त्रीलिंगी’ विशेषणे वापरतात. उदा. सुंदर, आकर्षक. हेच स्पॅनिश भाषेमध्ये मात्र पुलाला ‘प्युन्ट’ (Puente) म्हणतात. हा शब्द पुल्लिंगी आहे. त्यामुळे स्पॅनिश भाषेत पुलासाठी पारंपरिकरित्या ‘पुल्लिंगी’ समजली जाणारी विशेषणे वापरली जातात. जसे की, मजबूत, भक्कम. या आणि अशा अनेक गमतीजमतींनी भाषा हा विषय ओतप्रोत भरला आहे. यात जितकं खोलात जाल, तितकं तुम्हाला नवं, आणि रंजक असं काही गवसतं. या लेखात उल्लेखलेल्या गोष्टी म्हणजे केवळ ‘हिमनगाचं एक टोक’ आहे, असचं म्हणावं लागेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@