२०२२ पर्यंत प्रत्येक मुंबईकराला हक्काचं घर देणार ! : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2019
Total Views |
 


मुंबई : २०२२ साली देशाला स्वतंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. यावेळी देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचं हक्काचं घर मिळावं हे पंतप्रधान मोदीजींचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवस रात्र एक करू असे सांगून २०२२ पर्यंत प्रत्येक मुंबईकराला हक्काचं घर देणारच, असं ठाम आश्वासन सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते कुर्ला बैल बाजार येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळाच्या जागेवरील काही झोपडपट्टीवासियांना घराच्या किल्ल्या प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आल्या.

 

कुर्ला बैल बाजार येथील वाडीया इस्टेट येथे सोमवारी सायंकाळी भाजपतर्फे वचनपूर्ती सभा घेण्यात आली. कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला विमानतळ परिसरातील झोपडपट्टीवासियांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागल्याने संबंधितांना यावेळी घराच्या किल्ल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, स्थानिक खासदार पूनम महाजन, आ. पराग अळवणी, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर, 'जिव्हीके'चे मुख्याधिकारी राजीव जैन उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, आजचा दिवस संदेशनगर व क्रांतीनगरातील नागरिकांसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. यापूर्वी घराची केवळ स्वप्ने दाखवली जात होती. मात्र आता घरापासून कुणीही वंचित राहणार नाही. प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर देण्याचा निर्धार केला केला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कुणीही बेघर राहणार नाही. आज काही पात्र रहिवाशांना घराची चावी मिळाली, मात्र जोपर्यंत प्रत्येकाला घराची चावी मिळणार नाही तोपर्यंत हा चावी वाटपाचा कार्यक्रम संपणार नाही. २००० नंतरच्या ज्या लाभार्थ्यांना अपात्र ठरवले गेले होते, अशा २००० ते २०११ दरम्यानच्या विमानतळ परिसरातील रहिवाशांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र ठरवून त्यांना हक्काचे घर मिळवून दिले जाईल. ज्यांना कागदपत्रांअभावी अपात्र ठरवले गेले, अशा नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 

घरांचं फक्त स्वप्न दाखवून उपयोग नाही ते वेळेत पूर्ण करावं लागतं. प्रश्न कितीही जटील असला तरी त्याचं उत्तर असतंच. ते शोधण्याची जिद्द असावी लागते. आम्ही जुन्या सत्ताधाऱ्यांसारखे नसून जे बोलतो ते करून दाखवतो, असा टोला यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना मारला. धारावीदेखील झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी केंद्राकडून रेल्वेची ४५ एकर जागा मिळवण्यातही राज्य शासनाला यश आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. पंधरा वर्षांमध्ये झोपडपट्टीवासियांचा एकही प्रश्न सोडवू न शकणारे आता तुमचा बुद्धिभेद करत आहेत. त्यांच्या खोट्या प्रचाराकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

 

दरम्यान स्थानिक खासदार पूनम महाजन यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या संविधान वाटप कार्यक्रमांतर्गत नागरिकांना संविधानाच्या प्रतींचे यावेळी वाटप करण्यात आले. यावेळी खा. महाजन यांनीही जोरकस भाषण करून काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विशेष उल्लेख केला. बाळासाहेबांनी पहिल्यांदा झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे देण्याचा संकल्प केला होता. पण युती सरकारनंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी 'झोपू' योजनेलाच झोपवण्याचे काम केले. यावेळी मुंबईचे भाजप अध्यक्ष आ. आशिष शेलार व आ. पराग अळवणी यांनीही भाषण करून काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. या सभेनंतर मनसेचे स्थानिक विभागप्रमुख चंद्रकांत मोरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

 

मुंबईचा विकास करण्यास आम्ही सक्षम

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली. जे उत्तर प्रदेशातील आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकले नाहीत, तेथील गरीबांना घरे देऊ शकले नाहीत ते राहुल मुंबईत येऊन कशा काय गमजा मारू शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमच्या मुंबईचं आम्ही पाहून घेऊ. मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यास आम्ही सक्षम आहोत. राहुल यांनी येथील चिंता करू नये, असा टोलाही त्यांनी मारला.

 

"मोदी हैं तो सब मूनकिन हैं।"

निवडणूका आल्या म्हणून फक्त तुमच्यासमोर येणारे आम्ही नसून आम्हाला समाजातील सर्व घटकांचा सर्वांगिण विकास करायचा आहे असे सांगून या देशात "मोदी हैं तो सब मूनकिन हैं" असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुंबईकरांना भूलथापा देऊन फसवण्याचा प्रयत्न राहुलजींनी करू नये. "मुगेरीलाल के हसीन सपने" कधीही पूर्ण होत नाहीत, असा टोला त्यांनी मारला. मी राहुलजींना मुगेरीलाल म्हणणार नाही, मात्र लोक त्यांना यापुढे तसं म्हणतील, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

 

नागपूरच्या माणसाने मुंबईकरांचं जगणं सुसह्य केलंय!

वचनपूर्ती सभेत बोलताना खा. पूनम महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीची मुक्तकंठाने स्तुती केली. घरांचा हा प्रश्न मार्गी लावताना मुख्यमंत्र्यांनी मला मोठ्या भावासारखी मदत केली, असे त्या म्हणाल्या. विमानतळांच्या परिसरातील झोपडपट्टीवासीयांचा तीस वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या अमूल्य सहकार्यामुळेच मार्गी लागला, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधानांचं प्रत्येकाला घर देण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दहा लाख घरं राज्यात बांधण्याची तयारी केली असून हे अफाट काम असून या नागपूरच्या माणसाने मुंबईकरांचं जगणं सुसह्य केलंय, असे गौरवोदगार यावेळी खा. महाजन यांनी काढले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@