आता रोह्यात उभारला जाणार ‘नाणार’ प्रकल्प!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात आला. आता नाणारचा ग्रीन रिफायनरी प्रकल्प रोह्यात उभारण्यात येणार आहे. असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला असून त्यासाठी तब्बल ५० हजार एकर जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सिडकोच्या अंतर्गत रोहा, अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील ४० गावांमधल्या जमिनी एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी सरकारकडून ताब्यात घेण्यात आली आहे. लवकरच याबाबतीत सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
 

सुमारे ३ लाख कोटींचा ग्रीन रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार येथे उभारण्यात येणार होता. या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या नव्या जागेसाठी सौदी अरेबियाची अराम्को कंपनीची तसेच या कंपनीच्या भारतातील भागीदारांची मान्यता घेण्यात आली आहे. त्यानंतरच ही जमीन अधिग्रहित केली गेली. अशी माहिती सरकारमधील काही उच्च अधिकाऱ्यांकडून एका वृत्तसंस्थेला देण्यात आली. रोहा, अलिबाग आणि मुरुड येथे या ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी सिडकोच्या माध्यमातून वसाहत उभारण्यात येणार आहे.

 
गावांमधील क्षेत्रनवनगर म्हणून सिडकोला अधिसूचित करण्यात आले असून सिडकोला नवनगर विकास प्राधिकरण म्हणून जाहीर करण्यात आले आहे. नव्या आदेशानुसार रोहा, अलिबाग आणि मुरुड तालुक्यांमधील ४० गावांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व नियोजन यंत्रणांचे अधिकार रद्द करण्यात आले आहेत. ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या आसपासच्या गावातील नियोजन संबंधित सर्व परवाने आता फक्त सिडकोकडून देण्यात येतील. रोहा तालुक्यातील २१, अलिबागमधील ८ आणि मुरुडमधील १० आणि श्रीवर्धन तालुक्यातील एका गावाची प्रकल्पासाठीच्या एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी निवड करण्यात आली आहे.
 

प्रकल्पासाठीच्या एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी निवड करण्यात आलेल्या गावांची नावे पुढील प्रमाणे आहेत :

 

अलिबाग – भोनंग, ताजपूर, रामराज, सुडकोली, कुंदे, नवखार, मालाडे, तळवली

 

मुरुड – तळे, चोरढे, सारवली, वळके, तळेखार, शिरगाव, तडगाव, आमली, येसदे, सातीर्डे

 

रोहा – सारसोली, खोपे, खारखर्डी, नवखार, तळवडे, खैराळे, दीव, दापोली, धोडखार, धोंडखार उमटे, न्हावे, शिळोशी, कोकबन, खुटल, कजरविरा, आंबिवली, धगडवाडी, चांगगाव, शेडसई, सोनखार, महाळुंगे

 

श्रीवर्धन – मारळ

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@