बालाकोटच्या कारवाईपलीकडचे युद्ध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2019   
Total Views |


 


अभिनंदन यांच्या सुटकेनंतर परिस्थिती निवळली असली तरी आपल्याला गाफील राहून चालणार नाही. नुकतीच बिकानेर सेक्टरमध्ये भारताने पाकिस्तानचा ड्रोन पाडल्याची बातमी आली. त्यामुळे भविष्यातील कार्यवाहीबद्दल काही सूचना कराव्याशा वाटतात.

 

भारतीय हवाईदलाने बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रावर कारवाई केल्याच्या घटनेला एक आठवडा झाला आहे. २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी वायुदलाने भारताच्या सीमा ओलांडून लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न भारतीय वायुदलाने निष्फळ ठरवला. या प्रयत्नांत आपले एक ‘मिग-२१’ बायसन कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शत्रूच्या हाती पडला असला तरी तत्पूर्वी त्याने पाकिस्तानचे ‘एफ-१६’ विमान पाडण्याचा पराक्रम केला. पकडला जाण्यापूर्वी अभिनंदन यांनी गुप्ततेच्या दृष्टीने महत्त्वाची कागदपत्रं गिळून आणि पाण्यात फेकून नष्ट करण्याचा प्रयत्न वाखाणण्यासारखा होता. पाकिस्तानच्या ताब्यात असतानाही अभिनंदन एका सच्च्या सैनिकासारखे वागले. आंतरराष्ट्रीय समूहात एकटे पडत असल्याची जाणीव झाल्यावर पाकिस्तानने दर्यादिली करत असल्याचा आव आणत अभिनंदन यांना सोडले खरे; पण त्यापूर्वी त्यांच्याकडून बळजबरीने पाकिस्तानची स्तुती करत असल्याचा देखावा करत असल्याचा व्हिडिओ तयार करून घेण्यात आला. अभिनंदन यांच्या सुटकेनंतर परिस्थिती निवळली असली तरी आपल्याला गाफील राहून चालणार नाही. नुकतीच बिकानेर सेक्टरमध्ये भारताने पाकिस्तानचा ड्रोन पाडल्याची बातमी आली. त्यामुळे भविष्यातील कार्यवाहीबद्दल काही सूचना कराव्याशा वाटतात.

 

. भारताने १९७१ सालानंतर पहिल्यांदा पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करून दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई केली. भविष्यात पुलवामासारखा हल्ला झाल्यास कोणत्याही पक्षाचे सरकार असो, अथवा नसो आचारसंहिता कधीही लागू शकते म्हणून- भारतीय लष्कराला एक विशिष्ट प्रक्रिया पार पाडून अशा प्रकारची टॅक्टिकल कारवाई करण्याची मुभा असायला हवी.

 

. अमेरिकेच्या अफगाणिस्तानमधून माघारीनंतर पाकिस्तान तालिबानच्या मदतीने तिथे दहशतवादी तळ उभारून त्यांचा भारताविरुद्ध वापर करण्याचा प्रयत्न करेल. याला उत्तर म्हणून भविष्यात अफगाणिस्तानमध्ये भारताचा हवाईतळ असायला हवा. त्यामुळे वेळप्रसंगी पाकिस्तानमध्ये पश्चिमेकडून घुसून कारवाई करण्याचा पर्याय आपल्याला असेल.

 

. या आठवड्यात भारतातील जवळपास सर्वच टीव्ही वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी भारताची बाजू हिरीरीने मांडून सैन्यदलांचे मनोबल उंचावण्याचा स्वतःहून प्रयत्न केला. पण, आज तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या पाकिस्तान किंवा अन्य देशांतील हवे ते चॅनल लाईव्ह पाहू शकता, वृत्तपत्रं वाचू शकता. इंटरनेट आणि समाजमाध्यमांतून गैरसमज पसरविणारे संदेश, फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करणे सोपे झाले आहे. या आठवड्यात त्याचा राजकारण तापवण्यासाठी वापर होत आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याला बाधा न पोहोचवता, अशा प्रवृत्तींवर नियंत्रण आणायला हवे.

 

. पाकिस्तानचे मित्रदेश उदा. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि चीन यांचे सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील नसलेल्या क्षेत्रात गुंतवणुकीद्वारे ‘अ‍ॅसेट’ तयार झाल्यास, भविष्यात पाकिस्तान हल्ला करताना विचार करेल.

 

. पुढच्या महिन्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर फ्रान्स जैश-ए-मोहम्मद आणि मौलाना मसूद अझहर यांच्यावर निर्बंध आणणारा ठराव आणणार आहे. त्या वेळेस चीन त्याला आक्षेप घेणार नाही यासाठी प्रयत्न करायला हवेत. यातील माध्यमयुद्धाचा विषय अधिक सविस्तरपणे चर्चिला जायला हवा. भारत एक अण्वस्त्रधारी आणि जबाबदार देश आहे. त्यामुळे या कारवाईबाबत वक्तव्य करताना परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी शब्दांची काळजीपूर्वक निवड करत त्यासाठी ‘प्रतिबंधात्मक’ आणि ‘गैरलष्करी’ असे दोन शब्द वापरले. पण, त्याचबरोबर त्यांनी हे ‘जैश’चे सर्वात मोठे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र असल्याचे आणि त्यात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक, वरिष्ठ कमांडर आणि जिहादी ठार झाल्याचे गुप्तचर खात्याच्या विश्वसनीय सूत्रांकडून कळल्याचे सांगितले. राजनैतिक क्षेत्रात काम करणार्‍यांना ‘त वरून ताकभात’ समजतो. त्यामुळे प्रत्यक्षात काय झाले आहे, हे समजण्यासाठी एवढे पुरे होते.

 

पण, पाकिस्तानने लष्कराचे प्रवक्ते हसन गफूर यांच्या माध्यमातून सुरुवातीला पडलेली झाडं आणि खड्डे दाखवून भारताचा हल्ला वाया गेल्याचा दावा केला. २७ फेब्रुवारी रोजी प्रथम गफूर आणि त्यानंतर थेट पंतप्रधान इमरान खान यांनी भारताची तीन विमानं पाडल्याचे, वैमानिकांना मारल्याचे तसेच पकडल्याचे दावे केले. उच्चपदस्थांकडून खोटे दावे करायची पाकिस्तानची सवय भारताला माहिती असली तरी आंतरराष्ट्रीय माध्यमांना तेवढी माहिती नसल्यामुळे त्यांनी हे दावे खरे मानून बातम्या प्रसारित केल्या. पाकिस्तान म्हणतो त्याप्रमाणे भारतीय हवाईदलाने जंगलात बॉम्बफेक करून सहा झाडं पाडली असतील आणि काही खड्डे निर्माण केले असतील तर त्यासाठी पाकिस्तानला उत्तर देणारी कारवाई करण्याची आवश्यकताच नव्हती. ज्या अर्थी ती केली गेली, त्या अर्थी पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे.

 

या उलट भारताने तिन्ही सैन्य दलांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून दिलेली प्रतिक्रिया वास्तवाला धरून होती. आपले एकच विमान पडल्याचे आणि विंगकमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडल्याचे आग्रही प्रतिपादन केल्यानंतर पाकिस्तानने हळूच आपली भूमिका बदलली. इमरान यांनी विंगकमांडर अभिनंदन यांना सोडण्याचे जाहीर केल्यानंतर मीडियाचे लक्ष युद्धाकडून शांतता प्रक्रियेकडे वळले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मीडियाकडून भारताच्या ठाम भूमिकेची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. याचा फायदा घेत दिग्विजय सिंह, नवज्योतसिंह सिद्धू आणि कपिल सिब्बलसारख्या नेत्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांचे दाखले देत भारताच्या अधिकृत भूमिकेला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. युद्धज्वर ओसरल्यानंतर मुख्य प्रवाहातील माध्यमांनी आपली निष्पक्षता दाखविण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बेजबाबदार दाव्यांना प्रसिद्धी दिली. त्यामुळे ‘सर्जिकल स्ट्राईक’ झाले का नाही, झाले तर त्यात किती दहशतवादी मारले गेले आणि जर मारले गेले तर परराष्ट्र व्यवहार सचिव, हवाई दल आणि भाजपचे नेते यांच्या प्रतिक्रियांत भिन्नता कशी, हा मुद्दा ऐरणीवर आला. येत्या आठवड्यात निवडणुका जाहीर होणार असल्यामुळे या मुद्द्यावर जोरदार राजकारण होणार, हे उघड आहे. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी.

 

परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारतीय वायुसेना आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, या तिघांचा ‘ऑडियन्स’ म्हणजेच प्रेक्षक वेगळा आहे. हवाई दलासाठी ऑपरेशनचे तपशील जाहीर न करता काय कारवाई झाली आणि तिला कितपत यश मिळाले, हे सांगणे महत्त्वाचे आहे. परराष्ट्र विभागाच्या दृष्टीने भारताने आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग न करता केवळ स्वसंरक्षणासाठी आणि पाकिस्तान आपल्या येथील दहशतवादी संघटनांवर कारवाई करत नाही म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली हा महत्त्वाचा मुद्दा आहे. युद्धाचे राजकीय भांडवल केले जाऊ नये, असा संकेत असला तरी राजकीय पक्षांच्या दृष्टीने आपण आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कसे सरस आहोत, हे सांगताना आपण दहशतवादाविरुद्ध काय कारवाई केली, हे सांगणे महत्त्वाचे असते. त्यामुळे तिघांच्या संदेशांत काही तफावत असणारच. पण, या तफावतींचे भांडवल करून ‘एअर स्ट्राईक’ झालेच नाहीत किंवा त्यात कोणी दहशतवादी मारलेच गेले नाहीत, असा दावा करणे आणि तो करताना मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या आणि तपशील मागणे आणि त्यासाठी पाकिस्तानी तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांचे दाखले देणे हे असमंजसपणाचे लक्षण आहे. भारतात युद्धप्रसंगी आम्ही १०५ आहोत, हे जसे यापूर्वी वेळोवेळी दिसून आले आहे. केवळ मोदींच्या दुस्वासापोटी या प्रतिसादात बदल होऊ नये, अशी प्रामाणिक इच्छा आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@