प्रकाश आंबेडकरांनाही एअर-स्ट्राईकवर शंका, म्हणे छायाचित्रे द्या...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2019
Total Views |



 


अकोला : भारतीय वायुदलाने अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर-स्ट्राईक करत दहशतवाद्यांना दणका दिला. परंतु, या एअर-स्ट्राईकवर आपल्या भारत देशातूनच शंका घेणाऱ्यांची एक पिलावळ उभी राहिल्याचे दिसत आहे. गेल्या तीन-चार दिवसांत अनेकांनी भारतीय सैन्याच्या या कारवाईवर शंका उपस्थित केली असून अनेकजण चक्क पुरावे मागताना दिसत आहेत. या यादीमध्ये आता भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचाही समावेश झाला आहे.

 

अकोला येथे नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारकडे एअर-स्ट्राईकचे पुरावे देण्याची मागणी केली. तसेच, या एअर-स्ट्राईकची छायाचित्रे द्या, अशीही अजब मागणी प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली. एअर-स्ट्राईक केला जातो तेव्हा, त्याचे फोटो काढले जातात, अशा आशयाचा दावा करत हे फोटोग्राफ्स प्रसिद्ध करून सरकारने एअर-स्ट्राईकचे पुरावे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असेल तर ते देशाच्या प्रतिष्ठेसाठी चुकीचे आहे असे सांगत सरकारला वायुसेनेची प्रतिष्ठा राखण्यात अपयश आल्याचेही आंबेडकर म्हणाले.

 

प्रकाश आंबेडकर यांनी सध्या कट्टर इस्लामिक पक्ष मानल्या जाणाऱ्या वादग्रस्त एमआयएम पक्षासोबत आघाडी केली आहे. तसेच, गेल्या दीड-दोन वर्षांपासून प्रकाश आंबेडकर यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत निरनिराळे वाद ओढवून घेतले आहेत. आता तर त्यांनी थेट एअर-स्ट्राईकची छायाचित्रे प्रसिद्ध करण्याची अजब आणि आश्चर्यकारक मागणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

 

भाजपची कडाडून टीका

 

प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने कडाडून टीका केली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आंबेडकरांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेकांच्या पायाखालची वाळू सध्या सरकली आहे. पराभवाच्या भीतीने आणि मोदींच्या द्वेषापोटी ते भारतीय सैन्याच्या शौर्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले असल्याची टीका भातखळकर यांनी केली. तसेच, पुढच्या वेळी एअर-स्ट्राईक करायचा असेल, तेव्हा या मंडळींना विमानांना बांधून पाठवले पाहिजे, असा टोलाही आ. अतुल भातखळकर यांनी यावेळी लगावला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@