जपानी भाषा जगणार्‍या छायाताई...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2019
Total Views |



संघर्ष करून शिक्षण घेतलेल्या मुंबईतील छाया नाईक आज वयाच्या ७२व्या वर्षीही मुलांना जपानी भाषा शिकवत आहेत. अशा या जपानी भाषा सर्वार्थाने जगणार्‍या छायाताईंची ओळख करुन देणारा हा लेख...

 

जपान... उगवत्या सूर्याचा देश... पाश्चिमात्त्य संस्कृतीच्या जागतिक प्रभावातही आपली शाश्वत मूल्ये अबाधित ठेवलेला असा हा विकसित देश. आज मुंबईसह देशभरातील विकास प्रक्रियेत जपानच्या विविध कंपन्यांचा सक्रीय सहभाग दिसून येतो. त्यामुळे भारतासह जागतिक पातळीवरही जपानी भाषेचे महत्त्व नाकारुन चालणार नाही. अशाच जपानी भाषेचे धडे देणार्‍या मुंबईच्या छाया नाईक. छायाताईंचे वैशिष्ट्य हेच की, वयाच्या तब्बल ५२व्यावर्षी त्यांनी जपानी भाषा शिकायला सुरुवात केली आणि आज वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही त्यांचे हे ज्ञानदानाचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. छायाताईंचे बालपण गिरगावात गेले. पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण कसेबसे नोकरी करून त्यांनी पूर्ण केले. त्यांचे वडील मुंबई महानगरपालिकेत नोकरीला होते. परंतु, छाया आठवीला असताना ते निवृत्त झाले. त्यामुळे छाया व त्यांच्या भावंडांनी वडिलांना मिळालेल्या फंडवर आणि शिष्यवृत्तीवर शिक्षण पूर्ण केले. नंतर महालेखापाल कार्यालयात नोकरी मिळाली. १९७२ मध्ये त्या विवाहबद्ध झाल्या.

 

लग्नानंतर सासरच्यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी सहकार्य केले. त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘एसएससी’ परीक्षेचा पहिला टप्पा पास झाल्या, तर त्यांची मुलगी अडीच महिन्यांची असताना दुसरा टप्पाही त्यांनी उत्तीर्ण केला. पुढे परीक्षा, पदोन्नतीचा प्रवास करत त्या ऑडिट ऑफिसर झाल्या. छायाताईंची मुलगी फ्रेंच भाषा शिकतच होती. मुलीसोबत छायाताई एका कार्यशाळेला उपस्थित होत्या. त्यावेळी वक्त्यांनी सांगितले की, “जगात सर्वात कठीण असणार्‍या भाषांमध्ये जपानी आणि अरेबिक यांचा समावेश होतो.” मग काय, एक आव्हान म्हणून वयाच्या ५२व्या वर्षी छायाताईंनी जपानी भाषा शिकण्याचा विडाच उचलला. पहिल्याच वर्षी त्यांनी जपानी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला आणि बक्षीसही पटकावले. दुसर्‍या वर्षीही ही परंपरा त्यांनी कायम ठेवली आणि बक्षिसासोबतवेस्ट झोन’साठी त्यांची निवड झाली. ती स्पर्धा जिंकल्यावर त्यांना दिल्लीला पाठविण्यात आले. त्यामुळे त्यांना जपानी भाषेची अधिकाधिक आवड निर्माण झाली.

 

‘एन ५’ ते ‘एन १’असे जपानी भाषा शिकतानाचे स्तर पाच असतात. ‘एन ५’ हा पायाभूत स्तर आहे, तर ‘एन १’ हा उच्च स्तर. छायाताईंनी १९९७ साली जपानी भाषा शिकण्यास सुरुवात केली आणि २००३ मध्ये समाजकल्याण अधिकारी असताना त्या ‘एन २’ परीक्षा उत्तीर्ण झाल्या. सध्या त्या ‘एन १’ची तयारी करत आहेत. नवीन भाषा असल्यामुळे साहजिकच जपानी भाषा शिकताना त्यांना अडचणी आल्या. सुरुवातीला छायाताईंनी जपानी भाषेतील अक्षरे व वर्णमाला शिकण्यास सुरुवात केली. आयकर विभागातील ऑडिटमध्ये सिनिअर ऑडिटर म्हणून कार्यरत असताना त्यांना भाषा शिकण्यासाठी फारसा वेळ मिळत नसे. मग कार्यालयात जाता-येता रेल्वे प्रवासात, रविवारी त्या जपानी भाषेचा अभ्यास करायच्या. त्यातही काही अडले तर पटकन उत्तर द्यायला इंटरनेटचीही सोय नव्हती. तरीही हार न मानता छायाताईंनी जपानी भाषा आत्मसात केली. छायाताईंनी आपल्या आयुष्याचे चार ‘डी’ अर्थात ‘डिसिजन, डिटरमिनेशन, डेडिकेशन, डिसिप्लिन’ यावर लक्ष्य केंद्रित केले, तसेच यशप्राप्तीसाठीही विद्यार्थ्यांना आजही त्या या चार ‘डी’वर लक्ष्य केंद्रित करण्याचा मोलाचा सल्ला देतात. छायाताईंना युरिको नावाच्या शिक्षिकेने जपानी भाषा शिकवण्याचे वर्ग घेण्याचा सल्ला दिला आणि घरच्या घरी मग सुरुवातीला तीन विद्यार्थ्यांसह छायाताईंनी जपानी भाषेचे वर्ग सुरु केले. त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा ‘एन २’ हा स्तर पूर्ण केला. हळूहळू विद्यार्थी वाढत गेले. सुरुवातीला अल्पदरात त्या शिकवत होत्या. परंतु, मग भाडे वाढल्यामुळे आणि पुस्तकांचा खर्च असल्यामुळे त्यांनी शिकवणी शुल्क वाढविले. पण, काही गरीब विद्यार्थ्यांना त्या आजही मोफत शिकवितात. गेल्या १५ वर्षांत छायाताईंच्या हाताखाली दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी जपानीचे धडे गिरविले आहेत. सध्या त्यांच्याकडे ५० विद्यार्थी जपानी भाषेचे शिक्षण घेत आहेत.

 

२०१० साली छायाताई जपानला आधुनिक व्याकरण शिकण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा एकदा त्या एका फुलाला स्पर्श करून बघत होत्या. त्यावेळी एक लहान मुलगा आला आणि त्याला वाटले की त्या फूल तोडत आहेत. तो म्हणाला की, ‘सावरा नाई उदासे’ म्हणजे ‘फूल तोडू नका.’ त्या एकदा स्वच्छतागृहामध्ये छत्री विसरल्या होत्या. त्यांनी जिथे छत्री ठेवली होती, तिथेच त्यांना दुसर्‍या दिवशी मिळाली,अशा काही जपानच्या आठवणी त्या सांगतात. मिळाली आहे. जपानी भाषा शिकण्याच्या अडचणींबद्दल विचारले असता छायाताई सांगतात की, “सध्या बारावीचे फ्रेंच व जर्मन भाषांचे प्रश्नसंच उपलब्ध होतात. पण, जपानी भाषेचे प्रश्नसंच आजही मिळत नाही.” त्यामुळे ‘नवनीत’शी संपर्क करून जपानी भाषेचा प्रश्नसंच करण्याचा त्यांचा मानस आहे. छायाताईंच्या वर्गात यंदा १८० पैकी १७० गुण मिळवून एक विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला आणि हा निकाल पाहून अनेक विद्यार्थी छायाताईंकडे शिकण्यासाठी येतात. युट्यूब व्हिडिओद्वारेही त्या जपानी भाषेचे विद्यार्थ्यांना धडे देतात. अशा या जपानी शिक्षिकेला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.

 
 - नितीन जगताप
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@