काँग्रेसी राजकारणाचे ‘नगरी नमुने’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2019   
Total Views |
 


महाराष्ट्रात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून सुरू असलेला वाद हा काँग्रेसी राजकारण म्हणजे काय, याचा अप्रतिम नमुना मानता येईल. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना अहमदनगरच्या जागेचं घोडं मात्र अद्याप अडून बसलं आहे. याचं कारण म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना आपले चिरंजीव डॉ. सुजय विखेंसाठी ही जागा काँग्रेसकडे हवी आहे आणि आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीकडे राहिली आहे. २0१४ मध्ये येथून भाजपचे दिलीप गांधी विजयी झाले. आता येथून लढण्यासाठी सुजय यांनी दंड थोपटले आहेत. प्रकरण एवढ्यावर थांबत नाही. राधाकृष्ण विखे-पाटील हे गेली साडेचार वर्षे महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. असं असलं तरी, अहमदनगर जिल्ह्याचा काही भाग वगळता त्यांचा राज्यभरात प्रभाव वगैरे जवळपास शून्यच. प्रवरा संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी विणलेलं सहकाराचं जाळं हे विखेंचं बलस्थान. दुसरी गोष्ट म्हणजे, या विखेंचं काँग्रेसचे नगरमधलेच दुसरे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी विळ्याभोपळ्याचं सख्य. म्हणजे हे दोघे आपल्या विरोधकाला मदत करतील, पण एकमेकांना नाही. आता काँग्रेस-राष्ट्रवादीतील सूत्रांकडून मिळणार्‍या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले नातलग असलेल्या प्रसाद तनपुरे यांना राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. येथे भाजपचे शिवाजीराव कर्डिले सध्या आमदार असून या कर्डिले आणि विखेंचं आपापसांत छुपं सख्य असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे तनपुरे निवडून येतीलच, याची खात्री जयंत पाटील यांना नाही. त्यामुळे तुम्ही राहुरीत सहकार्य करा, आम्ही सुजय यांना राष्ट्रवादीत घेऊन लोकसभेत निवडून आणतो, असा प्रस्ताव जयंत पाटील यांनी विखेंपुढे ठेवला असल्याचं म्हटलं जातं. आता गंमत अशी की, सुजय जरी राष्ट्रवादीकडून लढले तरी आपल्याच पक्षातील थोरात हे सुजय यांच्याशी दगाफटका करतील, अशी भीती राधाकृष्ण विखे यांना सतावते. या सर्वच विषयात थोरात यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसून नगरची जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी विखे वगळता अन्य कुणा काँग्रेस नेत्याने फार जोर लावल्याची चर्चा नाही.

 

लढणार कधी आणि जिंकणार कधी?

 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विखेंचे संबंध वाईट नसले तरी फार उत्तमही नाहीत. त्यामुळे सुजय यांना निवडून आणण्यात एकवेळ शरद पवार सहकार्य करतील, पण आपल्याच पक्षाचे बाळासाहेब थोरात करतील की नाही, याची शाश्वती विखेंना वाटत नाही. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे. हे तांबे म्हणजे थोरात यांचे भाचे. युवा-होतकरू आणि ग्लॅमरस नेते म्हणून वर येत असलेल्या सत्यजित तांबे यांच्या वाटेत उद्या सुजय विखे हे प्रतिस्पर्धी असू शकतात, याची थोरातांना कल्पना असेलच. त्यामुळे हा विषय किती वेगवेगळ्या स्तरांवर अभ्यासण्यासारखा आहे, हे स्पष्ट होतं. आता राहता राहिला मुद्दा तो राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेससाठी सोडायचा. लोकसभेऐवजी राज्यसभेवर जाणारे शरद पवार यंदा पुन्हा लोकसभा लढणार आहेत. कारण स्पष्ट आहे. जर उद्या त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीच तर महागठबंधन वगैरे सगळं गेलं तेल लावत, तिसरी आघाडी किंवा देवेगौडा-गुजराल यांच्याप्रमाणे ‘युनायटेड फ्रंट’सारखा प्रयोग करायचा आणि पंतप्रधानपदासाठी प्रयत्न करायचे, असा राष्ट्रवादीचा डावपेच असू शकतो. सध्याच्या दोन-तीन खासदारांवर पंतप्रधानपद काय, कॅबिनेट मंत्रिपददेखील मिळवताना नाकीनऊ येतील. त्यामुळे एकेक जागा महत्त्वाची आहे. असं सगळं असताना नगरची जागा काँग्रेसला सोडणं, हे अशक्यच दिसतं आहे. प्रकरण पुन्हा एवढ्यावरही थांबत नाहीच. काँग्रेस आणि राष्ट्रवादी, दोघेही गेले तेल लावत, विखे-पाटील हे थेट भाजपमध्येच जातील, अशाही चर्चा आहेत. या चर्चा आजच्या नाहीत, गेल्या तीन-चार वर्षांपासूनच्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विखेंचे कसे चांगले संबंध आहेत, याच्याही सुमधुर चर्चा काँग्रेसवर्तुळात कानावर पडतातच. या चर्चा हे विखेंचं काँग्रेसवर दबावतंत्र आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले. यातही तथ्य आहेच, पण शेवटी मुद्दा हा उरतो की, जिथे काँग्रेसच्या राज्यातील विरोधी पक्षनेत्याची ही अवस्था, तिथे पक्षाची काय अवस्था असेल, याचा विचारच न केलेला बरा. अशा परिस्थितीत काँग्रेस नेतृत्व ही पक्षसंघटना एकत्र आणणार कशी, यांचे गटतट संपवून निवडणुका लढणार कशी आणि भाजपला पराभूत करून सत्ता स्थापणार कशी, हाच प्रश्न देशातील तमाम जनतेला पडला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@